पानेगावात शिक्षक दाम्पत्याच्या घरात भरदिवसा चोरी आठ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पंधरा हजार रुपयांचा ऐवज चोरला
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील पानेगाव येथे रविवारी (ता.27) भरदुपारी शिक्षक दाम्पत्याच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून 8 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 15 हजार रुपयांची घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सोनई पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिक्षक शिवाजी राजाराम जंगले हे शिक्षक दाम्पत्य पानेगाव-शिरेगाव रस्त्यावरील जंगले वस्ती येथे वास्तव्यास आहे. त्यांची मुले अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. दरम्यान, रविवारी (ता.27) घराला कुलूप लावून भावाच्या घरी सत्यनारायण पूजा कार्यक्रमास गेले होते. शिक्षक पत्नी अनिता जंगले या साधारण अर्ध्या तासाने घरी येताच त्यांना दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसला. घरात गेल्या असता लोंखडी कपाटाच्या लॉकरमधील सोन्याचे 4 तोळ्याचे गंठण, 3 तोळे वजनाच्या सहा अंगठ्या, 8 ग्रॅम वजनाचे कानातील डूल, 3 ग्रॅम वजनाचे कानातील डूल असे 8 तोळे 1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख 15 हजार रुपये असा ऐवज चोरीस गेल्याचे दिसून आले.
याबाबत शिवाजी जंगले यांनी तत्काळ सोनई पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी गुरनं.227/2021 भारतीय दंडविधान कलम 454, 380 प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, ज्ञानेश्वर थोरात यांनी घटनास्थळास भेट देवून पाहणी केली. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ज्ञ पथकास पाचारण करण्यात आले होते. श्वान पथकाने जवळच्या रस्त्यापर्यंत माग काढला. पुढील तपास सोनई पोलीस करत आहे.