शिर्डीची लढत दुरंगीच मात्र मतविभाजन ठरणार कळीचा मुद्दा! उत्कर्षा रुपवते वंचित आघाडीत; शिर्डीतून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर येवू लागली असून मुंबई, सांगली पाठोपाठ आता शिर्डीतही काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी रात्री महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव उत्कर्षा रुपवते यांनी पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्यांच्या वंचित प्रवेशाने शिर्डीचे राजकीय गणितं बिघडणार असून कालपर्यंत सरळ वाटणारी लढत आता अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रुपवतेंच्या या निर्णयाने आघाडीच्या मतांचे विभाजन अटळ आहे. त्याप्रमाणे रामदास आठवलेंना मागणी करुनही शिर्डीतून उमेदवारी न दिल्यानेे महायुतीसोबत असलेला बौद्ध समाजही नाराज आहे. त्यामुळे रुपवतेंना वंचितची उमेदवारी जाहीर झाल्यास दोन्हीकडून मतविभाजन होवून शिर्डीतून अनपेक्षित निकाल समोर येण्याचीही दाट शक्यता आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये वंचितच्या उमेदवाराने सहा टक्के मतं मिळवली होती.
दीड दशकांपूर्वी कोपरगावच्या जागी शिर्डी लोकसभा मतदार संघाची निर्मिती झाली, तेव्हापासून हा मतदार संघ अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव आहे. 2009 पूर्वी अस्तित्वात असलेला कोपरगाव मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र शिर्डी लोकसभेच्या उदयानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी-आरपीआय आघाडीने रामदास आठवले यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत संयुक्त शिवसेनेकडून ऐनवेळी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे यांना मैदनात उतरवले गेले. त्यावेळी वाकचौरेंनी आठवले यांचा तब्बल 1 लाख 32 हजारांहून अधिक मतांनी दारुण पराभव केला. तेव्हापासून या मतदार संघात बौद्ध समाजाला उमेदवारी मिळालेली नाही.
दिवंगत नेते अॅड.प्रेमानंद रुपवते यांनीही 2009 सालच्या निवडणुकीत बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना अवघी 22 हजार 787 (3.4 टक्के) मतं मिळाली. त्यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या उत्कर्षा रुपवते यांनी 2019 मध्ये पक्षाकडून शिर्डीची उमेदवारी मागितली. मात्र पक्षाने त्यांना संघटनात्मक काम करण्याचा सल्ला देत त्यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदावर नियुक्ति करीत त्यांची बोळवण केली. त्यानंतरच्या कालावधीत त्यांनी संपूर्ण मतदार संघात फिरुन संघटनात्मक पातळीवर भरीव काम करीत आपल्या उमेदवारीचा दावा अधिक ठळक करण्याचा प्रयत्न केला. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदार संघ पक्षाने स्वतःकडे घ्यावा अशी सातत्याची मागणीही त्यांनी केली.
प्रत्यक्षात मात्र पक्षीय पातळीवरील वाटाघाटीत शिर्डीच्या जागेवर उबाठा शिवसेनेच बाजी मारल्याने जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी कोणतेही विशेष प्रयत्न केले नसल्याचे समजून पंधरा दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईतील राजगृहावर जावून वंचितचे सर्वेसर्वा अॅड.प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने त्या वेगळा मार्ग निवडणार असल्याचे संकेतही मिळाले होते. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी शिर्डीबाबत कोणतीही हालचाल न केल्याने अखेर बुधवारी (ता.17) रुपवते यांनी कार्यकर्त्यांसह वंचित आघाडीचा झेंडा हाती घेतला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी गेल्या 16 वर्षांपासून पक्षासाठी केलेल्या कामांची जंत्री मांडून प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे अतिशय निष्ठेने पूर्ण केल्याचा उल्लेख केला.
रुपवते-चौधरी कुटुंबातील तिसरी पिढी काँग्रेस पक्षात कार्यरत असताना निस्वार्थ वृत्तीने अहोरात्र पक्षवाढीसाठी झटणार्या आपल्यासारख्या सामान्य युवा कार्यकर्तीला पक्ष सोडण्याचा निर्णय का घ्यावा लागला यामागील कारणांचा शोध घेवून पक्ष नेतृत्वाने गंभीर विचार करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी पक्षाचे कानही उपटले आहेत. त्यांचा राजीनामा सोशल माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर काही वेळांतच त्यांनी वंचित बहुजन आघाडीत अधिकृत प्रवेश केल्याने शिर्डीतून त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे. त्यामुळे निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या पूर्वसंध्येपर्यंत दुरंगी वाटणारी शिर्डीची लढत आता रुपवतेंच्या उमेदवारीने तिरंगी होण्याची चिन्हे असून तसे घडल्यास महायुती आणि आघाडी दोघांनाही त्यातून होणार्या मतविभाजनाचा फटका बसणार आहे.
शिर्डीत बौद्ध समाजाची संख्या जवळपास 15 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या दोन पंचवार्षिकपासून रिपब्लिकन पार्टी (आठवले) महायुतीसोबत आहे. त्यामुळे समाजाच्या मताचे आघाडी आणि महायुतीत विभाजन झाल्याचे दिसून येते. गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने संजय सुखदान यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी 63 हजार 287 (6.1 टक्का) तर अपक्ष निवडणूक लढवणार्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी 35 हजार 526 (3.5 टक्का) मतं मिळवताना संयुक्त शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा केला. त्या निवडणुकीत काँग्रेसच्या भाऊसाहेब कांबळे यांना 1 लाख 20 हजार 195 मतांनी पराभव पत्करावा लागला. यंदाच्या निवडणुकीत महायुतीत असलेल्या बौद्ध समाजाची नाराजी आणि त्यातच आता उत्कर्षा रुपवतेंचा वंचित प्रवेश यामुळे आघाडीसह महायुतीच्या उमेदवाराचीही धाकधूक वाढली असून दोन्हीकडून मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे.
उत्कर्षा रुपवते यांच्या वंचित प्रवेशाने काँग्रेसला राज्यात आणखी एक धक्का बसला हे खरं असलं तरीही रामदास आठवले यांच्या उमेदवारीवरुन बौद्ध समाजात निर्माण झालेली नाराजी अद्यापही दूर करण्यात महायुतीला यश आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर वंचितकडून रुपवतेंना उमेदवारी जाहीर झाल्यास शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना मिळणार्या बौद्ध मतांचे विभाजनही अटळ आहे. अशा स्थितीत होणार्या शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल समोर येण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. एकंदरीत रुपवतेंच्या निर्णयाने दोघा बंडखोरांमध्येच होणार्या लढतीत आता रंग भरले जाणार आहेत हे निश्चित.