सात कोटीस गंडा घालणार्यास नाशिकमधून अटक
![]()
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील सोनईमध्ये चार वर्षांपूर्वी संकल्पसिध्दी, उज्ज्वलम, माऊली मल्टीस्टेट व प्रॉफिट हॉलिडे या संस्थांच्या माध्यमातून वर्षाला दामदुप्पटचे आमिष दाखवत सात कोटी रुपयास गंडा घालून फरार झालेल्या सहापैकी एका प्रमुख आरोपीस नाशिक येथून नुकतीच अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, चार वर्षे उलटूनही गुंतवणूक केलेली रक्कम मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सोनई व परिसरात फसवणूक झालेल्या सर्व तक्रारदारांच्यावतीने जानेवारी 2021 मध्ये आण्णासाहेब दरंदले यांनी फिर्याद दिल्यानंतर भारतीय दंड विधान कलम 406, 409, 420, 34 नुसार विष्णू रामचंद्र भागवत (रा.दवंडगाव, जि.नाशिक), नीलेश जनार्दन कुंभार (रा.मंचर, जि.पुणे), सुरेश सीताराम घंगाडे (रा.तळेगाव, जि.पुणे), राजेंद्र वामन देशमुख, प्रवीण गंगाधर कवडे (रा.कोतूळ, जि.नगर), शांताराम अशोक देवतरसे (रा.सोनई) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी मुख्य आरोपी विष्णू भागवत यास दोन दिवसांपूर्वी नाशिक येथून अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यास न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

