आमदार सत्यजीत तांबेंनी दिला मंत्री राधाकृष्ण विखेंसह ‘जय श्रीराम’चा नारा! अभूतपूर्व उत्साहात शोभायात्रा; माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची उपस्थिती लक्षवेधी..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशभरात गुरुवारी साजर्‍या झालेल्या श्रीराम नवमी उत्सवाची धूम संगमनेरातही बघायला मिळाली. शहर व उपनगरांसह ग्रामीणभागातही श्रीरामजन्म सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा केला गेला. सायंकाळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने काढलेली शोभायात्रा अभूतपूर्व ठरली. या शोभायात्रेत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. व आमदार सत्यजीत तांबे यांनी हजेरी लावताना संयुक्तपणे जय श्रीरामचा नारा दिला तर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गळ्यात भगवे उपरणे परिधान करुन शोभायात्रेत सहभाग नोंदविल्याने त्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. सय्यदबाबा चौकात रेंगाळलेली मिरवणूक पुढे रेटण्यावरुन पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये उडालेले किरकोळ शाब्दिक खटके वगळता ही मिरवणूक उत्साहात पार पडली. छत्रपती संभाजीनगर व जळगावमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

गुरुवारी (ता.30) देशभरात श्रीराम नवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावर्षी शहरापाठोपाठ उपनगर व तालुक्याच्या ग्रामीणभागातही या उत्सवाची धूम अनुभवयाला मिळाली. शहर व तालुक्यातील बहुतेक सगळ्या मंदिरांमध्ये माध्यान्नाला पाळणा हलवून श्रीरामांचा जन्मसोहळा साजरा केला गेला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी सायंकाळी अभिनवनगर येथील श्रीराम मंदिरापासून शोभायात्रेचे आयोजन केले होते. यावर्षीच्या शोभायात्रेत महिला, मुली, तरुण व वृद्ध अशा सगळ्यांचीच उपस्थितांची अभूतपूर्व होती.

रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ येताच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आगमन झाले, तर त्यानंतर लागलीच आमदार सत्यजीत तांबेंही त्याठिकाणी हजर झाल्याने अनेकांच्या भुवयां उंचावल्या गेल्या. यावेळी दोन्ही नेत्यांच्या हस्ते शिवरायांच्या अर्धकृती प्रतिमेला पुष्पहार घातल्यानंतर विखे व तांबे यांनी संयुक्तपणे ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने शोभायात्रेत सहभागी हजारो अबालवृद्धांचा उत्साह दुणावला. नवीन नगररोड, बसस्थानक, शिवस्मारक, मोमीनपुरा, चावडी, मेनरोड, सय्यदबाबा चौक, नेहरु चौक आणि चंद्रशेखर चौक अशा लांबलचक मार्गावरुन निघालेल्या या शोभायात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांची संख्या अभूतपूर्व होती. त्यामुळे चौकाचौकात मिरवणूक रेंगाळत असल्याचेही दिसून आले.

शाही स्वरुपात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेच्या पुढ्यात आकर्षक रांगोळी रेखाटली जात होती, त्या पाठोपाठ सनई-चौघडा, हातात भगवाध्वज घेतलेले घोडेस्वार, सांडणीस्वार, गोमाता बचाओचा संदेश देणारा चित्ररथ, सजवलेल्या रथात श्रीराम-लक्ष्मण व सीतामातेची वेशभूषा केलेली बालके, आदिवासी नृत्य, मल्लखांबाचे प्रात्यक्षिके, महिलांसाठी स्वतंत्र डीजे, मावळचे ढोलताशा पथक, तरुणाईचे आकर्षण असलेला डीजे, प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिकृती, महाबली हनुमानाची वेशभूषा केलेला तरुण आणि हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले नागरिक असे दृश्य पाहणार्‍या प्रत्येकाचाच उत्साह वाढवणारे होते. शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी श्रीराम प्रतिमेचे पूजन केले जात होते.


ही शोभायात्रा गवंडीपुर्‍यातून सय्यदबाबा चौकात आल्यानंतर दीर्घकाळ रेंगाळली. पोलिसांकडून वारंवार आवाहन करुनही नाचण्यात बेभान झालेले कार्यकर्ते ऐकत नव्हते. त्याचवेळी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनीही गळ्यात भगवे उपरणे घालून मिरवणुकीत हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला पारावार उरला नाही. त्यातच वाद्य वाजवण्यासाठी दिलेल्या वेळेची मर्यादा संपल्याने पोलिसांनी शोभायात्रेतील वाद्य बंद केली. त्याचा परिणाम हजारो कार्यकर्त्यांनी सय्यदबाबा चौकात ठाण मांडून ‘जय श्रीराम’चा जयघोष करण्यास सुरुवात केल्याने वातावरण भारावले होते.

त्यातच शोभायात्रेच्या मध्यात असलेला डीजे लक्ष्मी बेकरीच्या समोर अरुंद रस्त्यावर फसल्याने मिरवणुकीचे दोन भाग झाले. त्यामुळे एकीकडे पाठीमागील बाजूला अडकलेले शेकडो कार्यकर्ते आणि दुसरीकडे पोलिसांकडून वारंवार मिरवणूक पुढे घेण्यासाठी वाढणारा दबाव यातून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये किरकोळ शाब्दीक खटकेही उडाले. अखेर टेम्पोवरील ‘डीजे’चे काही स्पीकर खाली उतरविल्यानंतर पुढचा मार्ग मोकळा झाल्यानंतर ही शोभायात्रा पुढे मार्गस्थ झाली. रात्री साडेदहाच्या सुमारास शोभायात्रेचे चंद्रशेखर चौकात जल्लोशात स्वागत करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत श्रीरामाची आरती होवून श्रीराम नवमी उत्सवाची सांगता झाली.


विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून श्रीराम नवमीच्या निमित्ताने शोभायात्रा काढली जाते. त्यात यापूर्वी केवळ हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांचाच भरणा दृष्टीस पडत असतं. यावर्षीच्या मिरवणुकीत मात्र सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह दस्तुरखुद्द माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांची गळ्यात भगवे उपरणे घालून झालेली एन्ट्री लक्षवेधी ठरली, तर आमदार सत्यजीत तांबे यांनी मंत्री विखेंसह दिलेला जय श्रीरामचा नारा आणि त्यानंतर चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिरात घेतलेले संयुक्त दर्शन राजकीय चर्चांना फोडणी देणारे ठरले.

Visits: 17 Today: 1 Total: 114692

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *