कोरोनानंतर ढगाळ हवामानाने शेतकर्यांची चिंता वाढली… द्राक्ष बागांसह इतर पिकांवरही प्रतिकूल परिणाम; महागडी औषधांची करताहेत फवारणी
नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या काही महिन्यांपासून कोरोना महामारी आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणार्या द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी आता तर निसर्गाच्या लहरीपणापुढे हातच टेकले आहे. ढगाळ हवामान असल्यामुळे द्राक्ष बागांसह इतर पिकांवरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. याचे वास्तव चित्र सध्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोरबन येथे दिसत आहे. येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी आनंदा गाडेकर हे बदलत्या हवामानामुळे रोज बागेवर फवारणी करत आहे. मात्र, आणखी किती दिवस निसर्गनिर्मित संकटांचा सामना करावा लागणार असा प्रश्नही त्यांना निर्माण झाला आहे.
संगमनेर तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान व पावसाचे हलके थेंब पडत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांसह इतर शेतकरीही अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत. बोरबनचे प्रगतशील शेतकरी आनंदा गाडेकर यांच्या मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागा आहेत. परंतु, ढगाळ हवामानाचा बागेवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. विशेषतः डावणी, करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने द्राक्षबागा फवारण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर इतर पिकांवरही या रोगाचा परिणाम झाला आहे.
यापूर्वी निसर्ग चक्रीवादळ, कोरोना महामारी त्यानंतर अतिवृष्टी आणि आता ढगाळ हवामान यामुळे हातातोंडाशी आलेला घासही पुन्हा हिरावून जातो की काय असा प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिक स्थिती पूर्णतः खालावलेली असताना आता हवामानाच्या लहरीपणामुळे महागडी औषधे खरेदी करुन फवारावी लागत आहेत. त्यातच रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा, ऊस आदी पिकांवरही हवामानाचा प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकरी सतत संकटातच सापडत असल्याचे दुर्देवी चित्र दिसत आहे.
सध्या रब्बी हंगाम चालू असून चांगली थंडी पडणे गरजेची होती. मात्र सतत हवामानात बदल होत असल्यामुळे द्राक्ष बागांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सातत्याने ढगाळ वातावरण तयार होत असल्याने हवेतील आर्द्रता सत्तर ते ऐंशी टक्क्यांपर्यंत वाढली आहे. द्राक्ष पिकावर विशेषतः डावणी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी महागडी औषध फवारणी करून अक्षरशः मेटाकुटीस आले आहेत.
– आनंदा गाडेकर (द्राक्ष उत्पादक, बोरबन)