आश्वी खुर्दमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; सव्वा लाखांचा ऐवज चोरीस पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील आश्वी खुर्द येथे गुरुवारी (ता.24) पहाटे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरातून सोने, रोख रक्कमेसह इतर वस्तू चोरुन नेल्या आहेत. यामुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात हर्षद विलास बागुल (हल्ली रा.आश्वी खुर्द, मूळ रा.कौठे-मलकापूर, ता.संगमनेर) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आश्वी खुर्द येथे भाडेतत्त्वावर राहत असून माझ्या खासगी कामासाठी लहान भाऊ विलास बागुल याच्याकडून त्याची तीन तोळ्याची चेन घेऊन आलो होतो. ती चेन मी घरातील कपाटामध्ये ठेवली होती. त्यामध्ये माझ्या मुलाचे दागिने व काही रक्कम होती. मी घराला कुलूप लाऊन माझ्या मूळ गावी गेलो होतो.

गुरुवारी सकाळी माझ्या घराशेजारील अशोक शिंदे यांनी मला फोन करून घराला कुलूप लावले नसल्याची माहिती दिली. त्यानंतर माझ्या मित्रांनी घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याची माहिती दिल्याने मी तत्काळ घरी येऊन पाहणी केली असता कपाटातून तीन तोळे वजनाची 1 लाख 5 हजार रुपये किंमतीची चेन, 1 हजार 500 रुपये किंमतीच्या बाळ्या, 8 हजार रुपये किंमतीच्या दोन लहान अंगठ्या व 5 हजार रुपये रोख असा एकूण 1 लाख 19 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 114/2021 नुसार भारतीय दंडसंहिता कलम 457, 380 प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. बी. भाग्यवान हे करत आहे.

आश्वी खुर्द येथे गुरुवारी (ता.24) पहाटे चार ते पाच ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु एक ठिकाण वगळता इतर ठिकाणी त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. मध्यरात्री रोहित्र बंद करून चोरट्यांनी चोर्‍या केल्याची चर्चा आश्वी खुर्द येथे सुरू असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.

Visits: 136 Today: 1 Total: 1984432

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *