पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच! दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एक ठार, दोन जखमी

नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघात काही थांबण्याचे नाव घेईना. सद्यस्थितीत महामार्गावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे आणि वाहतुकीच्या नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष होवून अपघात होत असल्याचे वारंवार समोर येत आहे. रविवारी (ता.21) देखील महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात होवून एक वृद्ध ठार तर दोघे जखमी झाले आहे. यावरुन महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे अधोरेखित झाले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास सुनील गलांडे हे त्यांच्या सहकार्‍यासह संगमनेरहून घारगावकडे चालले होते. दरम्यान, चंदनापुरी घाटातील वळणावर आले असता चालक सुनील गलांडे यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट महामार्गाच्या कडेला असलेले संरक्षक कठडे तोडून खोल दरीत जावून कोसळली. या अपघातात दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.

सदर अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, सुनील साळवे, मनीष शिंदे, संजय मंडलिक, नंदकुमार बर्डे, भरत गांजवे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर क्रेनला पाचारण करुन कार दरीतून बाहेर काढण्यात आली. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने एका कार चालकाचा ताबा सुटल्याने कार महामार्गाच्या कडेला असलेल्या दगडांवर जावून उलटली होती.

तर दुसरी घटना याच महामार्गावर रविवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास बोटा शिवारात घडली आहे. त्रिंबक नामदेव सानप (रा.श्रमिकनगर, सातपूर रोड, नाशिक) हे आपल्या कुटुंबियांना देवदर्शनासाठी कारमधून (क्र.एमएच.15, एचक्यू.4047) संगमनेर मार्गे आळेफाट्याच्या दिशेने जात होते. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील वाघमारे वस्ती येथे आले असता गोविंद लुमा मधे (रा. खळमाळ बोटा, वय 65) हे महामार्ग ओलांडत असताना त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात ते जागीच ठार झाले.

या घटनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत, कैलास देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी बाळू गोविंद मधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 265/2021 भादंवि कलम 304 (अ), 279, 427 मो.वा.का.क. 174 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख हे करत आहे.


लागोपाठ दोन-तीन दिवस सुट्ट्या असल्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. अनेक वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवून वेग मर्यादा ओलंडतात. त्यामुळे वाहनांवर ताबा राहत नसल्याने हे अपघात होत आहे. वाहनचालक मोबाईलवरही बोलत असल्यानेही अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन वाहन चालविणे सुरक्षितेसाठी गरजेचे आहे.
– भालचंद्र शिंदे (पोलीस उपनिरीक्षक – डोळासणे मदत केंद्र)

Visits: 28 Today: 1 Total: 255833

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *