पिंपळगाव देपा येथे दोघा भावांवर बिबट्याचा हल्ला
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या उंडे वस्ती येथे बिबट्याने धुमाकूळ घालत दत्तात्रय उंडे व मनोहर उंडे या दोघा सख्ख्या बंधूवर हल्ला करत त्यांना जखमी केले आहे. ही घटना गुरुवारी (ता.24) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरातील नागरिक दहशतीखाली आले असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने त्वरीत पिंजरा लावावा अशी मागणी संतप्त शेतकर्यांनी केली आहे.
पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या उंडे वस्ती येथे दत्तात्रय उंडे व मनोहर उंडे यांचे घरापासून जवळच शेत आहे. तेथे दत्तात्रय उंडे हे काम करत होते. त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्यांना पंजा मारला. त्यामुळे त्यांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने त्यांचे बंधू मनोहर उंडे यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तर त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला करत पाठीवर पंजा मारला. त्यानंतर त्यांनी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात जावून औषधोपचार घेतले. मात्र, पुन्हा संध्याकाळी बिबट्याने दत्तात्रय उंडे यांच्यावर हल्ला केला. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकर्यांमध्ये कमालीची भीती पसरली असून, बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने त्वरीत पिंजरा लावावा अशी मागणी शिवाजी शिंदे, गोरख उंडे, मगन गुंड, साहेबराव गुंड, बाळू काळे, अमोल उंडे, सचिन गुंड, नितीन गुंड, श्याम काळे, तुकाराम उंडे, प्रभाकर गुंड, तान्हाजी शिंदे, खंडू घाणे, सोमनाथ घाणे आदी शेतकर्यांनी केली आहे.