अखेर ‘भगवा मोर्चा’ला पोलिसांची सशर्त परवानगी! संगमनेर-अकोले स्वयंस्फूर्तीने बंद; 64 ग्रामपंचायतींचे ठराव..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सकल हिंदू समाजाच्यावतीने मंगळवारी संगमनेरातून निघणार्‍या ‘भगवा मोर्चा’च्या मार्गातील परवानगीचा अडथळा दूर झाला आहे. शहर पोलिसांनी काही अटी व शर्थींवर या मोर्चाला परवानगी देण्याचे ठरवले असून त्यादृष्टीने आयोजकांशी चर्चा सुरु आहे. या मोर्चात सहभागी होता यावे यासाठी संगमनेर व अकोले शहरातील विविध संस्था, संघटना, समाज व व्यापारी संघटनाही पुढे सरसावल्या असून संगमनेर तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभा बोलावून मोर्चाला पाठिंबा दर्शवित आपापल्या गावातील व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे मंगळवारी संगमनेरातून अभूतपूर्व मोर्चा निघण्याची दाट शक्यता आहे.

जोर्वेनाका येथे गेल्या रविवारी घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर सकल हिंदू समाजातील रोष खद्खदू लागला असून अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (ता.6) शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त साधून संगमनेरातून ‘भगवा मोर्चा’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोर्चाबाबत गेल्या दोन दिवसांत समाज माध्यमात वेगवेगळ्या अफवाही पसरविण्यास सुरुवात झाली असून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या अफवांचाही त्यात समावेश आहे. मात्र याबाबत शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही अटी व शर्थीच्या अधीन राहून या मोर्चाला परवानगी दिल्याची माहिती दैनिक नायकला दिली.

आयोजकांकडून मंगळवारच्या मोर्चाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून या मोर्चात सहभागी होणार्‍यांची संख्या प्रचंड असेल असा अंदाज आहे. गेल्या चार दिवसांत मोर्चाच्या आयोजकांना संगमनेर व अकोले तालुक्यातील अनेक संस्था, संघटना, मंडळे व व्यापारी संघटनांसह विविध समाजाच्या विश्वस्त मंडळांचे लेखी पत्रही प्राप्त झाले असून त्या सर्वांनी या मोर्चाला पाठिंबा जाहीर करतानाच संघटनेशी व समाजाशी संलग्न असणार्‍या नागरिकांना आपापले व्यवहार बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय व्यापार्‍यांची शिखर संस्था असलेल्या संगमनेर व्यापारी असोसिएशननेही आपल्या संघटनेशी संलग्न असलेल्या व्यापार्‍यांना व्यवहार बंद ठेवून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

यासोबतच संगमनेर तालुक्यातील जवळपास 64 ग्रामपंचायतींनी आपापल्या गावात विशेष ग्रामसभा बोलावून जोर्वेनाका येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतानाच मंगळवारी संगमनेरात निघणार्‍या मोर्चाचे समर्थन केले आहे. या सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत आपल्या पंचक्रोशीतील व्यवहार बंद ठेवण्याचाही निर्णय घेतल्याने मंगळवारचा मोर्चा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आयोजकांकडून वर्तविली जात आहे. सदरचा मोर्चा सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात येणार असून त्यात कोणत्याही राजकीय व्यक्तीला भाषणाची संधी देण्यात येणार नाही. सोबतच आयोजकांमध्ये एकाही राजकीय नेत्याचा अथवा कार्यकर्त्याचा समावेश नसल्याची माहिती सकल हिंदू समाज या बॅनरखाली एकवटलेल्या सामान्य आयोजकांनी दिली आहे.

एकीकडे आयोजक मिळणार्‍या प्रचंड प्रतिसादामुळे या मोर्चाच्या आयोजनात व्यस्त असताना दुसरीकडे पोलिसांनीही आपली तयारी ठेवली आहे. मंगळवारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलाची अख्खी कंपनी संगमनेरात दाखल झाली असून त्यासोबतच धडक कृती दलाचे जवान आणि दंगल नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस असा जवळपास पाचशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहरातील वातावरण खराब करण्याची शक्यता असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह संशय असलेल्यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 149 अंतर्गत नोटीसाही बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


मंगळवारी संगमनेरातून निघणारा सकल हिंदू समाजाचा मोर्चा उत्स्फूर्तपणे निघणार आहे. या मोर्चाचा कोणत्याही राजकीय पक्षाशी अथवा संघटनेशी संबंध नसून हिंदू समाजावरील वाढते हल्ले आणि लव्ह जिहादसारख्या घटनांच्या विरोधात हा मोर्चा आहे. या मोर्चातून कोणत्याही धर्माला अथवा समाजाला लक्ष्य करण्याचा हेतू नसून केवळ अशाप्रकारच्या विघातक प्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढला जात आहे. या मोर्चादरम्यान कोणत्याही राजकीय व्यक्तीला भाषण करण्यापासून अथवा ठरलेल्या घोषणांशिवाय अन्य घोषणा देता येणार नाही असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

Visits: 2 Today: 1 Total: 27325

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *