अकोले तालुक्याच्या विकासातील शुक्राचार्यांना कायमचे हटवा ः पवार भंडारदरा येथे माजी आमदार स्व.यशवंतराव भांगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
नायक वृत्तसेवा, अकोले
‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी जनतेनेचे त्यांना धडा शिकविला’, अशी तोफ डागतानाच अकोले तालुक्याच्या विकासातील शुक्राचार्यांना कायमचे हटवा, तुमच्या विकासाचे मार्ग खुले होतील, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांचे नाव न घेता शरद पवार यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.
भंडारदरा येथे अकोले तालुक्याचे माजी आमदार यशवंतराव भांगरे यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी (ता.24) शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. संयोजक अशोक भांगरे यांनी सर्वांचे स्वागत केले. तर त्यांचे पुत्र अमित भांगरे यांची राजकारणातील प्रवेशाची घोषणाही यावेळी करण्यात आली.
राज्यात नवे सरकार आल्यानंतर पवार प्रथमच अकोले तालुक्यात आले होते. त्यामुळे शरद पवार त्यांचे जुने सहकारी मधुकर पिचड यांच्यासंबंधी काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. पवार यांनी पिचड यांचे नाव घेता आपल्या खास शैलीत त्यांचा समाचार घेतला. पवार म्हणाले, ‘आता बोलताना काही वक्त्यांनी मधल्या काळात अकोले तालुक्यातील विकास कामे रखडली असा उल्लेख केला. ही गोष्ट मलाच मान खाली घालायला लावणारी आहे. कारण ‘त्या’ येथील नेतृत्वाला आम्हीच मंत्री केले, विरोधी पक्षनेतेपद दिले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले. त्यांच्या पुढच्या पिढीलाही संधी दिली. तरीही मागील विधानसभेच्या वेळी अनेकांच्या अंगात आले होते. ते चमत्कारिक वागू लागले होते. पक्ष सोडून जाणार्यांची रोज नवी यादी पहायला मिळत होती. लोक म्हणू लागले आता कसे होणार? पण हा प्रकार आपल्याला नवा नव्हता.
1980 मध्ये माझ्या पक्षाचे 56 आमदार निवडून आले होते. मी विरोधी पक्षनेता झालो. नंतर मी ब्रिटनच्या दौर्यावर गेलो असताना त्यातील 50 जण पक्ष सोडून गेले. माझे विरोधी पक्षनेतेपदही गेले होते. मात्र, त्यामुळे मी डगमगलो नाही. काम करीत राहिलो. पुढे आलेल्या निवडणुकीत आम्हांला सोडून गेलेल्यांपैकी 48 जणांचा पराभव झाला. दिलेला शब्द न पाळणारे लोक जनतेलाच आवडत नाहीत. त्यामुळे अशांना लोकच धडा शिकवितात. अशीच भूमिका अकोले तालुक्यातील नेत्यांनीही घेतल्याचे दिसून आले. या तालुक्यातील साखर कारखाना कर्जबाजारी असल्याचे मला सांगण्यात आले. माझे येथील शेतकर्यांना आवाहन आहे की, कारखान्याच्या विकासाच्या आड येणारे शुक्राचार्य कायमचे तेथून हटवा, कारखाना पुढे उत्तम पद्धतीने चालविण्याची जबाबदारी आम्ही घेतो,’ असे सांगत पिचड यांना विधानसभेसोबतच तालुक्याच्या राजकारणाच्या अन्य क्षेत्रांतूनही हटविण्याची भूमिका पवार यांनी जाहीर केली.
सायकलवरून भंडारदरा…
अकोले तालुक्याची जुनी आठवण सांगताना पवार म्हणाले, ‘मी नववीत असताना लोणी येथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकत होतो. त्यावेळी माझे बंधू प्रवरा कारखान्यात नोकरीला होते. तेव्हा एकदा मी सायकलवरून भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा पाहण्यासाठी आलो होतो. तेव्हापासून हा भाग मला खूप आवडतो. या भागाचा पर्यटनदृष्या नक्कीच विकास होऊ शकतो. त्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास आणि अन्य विभागांकडून येथे निधी आणावा.’
असा झाला पवनचक्की प्रकल्प…
सातारा जिल्ह्यातील आणि त्यानंतर अकोले तालुक्यातही सुरू झालेल्या पवनऊर्जा प्रकल्पाच्या जन्माची गोष्टही पवार यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘एकदा मी हेलिकॉप्टरने सातारा जिल्ह्यात गेलो होतो. विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडे जाताना पाटण तालुक्यातील डोंगराळ भागावरून गेलो. या डोंगरांचा काही तरी उपयोग झाला पाहिजे, असा विचार करून पाटणकर यांना घेऊन हेलिकॉप्टरनेच पुन्हा त्या डोंगरावर येत एका ठिकाणी हेलिकॉप्टर उतरविले. तेथे प्रचंड वारा होता. आमचे हेलिकॉप्टरसुद्धा हलत होते. या वार्याचाच काही तरी उपयोग करण्याची कल्पना सुचली. पूर्वी आपण जर्मनीत पवनऊर्जा प्रकल्प पाहिला होता. तोच येथे राबविण्याचे ठरले. त्यानुसार नंतर संबंधितांच्या बैठका घेऊन सूचना केल्या. आज त्या भागात 3 हजार पवनचक्क्या आहेत. अकोले भागात 250 पवनचक्क्या आहेत. यासाठी जागा देणार्या स्थानिक शेतकर्यांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी मात्र मिळाली पाहिजे,’ अशी आपली भूमिका आहे.