पंजाबच्या सराईत आरोपीस शिर्डीमध्ये अटक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची दमदार कामगिरी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
जालंधर (पंजाब) येथे गोळीबार करून शिर्डीमधील हॉटेलमध्ये लपलेल्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पुनीत ऊर्फ पिम्पू बलराज सोनी (वय 27, रा. जालंधर, पंजाब) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पुनीत सोनी हा जालंधर येथे गुन्हा करून पसार झाला होता. सदरचा आरोपी शिर्डी येथे असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी अहमदनगर पोलिसांना दिली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापूसाहेब फोलाणे, संदीप घोडगे, दत्ता हिंगडे, विजय वेठेकर, संदीप पवार, भीमराज खर्से, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप दरंदले, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, रवी सोनटक्के, सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव यांच्या पथकाने तांत्रिक तपास व शिर्डीतील 133 हॉटेलची तपासणी केली.

या तपासणीदरम्यान हॉटेल निर्मल इन लॉजमध्ये तपासणी करत असताना जालंधर पोलिसांकडून प्राप्त शोधपत्रिकेप्रमाणे एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने जसप्रीतसिंग भुलाव (रा. जालंधर, पंजाब) असे असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन कसून चौकशी करता, त्याने त्याचे खरे नाव पुनीत ऊर्फ पिम्पू बलराज सोनी (वय 27, रा. शहीद बाबूलालसिंगनगर, जालंधर) असे सांगितले. त्यास पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले. पंजाब पोलिसांशी संपर्क करून आरोपीस ताब्यात घेतल्याबाबत कळविले. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध पंजाबमध्ये गंभीर स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *