स्वस्त धान्य प्रकरणी दोषींवर कारवाई करा! आदिवासी पेसा सरंपच परिषदेची मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले
मागील महिन्यात स्वस्त धान्य दुकानातील धान्याची विना परवाना वाहनांतून वाहतूक करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी, असा ठराव आदिवासी पेसा सरपंच परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांच्या धान्य वाहतुकीचा त्या मालाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

माजी आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थितीत अकोले तालुक्यातील आदिवासी पेसा सरपंच परिषदेची बैठक झाली. या बैठकीत आदिवासी भागात येत असलेल्या अनेक अडी-अडचणी दूर करण्याबाबत ठराव संमत करण्यात आले. याच बैठकीत मागील महिन्यात विनापरवाना धान्य वाहतुकीचा प्रश्नही काही सरपंचांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणाच्या चौकशीचा ठरावही करण्यात आला. यावेळी आदिवासी पेसा सरपंच परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत गोंदके, सरचिटणीस पांडुरंग खाडे, सभापती उर्मिला राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, सरपंच गणपत देशमुख, सरपंच सयाजी असवले, सोमनाथ वाळेकर, भरत घाणे, सुनील सारुक्ते व आदिवासी पट्ट्यातील सरपंच उपस्थित होते. यावेळी पुरवठा विभागाकडून दक्षता समितीच्या सदस्यांना एसएमएसद्वारे धान्याची माहिती देण्यात येत होती. मध्यंतरी ही सेवा बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरू करण्यात यावी. धान्य वितरण करणार्‍या वाहनांना हिरवा रंग देण्यात यावा, अशी मागणी माजी सभापती भरत घाणे यांनी केली.


गोरगरीब आदिवासींच्या हक्काचे धान्य चोरणार्‍यांना जनता माफ करणार नाही. धान्य वाहतूक प्रकरणाची त्रयस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी. या संबंधी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार करणार आहे.
– चंद्रकांत गोंदके (अध्यक्ष, सरपंच परिषद)

Visits: 16 Today: 1 Total: 114397

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *