सप्टेंबर वाढवणार संगमनेरकरांच्या कोविड रुग्णसंख्येचा ‘ताप’? अवघ्या सात दिवसांत रुग्णवाढीची सरासरी उंचावण्यासोबतच दररोज जातोय एकाचा बळी
श्याम तिवारी, संगमनेर
सहा महिन्यांपूर्वी आठ रुग्णांपासून सुरु झालेला संगमनेरचा कोविड प्रवास आज धोकादायक वळणावर येवून पोहोचला आहे. सुरुवातीच्या काळात 0.26 टक्के प्रति दिवस इतक्या अल्पगतीने सुरु झालेली रुग्णवाढ आज प्रति दिवस सुमारे पन्नास रुग्ण प्रति दिवसाच्या सरासरीपर्यंत पोहोचल्याने संगमनेर तालुका कोविडच्या बाबतीत गंभीर अवस्थेत पोहोचला आहे. त्यातच या महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून रुग्ण दगावण्याची श्रृंखलाही सुरु झाल्याने आणि अवघ्या सातच दिवसात तालुक्यातील आठ जणांचे बळीही गेल्याने येणार्या काळात कोविडची दाहकता अधिक वाढणार असल्याचेही चित्र स्पष्ट दिसत आहे. प्रत्येकाकडून नियमांचे तंतोतंत पालन झाल्यास कोविडची दाहकता कमी होवू शकते, मात्र सद्यस्थितीत संगमनेरकर कोविडला घाबरायलाच तयार नसल्याने तालुका दररोज रुग्णवाढीचे नवनवीन विक्रम करीत असल्याचे धक्कादायक वास्तव दिसू लागले आहे.
2 एप्रिलरोजी संगमनेर शहरातील तिघांसह आश्वी बु. येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून संगमनेर तालुक्याचा कोविड प्रवास सुरु झाला. आजार नवा, अनुभव नवा आणि एकच काम त्यामुळे सुरुवातीला लॉकडाऊन सुरु असेपर्यंत प्रशासनाचे संपूर्ण लक्ष केवळ कोविड बाधितांवरच केंद्रीत असल्याने आरोग्य, पोलीस, पालिका, महसुल, पंचायत समिती अशा सगळ्याच विभागांनी अगदी जीव ओतून नेत्रदीपक काम केले. त्यामुळे लॉकडाऊन असेपर्यंत म्हणजेचे एप्रिल व मे या दोन महिन्यात संगमनेर तालुक्यात केवळ 44 रुग्ण आढळून आले. रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तिंचा शोध घेण्यातही या दोन महिन्यात यंत्रणांनी कौतुकास्पद काम केले. मात्र जून उजेडताच ‘अनलॉक’चे वारे वाहु लागले आणि कोविडचा प्रादुर्भावही.
जूनमध्ये काही प्रमाणात उद्योग व व्यवसाय खुले झाल्याने रुग्णवाढीचा दरही 2.16 च्या गतीने वाढून या एकाच महिन्यात जवळपास दुप्पट रुग्णसंख्या वाढली. मात्र प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेतील जोश कायम असल्याने तालुक्यातील कोविडवरील नियंत्रण अबाधित राहीले. मात्र जुलैपासून रोजचे काम सांभाळून कोविडचे काम पाहण्याचे फर्मान सुटल्याने राज्यासह तालुक्यातील कोविडच्या स्थितीने उग्ररुप धारण करण्यास सुरुवात केली. जूनच्या शेवटच्या तारखेपर्यंत 2.16 रुग्णगती असतांना जुलैच्या 31 दिवसांनी मात्र उलथापालथ घडवली. सरासरी दररोज 21 रुग्ण या गतीने जुलैने तालुक्याच्या रुग्णसंख्येत 650 रुग्णांची भर घालीत तालुक्याला 759 वर नेवून पोहोचवले.
ऑगस्टच्या सुरुवातीच्या 20 दिवसांत रुग्णवाढीच्या गतीत काही प्रमाणात भर पडली, मात्र ती नैसर्गिक असल्याने त्यातून धक्कादायक चित्र समोर आले नाही. ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांत बकरी ईद रक्षाबंधनासारखे सण झाल्याने तालुक्याच्या सरासरी रुग्णसंख्येत काहीशी वाढ होवून 26.5 टक्के गतीने 265 रुग्णांची भर पडली, तर नंतरच्या दहा दिवसांत कृष्णाष्टमी, स्वातंत्र्य दिन व पोळ्यासारखे सण साजरे झाल्याने 27.55 टक्के दराने 286 रुग्णांची भर पडली. यानंतरच्या काळात मात्र कोविडने जणू गिअरच बदलला.
22 ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा उत्सव समजला जाणारा गणेशोत्सव सुरु झाला. घराघरात श्रींचे आगमन आणि त्यातून चैतन्य निर्माण होत असल्याने मोठ्या प्रमाणात संगमनेरकर सजावटीचे सामान खरेदी करण्यासाठी घरातून बाहेर पडले. येथेच कोविडचे फावले आणि ऑगस्टच्या राहिलेल्या अकरा दिवसांनी तालुक्यातील कोविडची स्थिती अनियंत्रित केली. या अकरा दिवसांच्या कालावधीर्त दररोज 37.27 टक्के वेगाने तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 410 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने पहिले सहस्रक ओलांडीत तब्बल 1 हजार 720 रुग्णसंख्येपर्यंत मजल मारली. उत्सवांचा कालावधी सरल्याने व पुढील महिन्याभरात अन्य दुसरा सण-उत्सव नसल्याने तालुक्याची रुग्णगती आहे त्यावरच कायम राहील असा काहीसा अंदाज होता. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांनीच तो फोल ठरविला आहे.
या महिन्याच्या पहिल्याच तारखेला दहा दिवस घराघरात विराजमान असलेल्या बाप्पांचे विसर्जन झाले. सायंकाळपर्यंत सर्वकाही आनंदात सुरु असतांना सायंकाळी पाच वाजता माळीवाड्यातील सत्तर वर्षीय इसमाचा घोटीतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची वेदनादायी वार्ता येवून धडकली आणि सकाळपासून उत्साहात सुरु असलेल्या विसर्जन सोहळ्याला गालबोट लागले. एवढ्यावरच न थांबता या वार्तेनंतर काही वेळातच कोविडने तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 42 रुग्णांची भर घातली. त्यानंतरचा प्रत्येक दिवस चढत्या आणि उतरत्या क्रमाने संगमनेरकरांना सलग धक्के देणाराच ठरला.
बुधवार 2 सप्टेंबररोजी समनापूरातील निवृत्त कामगार पोलीस पाटील, स.म.थोरात कारखान्याच्या माजी संचालकांचा कोविडने बळी घेतला त्यासोबतच तालुक्याच्या रुग्णसंख्येत 37 जणांची भरही पडली. गुरुवार 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय छायाचित्रकाराचा बळी जाण्यासोबतच 16 रुग्ण वाढले. गेल्या काही दिवसांतील वाढत्या आकडेवारीत ही संख्या कमी असल्याने संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसले. मात्र अवघ्या चोवीस तासांतच या दिलाशाचा फुगा फुटला आणि शुक्रवारी 4 सप्टेंबररोजी तालुक्याच्या कोविड इतिहासात केवळ दुसर्यांदा एकावेळी तब्बल 80 रुग्णांची खळबळजनक वाढ झाली. शनिवारनेही हाच सिलसिला सुरु ठेवित सकाळीच चंदनापूरीतील 39 वर्षीय तरुणाच्या मृत्युची धक्कादायक वार्ता देत सायंकाळ होता होता 66 रुग्णांची भर घातल्याने तालुका हादरला.
रविवार आणि सोमवारही संगमनेरकरांना धक्का देणाराच ठरला. रविवारी (ता.6) संगमनेर शहरातील गिरीराजनगर येथील 59 वर्षीय इसम, पंपींग स्टेशन परिसरातील महिला, पावबाकी रस्त्यावरील इसम आणि चिखलीतील वयोवृद्ध महिला अशा चार जणांच्या बळींसह तालुक्याच्या रुग्णसंख्येत 41 जणांची भर पडल्याने तालुक्यात कोविडची दहशत निर्माण झाली. सोमवारीही रुग्णवाढीची श्रृंखला अबाधित राहतांना 52 जणांची वाढ झाली. सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांतच शहराच्या रुग्णसंख्येत सरासरी 47.71 च्या वेगाने भर पडून 334 रुग्णांची वाढ झाल्याने तालुक्याने बाधितांचे दुसरे सहस्रकही ओलांडले. धक्कादायक बाब म्हणजे या सात दिवसांत शहर व तालुक्यातील आठ जणांचा बळीही गेला. त्यामुळे येणार्या कालावधीत संगमनेर तालुक्याची कोविड स्थिती आणखी गंभीर होणार असल्याचेच संकेत या सात दिवसांनी दिले आहेत. प्रत्येक नागरिकाने नियमांचे पालन केले तरच आजची भयानक अवस्था बदलेल, अन्यथा 0.26 पासून सुरु झालेला रुग्णवाढीचा दर आज 49 रुग्ण प्रति दिवस या गतीवर पोहोचला आहे, उद्या तो कोठे असेल याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येपासून तालुक्याच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण या आकडेवारीतून समोर येते. यापुढील काळातही कोविडचा सहवास कायम राहणार आहे. सध्या पितृपक्ष व नंतर पुण्यकर्माचा अधिकमास असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची शक्यता आहे. पितृपक्षातील जेवणावळीतून अकोल्यात अख्खं कुटुंब आणि श्राद्ध जेवणारे बाधित झालेत, असेच प्रकार यापुढेही घडण्याची दाट शक्यता आहे. आपले स्नेही, आप्त आणि कुटुंबिय हसतखेळत असतांना त्यांच्यावर रुग्णालयाच्या दारात जाण्याची वेळ येवू नये यासाठी नियमांचे पालन आणि श्राद्ध, सण-उत्सवांसाठी गर्दी करण्याचा मोह टाळण्याची गरज आहे, अन्यथा कोविड आपणास मिठी मारण्यासाठी तत्परच आहे याचे भान ठेवण्याची गरज आहे.