रूढी परंपरांना फाटा देत केले वडिलांचे पुण्यस्मरण सामाजिक संस्थांना देणगी देऊन व्याख्यानाचे केले आयोजन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पारंपारिक रूढी परंपरांना फाटा देत व दुःखाला आवर घालत वडिलांनी दिलेली अर्थ साक्षरतेची शिकवण अंमलात आणत अर्थ, आरोग्य व अध्यात्म हा मंत्र जपत प्रीतम व प्रगती या दोन्ही मुलींनी वडिलांचे प्रथम पुण्यस्मरण सामाजिक संस्थांना देणगी व अर्थ साक्षरता, आरोग्य व अध्यात्म जागृतीसाठी व्याख्यानाचे आयोजन करून केले. यावेळी स्वर्गीय पतिंगराव रघुनाथ देशमुख यांना प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन केले.
पुणे येथील बार्कलेज कंपनीच्या उपाध्यक्षा प्रीतम व नाशिक येथील एच. पी. टी. व आर. वाय. के. महाविद्यालयाच्या प्रा. प्रगती यांचे वडील आणि सुकेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी मुख्याध्यापिका प्रणिता देशमुख यांचे पती पतिंगराव देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरण घुलेवाडी येथील पाहुणचार लॉन्स येथे आयोजित करण्यात आले होते. अर्थ, आरोग्य व अध्यात्म अशी संतुलित जीवनशैली जगलेले पतिंगराव देशमुख यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी देशमुख परिवाराने म्युच्युअल फंड वितरक, विमा व गुंतवणूक सल्लागार सुनील कडलग यांचे ‘नव्या युगाचे आर्थिक नियोजन,’ नाईन पर्ल्स हॉस्पिटल नाशिकचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र देशमुख यांचे ‘आरोग्यदायी जीवनशैली व हृदयविकार’ आणि दीपक महाराज देशमुख यांचे ‘विज्ञान व अध्यात्म-एक विचार’ या व्याख्यानांचे आयोजन केले होते.
याशिवाय अवयवदान, देहदान व रक्तदान, स्वच्छता व पर्यावरण यासाठी सामाजिक चळवळ उभी करणार्या आदित्य घाडगे यांच्या यशस्वी फाउंडेशन, एड्सग्रस्त मुलांसाठी काम करणार्या संतोष पवार यांच्या स्वयंप्रेरित सामाजिक संस्था व सखाराम महाराज तांगडे यांच्या वारकरी व सांप्रदायिक शिक्षण देणार्या सांदिपनी व गुरुकुल शिक्षण संस्थेस आर्थिक मदत आणि मतीमंद मुलांसाठी काम करणार्या अनिकेत सेवाभावी संस्था भुगाव यांना धान्याची मदत केली. तसेच जवळे कडलग येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयास पुस्तकरुपी देणगी देऊन वडिलांचे विचार आचरणात आणून समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी कार्य केले.
राज्य व केंद्र सरकार दरवर्षी अर्थसंकल्प जाहीर करते. त्याप्रमाणे प्रत्येकाने दरवर्षी स्वतःचा अर्थसंकल्प तयार करावा. जीवन विमा, आरोग्य विमा व म्युच्युअल फंडस् गुंतवणुकीच्या माध्यमातून महागाईवर मात करता आल्यास जीवनातील उद्दिष्टे साध्य करता येतील असे सुनील कडलग यांनी सूचविले. अनेक रुग्ण रक्तदाब व मधुमेहाच्या गोळ्या घेणे टाळतात. मात्र यामुळेच शरीरातील महत्त्वपूर्ण अवयव निकामी होतात. योग्य आहार-विहार, पुरेसा व्यायाम हे मंत्र निरोगी जीवनशैली देऊ शकतील असे डॉ. राजेंद्र देशमुख म्हणलो. विज्ञान व अध्यात्म यांच्या यांचा समन्वय साधल्यास मानवाची प्रगती होऊ शकेल असे देशमुख महाराज म्हणाले. याप्रसंगी सामाजिक संस्थांना मदत करण्यासाठी प्रीतम देशमुख यांचे पती दिलीप कदम, प्रगती देशमुख यांचे पती डॉ. साईनाथ आहेर यांनी हातभार लावला. आभार प्रदर्शन संजय देशमुख यांनी केले.