महेश नागरी पतसंस्थेला दोन कोटी अकरा लाखांचा नफा सीए. कैलास सोमाणी; सभासदांना पंधरा टक्के दराने लाभांश वाटप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जेव्हा व्यापाराची भरभराट होते, तेव्हाच विकास साधला जावू शकतो. संगमनेर शहराकडे जिल्ह्यातील आघाडीची बाजारपेठ म्हणून बघितले जाते. ही बाजारपेठ समृद्ध होण्यात तालुक्यातील विविध आर्थिक संस्थांचा वाटा असून त्यात महेश नागरी सहकारी पतसंस्था अग्रणी आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात संस्थेने शंभर कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडला असून सुमारे ७५ कोटींचे कर्ज वितरण करताना व्यापारी वर्गाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. याच बळावर गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने २ कोटी ११ लाखांचा निव्वळ नफा कमावला असून थकबाकीही नगन्य असल्याची माहिती महेश नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सीए. कैलास सोमाणी व उपाध्यक्ष योगेश रहातेकर यांनी दिली.
संगमनेरच्या पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या महेश नागरी पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी मंचावर संस्थेचे संचालक मंडळ व व्यवस्थापक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सभासदांसमोर संस्थेच्या आर्थिक पत्रकांचे तपशिलवार विवेचन करताना अध्यक्ष सोमाणी यांनी अत्यंत मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण उत्तरे देत सभासदांचे समाधान केले. बँकेची आर्थिक प्रगती, गेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवींमध्ये झालेली जवळपास ३६ टक्के वाढ आणि चालू आर्थिक वर्षासाठी निश्चित उद्दिष्ट यावर भाष्य करताना सरलेल्या वर्षात संस्थेला २ कोटी ११ लाख रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा झाल्याने सभासदांना १५ टक्के दराने लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला, त्याला सभासदांनी एकमुखाने संमत करताच काही मिनिटांतच सभासदांच्या खात्यांवर लाभांशाची रक्कम जमा झाली.
ही पतसंस्था शहरातील आघाडीच्या आर्थिक संस्थांमध्ये गणली जाते. ३१ मार्च अखेरपर्यंत संस्थेने निश्चित केलेले १०० कोटी रुपयांच्या ठेवींचे उद्दिष्ट ओलांडले आहे. चालू आर्थिक वर्षात त्यात ३५.७७ टक्क्यांची भर पडली आहे. व्यापार क्षेत्रातील प्रामाणिक आणि होतकरु कर्जदारांना ७४ कोटी ८० लाख रुपयांची कर्ज देण्यात आली असून संस्थेच्या थकबाकीचे प्रमाण अगदीच नगण्य २.६५ टक्के इतके आहे. संस्थेच्या विनाजोखीम गुंतवणुकीची रक्कम ४४ कोटी ४४ लाखांची असून स्वनिधी १३ कोटी ५४ लाख इतका झाला आहे. यावेळी शोभा पोफळे, ओंकारनाथ भंडारी, केदारनाथ राठी, राणीप्रसाद मुंदडा, प्रकाश कलंत्री, प्रकाश राठी, गणेश बाहेती, मनीष मणियार, अनीष मणियार आदी सभासदांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करताना आगामी आर्थिक वर्षात संस्था निश्चित उद्दिष्ट प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला.
भंडारी मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सभेला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विद्यमान अध्यक्ष डॉ. शशिकांत पोफळे, उपाध्यक्ष विशाल नावंदर, संचालक मंडळाचे सदस्य अनिल आट्टल, योगेश जाजू, आनंद तापडे, नंदकिशोर कलंत्री, श्रीकांत मणियार, संतोष चांडक, निलेश बाहेती, दिनेश सोमाणी, राजेश लड्डा, सुदर्शन लाहोटी, मोरेश्वर कोथमिरे, नानासाहेब शेरमाळे, ज्योती कासट, सरला आसावा तसेच संस्थेचे अंतर्गत लेखापरीक्षक सीए. जितेन्द्र लाहोटी, कायदे विषयक सल्लागार ज्योती मालपाणी आदिंसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवस्थापक दिगंबर आडकी यांनी ताळेबंद व नफा-तोटा पत्रकाचे वाचन केले. जयप्रकाश भुतडा यांनी स्वागत व उपाध्यक्ष योगेश रहातेकर यांनी आभार मानले.