राहाता पालिकेची अनधिकृत अतिक्रमणावर धडक कारवाई भल्या पहाटेच कारवाई झाल्याने नागरिकांसह व्यावसायिकांची उडाली धावपळ
![]()
नायक वृत्तसेवा, राहाता
शहरातील चितळी रस्त्यालगत अनेक नागरिकांनी नगरपरिषदेच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते. याबाबत नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी सुध्दा केलेल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत नव्याने हजर झालेले मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी अनधिकृतरित्या केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी शुक्रवारी (ता.18) मोहीम राबवली.

भल्या पहाटे मुख्याधिकारी चव्हाण जेसीबी, ट्रॅक्टर, पालिका कर्मचार्यांच्या फौजफाट्यासह अतिक्रमण स्थळी दाखल झाले. अतिक्रमण केलेल्या रहिवाशी आणि व्यावसायिकांना या कारवाईबद्दल पूर्वकल्पना नसल्याने त्यांची चांगलीच धावपळ उडाली. साधारण 15 ते 20 वर्षांपूर्वी पासूनची आपली दुकाने तोडली जात असल्याने व्यावसायिकांचा नक्कीच संताप झाला होता. मात्र पालिकेच्या कारवाईपुढे त्यांचा नाईलाज झाला. अतिक्रमण काढण्यास आमची हरकत नसून, आम्हांला पूर्वकल्पना द्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया अतिक्रमणधारकांची होती.

मुख्याधिकारी चव्हाण हे एक महिन्यापूर्वी राहाता पालिकेत रुजू झाले असल्यामुळे शहरात अद्याप त्यांचा चेहरा अनेकांना परिचित नाही. त्यातल्या त्यात अतिक्रमण कारवाईसाठी ते ओळखपत्र न लावताच नाईट ड्रेसवर उपस्थित राहिल्याने काही नागरिकांनी त्यांना ओळखले नसल्याने वादविवाद झाले. काही काळ मुख्याधिकारी आणि अतिक्रमणधारक यांच्यात शाब्दिक बाचाबाची देखील झाली. ते मुख्याधिकारी असल्याचे समजताच संबंधितांनी शांत राहणेच पसंत केले.

नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण करत अनेक नागरिक अवैध व्यवसाय करत असल्यामुळे शहरात सतत शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहेत. यामुळे नगरपरिषदेच्यावतीने अशा प्रकारची अनधिकृत अतिक्रमणे तत्काळ काढून घेतली जातील. तसेच नागरिकांनी यापुढे शासकीय किंवा नगरपरिषदेच्या जागेवर अतिक्रमण करू नये. अन्यथा अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करून अतिक्रमण काढले जाईल. तसेच यात कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती मुख्याधिकारी चव्हाण यांनी दिली. या कारवाईची राहाता शहरात चांगलीच चर्चा रंगली असून इतर अतिक्रमण धारकांनी मोठा धसका घेतला असून शहरातील अवैध बांधकाम तसेच सर्वच अतिक्रमणांवर हातोडा चालवला जाणार का हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.

नगरपालिकेच्या शासकीय जागेमध्ये नागरिकांनी अतिक्रमण करू नये. तसे केले असल्यास ते तत्काळ काढून घ्यावे. अन्यथा पालिका प्रशासन त्यावर कारवाई करेल.
– चंद्रकांत चव्हाण (मुख्याधिकारी-राहाता नगरपरिषद)
