नगरसह संगमनेर तालुक्यात दरोडा टाकणारे दोघे जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पावबाकी, सुकेवाडी येथील गुन्हे उघडकीस

नायक वृत्तसेवा, नगर
येथील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील कल्याण रोड तसेच संगमनेर तालुक्यातील पावबाकी, सुकेवाडी येथील घरात प्रवेश करून, चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. रावन ऊर्फ छनक नादर चव्हाण (वय 23) व फिलीप नादर चव्हाण (वय 23, दोघे रा. सालेवडगाव रोड, चिंचोडी पाटील, ता. नगर) अशी जेरबंद केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

कल्याण रोडवरील यश उमेश शेळके (वय 22) यांच्यासह त्यांच्या शेजारी राहणारे तीन साक्षीदार यांच्या घरी सहा ते सात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून 4 लाख 30 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देवून, निरीक्षण करून पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करून दरोडेखोरांना अटक करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक कटके यांनी सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, अंमलदार मनोहर शेजवळ, सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बापूसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, फकीर शेख, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, शंकर चौधरी, विशाल दळवी, संदीप दरदंले, सचिन आडबल, भीमराज खर्से, दीपक शिंदे, जालिंदर माने, विनोद मासाळकर, आकाश काळे, रणजीत जाधव, योगेश सातपुते, मेघराज कोल्हे, सारीका दरेकर, बबन बेरड, संभाजी कोतकर, अर्जुन बडे व भरत बुधवंत अशा पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या विशेष पथकाची नेमणूक केली होती.

सदरचे गुन्हे प्रशांत ऊर्फ धोळ्या चव्हाण (रा. सालेवडगाव रोड, चिचोंडी पाटील) याने त्याचे पाच ते सहा साथीदारांसह केला असून ते सर्व चिचोंडी पाटील शिवारातील सालेवडगाव रोडवरील माळरानावर लपून बसलेले आहे, अशी माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यांनी पथकास कळवत खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी वेशांतर करून सालेवडगाव येथे जावून माळरानाची पाहणी सुरू केली असता त्यांना सहा ते सात इसम एका लिंबाच्या झाडाखाली बसलेले दिसले. त्यांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते माळरानावर पळू लागले.

पथकाने पाठलाग करून दोन संशयितांना ताब्यात घेतले व त्यांचे इतर साथीदार डोंगरातील झाडाझुडूपांचा सहारा घेवून पळून गेले. ताब्यात घेतलेल्या रावन ऊर्फ छनक नादर चव्हण, फिलीप नादर चव्हाण यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना अटक केली. या आरोपींनी पावबाकी, सुकेवाडी येथे घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून चोरी केल्याची कबुली दिल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल दरोडा, चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. दोघे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात संगमनेर शहर, नगर तालुका, कोतवाली, अंभोरा (जि. बीड) पोलीस ठाण्यात दरोडा, घरफोडी आदी कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
