संगमनेरात कारवाईच्या भयातही गोवंशाची कत्तल! गोवंश मांसाचे सरकारी दरही वाढले; संगमनेर पोलिसांची पुन्हा कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील सर्वात मोठी कारवाई झाल्यापासून कथीत स्वरुपात बंद असलेल्या संगमनेरातील कत्तलखान्यातून ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी गोवंश जनावरांच्या रक्ताचे पाट वाहिले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या पथकाने छापा घालीत कारवाई केली. त्यातून 250 किलो कत्तल झालेल्या जनावरांच्या मांसासह पोलिसांनी 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी जमजम कॉलनीतील अब्दुल हमीद अहमद कुरेशी या कसायावर गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड करण्यात आले आहे. या कारवाईने संगमनेरात अद्यापही लपूनछपून का असेना गोवंशाच्या कत्तली होतच असल्याचेही उघड झाले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करण्यात आली, मात्र त्याबाबतचा गुन्हा सहा तासांच्या विलंबाने मध्यरात्रीच्या सुमारास दाखल करण्यात आला. त्यानुसार भारतनगर परिसरातील जमजम कॉलनीच्या गल्ली नंबर नऊमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली. त्यानुसार त्यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्यासह तेथे छापा घातला असता एका वाड्यात रक्ताच्या थारोळ्यात गोवंशाचे कापलेले मांस साठवून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले.

तेथील सर्व मांस जप्त करुन खासगी वाहनाद्वारे त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई गणेश घुले यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अब्दुल हमीद अहमद कुरेशी (वय 29, रा.जमजम कॉलनी) याच्या विरोधात भा.दं.वि. कलम 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याचे कलम 5 (अ), 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला रात्रीच अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालसासमोर उभे केले जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

गेल्या वर्षी गांधी जयंतीच्या दिनी (2 ऑक्टोबर) अहमदनगरच्या पोलीस पथकाने संगमनेरातील साखळी कत्तलखान्यांवर छापा घातला होता. त्यावेळी भारतनगर व जमजम कॉलनी परिसरातील या सर्व कत्तलखान्यांमधून सुमारे 31 हजार किलो कापलेल्या गोवंश जनावरांच्या मांसासह 71 जिवंत जनावरे, चार वाहने व अन्य साहित्य असा एकूण 1 कोटी 4 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता. या प्रकरणी पोलिसांनी नऊ कत्तलखाना चालकांसह एकूण बारा जणांवर गुन्हे दाखल करुन त्यातील सहा जणांना अटक केली होती. त्यातील दोघांची गेल्या मंगळवारी उच्च न्यायालयाच्या आदेशाने जामिनावर सुटका झाली, तर त्याच दरम्यान पसार असलेल्या दोघांना पोलिसांनी गजाआड केले.

राज्यात आजवर सर्वात मोठ्या ठरलेल्या या कारवाईनंतर संगमनेरातील हिंदुत्त्ववादी संघटनांनी आंदोलनही केले होते. तर येथील कत्तलखाने पुन्हा सुरु होवू देणार नाही असे सांगत पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी कत्तलखान्यांच्या परिसरात पोलिसांची राहुटी उभारुन 24 तास गस्तीवाहनाची नेमणूक केली होती. त्यामुळे तेव्हापासून संगमनेरातील गोवंश कत्तलखाने बंद असल्याचे समजले जात होते. मात्र शुक्रवारच्या कारवाईतून पोलिसांचे कत्तलखान्यांच्या परिसराकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष होवू लागल्याचे दिसून आले आहे. गेल्या मोठ्या कालावधीपासून येथील कत्तलखाने बंद असल्याने साडेतीन महिन्यांपूर्वी शंभर रुपये प्रतीकिलो मिळणार्या गोवंश मांसांची किंमत आता 250 रुपयांवर पोहोचल्याचेही पोलीस अहवालावरुन समोर आले आहे.

शुक्रवारी पोलिसांनी जमजम कॉलनीत छापा घातला त्यावेळी 2 ऑक्टोबर रोजी कारवाई झालेल्या आणि सध्या कारागृहात कैद असलेल्या वाहिद कुरेशी याच्या वाड्यावरच तो पडल्याची जोरदार चर्चा गावभर पसरली होती. त्यातच सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या कारवाईचा गुन्हा दाखल करण्यासही मोठा विलंब झाल्याने ही चर्चा खरी वाटू लागलेली असतांनाच पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास अब्दुल हमीद अहमद कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल करुन ही चर्चा थांबविली.

