वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायची सोडत नाही ः पिचड अकोले नगरपंचायत निवडणूक; भाजप-आरपीआय युतीचा प्रचार सुरू

नायक वृत्तसेवा, अकोले
वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायची सोडत नाही. मी म्हातारा झालो तरी विरोधकांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. आपण 40 वर्षे तालुक्याच्या विकासाचे काम केले. कुणाचे वाईट कधी केले नाही. कधीही गोरगरिबांचे रेशन चोरले नाही व चोरुही दिले नाही, असा टोला लगावत आमदारांनी तालुका जातीद्वेशाच्या दिशेने चालवला असल्याचा आरोप मधुकर पिचड यांनी केला.

अकोले नगरपंचायतची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीसाठी भाजपने अकोले शहरातील गुजरी बाजार येथे नुकतीच सभा घेतली. भाजप, आर. पी. आय. युतीच्या प्रचार प्रारंभ माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते व सुभाष कोळपकर यांचे अध्यक्षतेखाली खाली झाला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचे नाव न घेता टीका केली. याप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड, हेमलता पिचड, जिल्हा परिषद सदस्य कैलास वाकचौरे, जालिंदर वाकचौरे, ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ, आर. पी. आय. नेते विजय वाकचौरे, चंद्रकात सरोदे, शांताराम संगारे, जे. डी. आंबरे, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, कल्पना सुरपुरिया, सुधाकर देशमुख, परशराम शेळके, शब्बीर शेख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना माजी मंत्री पिचड म्हणाले, आमदारांनी उच्चस्तरीय कालव्याचे म्हाळादेवी जलसेतूच्या एका पाईप हलविण्याच्या कामासाठी सर्वपक्षीय आंदोलन करुन व एक महिन्यात काम करुन पाणी देवू असा शब्द दिला होता. त्याला चार महिने होऊन गेले. अद्याप पाणी नाही. आपण भांगरे यांचे नाव भंडारदरा धरणाला द्यावा ही मागणी केली, कारण राघोजी भांगरे आपला आहे. विल्सन आपला बाप नाही. येत्या 18 डिसेंबरला केंद्रीय गृहमंत्री प्रवरानगरला येत आहेत. त्यांना भेटून निवेदन देवून धरणाला राघोजी भांगरेचे नाव देण्याची मागणी करणार आहे. तालुक्यात आमदार बदलता येईल मात्र अकोलेला वगळून गेलेला रेल्वेमार्ग बदलता येणार नाही. अकोलेच्या देवठाणहून जाणारा रेल्वेमार्ग साकूर मार्गे नेला जात आहे. हा आमदारांचा नाकर्तेपणाचा कळस असल्याचा दावाही त्यांनी केला.

माजी आमदार वैभव पिचड म्हणाले, अकोले नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपने दिलेले सर्व उमेदवार उच्चशिक्षित, सुशिक्षित आहेत. कुणावरी कसलाही गुन्हा दाखल नाही. चारित्र्यसंपन्न उमेदवार आहेत. पुन्हा तीच ती मंडळी दिली. काहीजण निवडून आल्यानंतर नगरपंचायत विकासाचा प्रश्न आला की वादावादी करतात. ते कोण आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. मागील पाच वर्षांत ग्रामपंचायतची नगरपंचायत झाल्यानंतर खर्या अर्थाने शहराच्या विकासाला सुरवात झाली. शहारातील माळीझाप ते शेकईवाडीपर्यंत सर्व प्रभागांत रस्ते, बंद गटारी, शौचालये आदी अनेक विकासकामे झालीत. आपण जिल्हा नियोजन समितीवर सोनाली नाईकवाडी यांना पाठवले. त्यांच्या माध्यमातूनही अनेक कामे शहरात झाली, असे वैभव पिचड यांनी सांगितले.
