जिल्हा रुग्णालयाने लपविलेले कोविड मृत्यू आता भरवताहेत धडकी! जिल्ह्यातील रुग्णसंख्या ओसरली; मात्र दडविलेल्या मृत्यूच्या आकड्यातून भीतीदायक वातावरण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सलग दोन महिने दररोज उसळी घेणार्‍या रुग्णसंख्येने हादरलेला अहमदनगर जिल्हा गेल्या सतरा दिवसांपासून टप्प्याटप्प्याने पूर्वपदावर येत असताना आता सरकारी यंत्रणेच्या लपवाछपवीतून जिल्ह्याला पुन्हा एकदा ‘घाम’ फुटला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाने गेल्या अनेक दिवसांपासून दडवून ठेवलेले कोविड मृतांचे आकडे वरीष्ठांनी कान उघडणी केल्यानंतर आता एकाचवेळी राष्ट्रीय कोविड पोर्टलवर नोंदविण्यास सुरुवात झाल्याने जिल्ह्यात मानवनिर्मित भीती निर्माण झाली आहे. मागील केवळ सतरा दिवसातच जिल्ह्यातील 2 हजार 120 नागरिकांचा कोविडने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही संख्या सर्वाधीक संक्रमणाच्या महिन्यापेक्षा जवळपास दुप्पट आहे. पुढील काही दिवस हा ‘खेळ’ असाच सुरु राहणार असल्याने कोविड मुक्तिच्या प्रवासाचा आनंद घेवू पाहणार्‍या जिल्हावासीयांना तूर्त दिलासा मिळण्याची शक्यता मावळली आहे.


गेल्या वर्षी जिल्ह्यात शिरलेल्या कोविडच्या विषाणूंनी डिसेंबरपर्यंतच्या दहा महिन्यात जिल्ह्यातील 69 हजार 14 जणांना बाधित केले तर 1 हजार 45 जणांचा बळीही घेतला. महिन्यानुसार या कालावधीत झालेल्या मृत्यूची सरासरी 217 मृत्यू प्रती महिना अशी होती, तर दहा महिन्यांच्या कालावधीतील दिवसनिहाय सरासरीनुसार 305 दिवसांत दररोज जिल्ह्यातील अवघ्या तीन जणांचा मृत्यू झाला. मात्र चालू वर्षातील मार्चमध्ये कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेत बाधितांच्या उच्चांकी संख्येसह मृत्यूचे आकडेही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले. मात्र या कालावधीत मृत्यूचे आकडे लपविले गेल्याने ते समोरच आले नाहीत. ही गोष्ट पंतप्रधानांसोबतच्या बैठकीतून समोर आल्यानंतर वरीष्ठांनी जिल्हा रुग्णालयाची खरडपट्टी काढली आणि त्यानंतर आता लपविलेले आकडे राष्ट्रीय कोविड पोर्टलवर नोंदविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

मागील वर्षीच्या दहा महिन्यांच्या तुलनेत चालू वर्षातील बाधितांसह कोविड मृत्यूचे आकडे हादरवणारे असल्याचेही गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. 1 जानेवारी ते 17 जून या 168 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल 2 लाख 5 हजार 524 रुग्णांची भर पडली. यावरुन मागील वर्षभरातील रुग्णसंख्येपेक्षा या वर्षातील अवघ्या साडेपाच महिन्यात समोर आलेली रुग्णसंख्या तिपटीहून अधिक आहे. तर डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात केवळ 1 हजार 45 नागरिकांचा मृत्यू झाला होता, मात्र दुसर्‍या लाटेत हि संख्या चार पटीने वाढून जिल्ह्यातील 4 हजार 293 नागरिकांचा जीव गेला. महिन्यानुसार सरासरी पाहता या साडेपाच महिन्यात जिल्ह्यात प्रत्येक महिन्यात 34 हजार 254 रुग्णांची वाढ झाली तर महिन्याभरात 716 रुग्णांचा बळी गेला. तर दिवसानुसार प्रत्येक दिवशी जिल्ह्यात 1 हजार 223 रुग्णांची भर पडली व दररोज जिल्ह्यातील 26 जणांचा मृत्यू झाला.

जानेवारीत जिल्ह्यात 3 हजार 363 जणांना कोविडची बाधा झाली तर 54 जणांचा बळी गेला. फेब्रुवारीत 3 हजार 504 रुग्ण समोर येवून 44 जणांना आपला जीव गमवावा लागला. मार्चमध्ये कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेने जिल्ह्यात कहर करतांना पहिल्यांदाच महिन्याभरात 19 हजार 41 जणांना बाधा होवून 75 जणांचा मृत्यू झाला. एप्रिलमध्ये बाधितांची संख्या चौपटगतीने वाढून 80 हजार 118 रुग्ण समोर आले व 775 जणांचा बळी गेला. मे महिना जिल्ह्यातील कोविड संक्रमणाचे सर्व उच्चांक मोडणारा ठराला. या महिन्यातील 31 दिवसांत जिल्ह्यात तब्बल 87 हजार 95 रुग्ण समोर आले व 1 हजार 225 रुग्णांचा मृत्यू झाला. जानेवारीपासून मे पर्यंतच्या पाच महिन्यात जिल्ह्यातील कोविडचे चित्र भयानक अवस्थेत पोहोचून प्रति महिना 38 हजार 624 रुग्ण या वेगाने जिल्ह्यात तब्बल 1 लाख 93 हजार 121 रुग्णांची भर पडली, तर प्रत्येक महिन्यात 435 मृत्यू या प्रमाणे या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील 2 हजार 173 बाधितांचा बळीही गेला.

जूनमध्ये जिल्ह्याच्या रुग्णसंख्येला ब्रेक लागून कोविड संक्रमणाची दुसरी लाट ओसरु लागली. मात्र तत्पूर्वी सर्वाधीक संक्रमण असलेल्या देशातील दहा जिल्ह्यात अहमदनगरचा समावेश झाल्याने संपूर्ण देशाचे लक्ष्य जिल्ह्यावर केंद्रीत झाले होते. त्याचा परिणाम पालकमंत्र्यांच्या भेटी वाढण्यासह मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष्यही जिल्ह्यावर केंद्रीत झाले आणि केंद्र सरकारही सजग झाले. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचे आकडे पोर्टलवर नोंद करण्याच्या कामात दिरंगाई सुरु झाली. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या आलेखानुसार बाधितांच्या उच्चांकी संख्येनंतरही जिल्ह्यातील मृतांची संख्या मात्र अत्यंत कमी दिसत असल्याने या सर्वच घटकांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेची कानउघडणी करण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांनीही याबाबत जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष्य वेधल्यानंतर गेल्या 10 जूनपासून यापूर्वी ‘दडवून’ ठेवलेले मृतांचे आकडे राष्ट्रीय कोविड पोर्टलवर नोंदविण्यास सुरुवात झाली असून मागील सतरा दिवसांतच दररोज सरासरी 125 मृत्यू या प्रमाणे आत्तापर्यंत 2 हजार 120 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. आकड्यांचा हा खेळ यापुढील काही दिवस असाच सुरु राहणार असल्याने एकीकडे ओसरत्या रुग्णसंख्येचा आनंद तर दुसरीकडे वाढत चाललेल्या मृत्यूच्या आकडड्यांचा धक्का सहन करण्याची पाळी जिल्हावासियांवर आली आहे.


1 जानेवारीपासून 31 मे पर्यंतच्या 151 दिवसांत जिल्ह्यात सरासरी दररोज 1 हजार 279 रुग्ण या गतीने 1 लाख 93 हजार 121 रुग्णांची भर पडली. तर या कालावधीत सरासरी दररोज 14 मृत्यू याप्रमाणे जिल्ह्यातील 2 हजार 173 जणांचा कोविडने जीव घेतला. या कालावधीतील बाधितांची संख्या ज्या गतीने वाढली, त्या गतीने मृत्यूचे आकडेही समोर येणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयाने मृत्यूचे आकडे दाबून ठेवल्याने त्याचा परिणाम गेल्या 17 दिवसांत दिसून येत आहे. जूनमधील गेल्या 17 दिवसांत जिल्हा आरोग्य यंत्रणेने राष्ट्रीय पोर्टलवर नोंदविलेल्या मृत्यूच्या आकड्यांनुसार जिल्ह्यात दररोज सरासरी 125 नागरिकांचा मृत्यू होत असून या सतरा दिवसांतच मागील पाच महिन्यांच्या एकूण संख्येएवढे म्हणजे 2 हजार 120 जणांचे बळी गेले आहेत. यावरुन जिल्हा आरोग्य यंत्रणेची ‘लपवाछपवी’ अगदी सुस्पष्टपणे समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *