बळजोरीचा ‘संप’ घडवू पाहणार्या सातजणांवर गुन्हा! संगमनेरच्या दिल्ली नाक्यावरील प्रकार; वाहनचालकांना सुरु होता अटकाव..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अपघात करुन पळून जाणार्या (हिट अँड रन) वाहनचालकांना अधिक कठोर शिक्षा देण्याच्या केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांना वाहतूकदारांकडून विरोध होत आहे. याबाबत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी संपही पुकारण्यात आला होता, मात्र केंद्राच्या आश्वासनानंतर तो स्थगितही झाला होता. आता वाहतुकदारांच्या एका गटाने पुन्हा याच विषयावरुन बुधवारपासून संपाची हाक दिली. त्याचे परिणाम दिसत असतानाच संगमनेरात बळजोरीने संपात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न करणार्या सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण प्रचंड वर्दळीच्या दिल्लीनाका परिसरात रस्त्यावरच थांबून हातवारे करीत होते. त्यांच्या अशा कृत्याने वाहनांचा खोळंबाही झाला. शहर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत रस्ता मोकळा.

केंद्र सरकारने पूर्वीच्या भारतीय दंडसंहितेऐवजी आता देशात भारतीय न्याय संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने लागू होणार्या या देशी कायद्यांमध्ये निष्काळजीपणानेे वाहन चालवून अपघात कारणीभूत ठरणारा वाहनचालक अपघातानंतर पोलीस अथवा आरोग्य यंत्रणांना माहिती न देता पळून गेल्यास त्याला दहा वर्षांचा सश्रम कारावास आणि सात लाख रुपयांचा दंड होवू शकतो. याच तरतुदीला देशभरातील वाहनचालकांनी विरोध दर्शविला आहे.

कोणत्याही अपघात घडल्यानंतर जमणारा जमाव उग्र होतो. अशावेळी जखमींना मदत करण्याच्या भावनेतून वाहनचालक तेथे थांबल्यास जमावाच्या मारहाणीत त्याच्या जीविताचा प्रश्न निर्माण होवू शकतो. आता जीव वाचवण्यासाठी तेथून पळून गेल्यास दहा वर्ष कारावास आणि दंडही भरावा लागणार आहे. या तरतुदी सौम्य करण्याची मागणी वाहतुकदारांकडून केली जात आहे. अर्थात अपघातानंतर थांबून जखमींना मदत करणार्या आणि यंत्रणांना कळवणार्या वाहनचालकांची शिक्षा मात्र कमी करण्यात आली आहे.

दहा वर्षाच्या शिक्षेची तरतुद सौम्य करावी या मागणीसाठी देशभरातील वाहतुकदारांनी 1 जानेवारी रोजी संप पुकारला होता. केंद्र सरकारने कायद्याचा मसुदा लागू करण्यापूर्वी वाहतुकदार संघटनेला विश्वासात घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेण्यात आला. मात्र वाहतुकदारांच्या एका गटाने केंद्राने दहा दिवसांत कोणतीच कृती केली नसल्याचे सांगत बुधवारपासून पुन्हा संपाची हाक दिली. त्यामुळे रस्त्यावरील वर्दळीवर त्याचा परिणाम दिसत असतांनाच आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सदरचा प्रकार समोर आला.

संगमनेर शहरातील दिल्लीनाका (तीनबत्ती चौक) म्हणजे नाशिक, धुळे, शिर्डी, नगर, औरंगाबाद व पुण्याकडे होणार्या वाहतुकीचे जंक्शन मानले जाते. 24 तास हा चौक मालवाहतूक आणि प्रवाशी वाहनांनी गजबजलेला असतो. आज सकाळी अकराच्या सुमारास अचानक काहीजण रस्त्यातच वाहने उभी करुन येणार्या-जाणार्या वाहनांना अडथळा निर्माण करीत होते. यावेळी काहीजण ओरडून ‘गाड्या उभ्या ठेवा, रस्त्यावर एकही गाडी चालणार नाही’ असे म्हणूत विचित्र हातवारे करीत होते. बराचवेळ सुरु असलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती मिळताच शहर पोलीस तीनबत्ती चौकात हजर झाले.

यावेळी समीर चाँदमिया शेख (रा.नायकवाडपूरा), सलिम उमेद बागवान (रा.चांदवड, जि.नाशिक), रईस शेख, तौफिक शेख शाहरुक शेख, शकिल दबेदार, मुन्ना शेख व इतर तीन ते सात इसम वरील कृत्य करताना दिसून आले. त्या सर्वांना तेथून बाजूला करुन पोलिसांनी वाहतुक सुरुळीत केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील सातजणांवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 341, 342, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

