लम्पी रोगामुळे मातीच्या बैलांना मिळाले मोल निर्बंधांमध्ये बैलपोळा शेतकर्यांनी केला साजरा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
लम्पीची साथ यंदाही वाढली आहे. तसेच दिवसेंदिवस जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. परिणामी बळीराजाच्या जीवाला चांगलाच घोर लागला आहे. सलग दुसर्या वर्षी पोळा सणावर लम्पीचे सावट राहिले. निर्बंधामुळे शेतकर्यांना हा सण साजरा करता आला नाही. या साथीने पशुधनाची माती करून टाकली आहे. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या बैलाला मोल आल्याचे पाहायला मिळाले.
लम्पी साथरोगाच्या प्रतिबंध, निर्मूलनासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जनावरांची आवक-जावक, आठवडे बाजार, शर्यती, प्रदर्शनांवर निर्बंध घातले आहेत. एका राज्यातून दुसर्या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसर्या बाधित जिल्ह्यात जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादूर्भाव होतो. ही साथ विषाणूजन्य सांसर्गिक असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून अहमदनगर जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेली आहे.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहमदनगर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे शेतकर्यांना पोळ्याचा सण साजरा करता आला नाही. गोजातीय प्रजातीची सर्व गुरे, म्हशी यांची ज्याठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात, त्याठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली होती.