संगमनेरच्या तलाठी कार्यालयावर ‘मन्सूरभाई’चा ताबा! आमदारांच्या हुसकावणीनंतर स्वतःचे टाळे; संतप्त नागरिकांनी जाब विचारित पुन्हा पिटाळले..


श्याम तिवारी, संगमनेर
एखाद्या शासकीय कार्यालयाशी कोणताही संबंध नसताना गेली अनेक दशके एखाद्याने स्वतःला कर्मचारी समजून तेथे सेवा करावी, त्यातून संगमनेर सज्जाचा संपूर्ण भूगोल डोक्यात घालावा आणि नंतर त्याचा वापर करुन त्या कार्यालयावरच ‘ताबा’ मिळवावा अशी अतिशय दुर्मीळातील दुर्मीळ धक्कादायक घटना आमदार अमोल खताळ यांच्या ‘नायक स्टाईल’ धडक कारवाईने बुधवारी समोर आली. या प्रकाराने संतप्त झालेल्या आमदारांनी वरीष्ठ अधिकार्‍यांचे कान उपटून आवश्यक कारवाईच्या सूचना दिल्या असतानाही त्याला न जुमानता झीरो ‘मन्सूरभाई’ने आज सकाळी तलाठी कार्यालयाचा ताबा घेतला. विशेष म्हणजे दररोज होणार्‍या प्रचंड वरकमाईचा मोह सुटत नसल्याने त्याने चक्क वेळेपूर्वी येत आतुन टाळे ठोकून स्वतःला कोंडूनही घेतले होते. मात्र काही वेळानंतर परिस्थितीचा कोनासा घेण्यासाठी चहाच्या दुकानावर येवून त्याने वायफळ बडबड केल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी कार्यालयातील त्याचे चंबुगबाळ रस्त्यावर आणून त्याला बारा तासांत दुसर्‍यांदा हुसकावून लावले. धक्कादायक म्हणजे त्याच्या ताब्यातून शासकीय कागदपत्रे, मोहरा आणि साहीत्य जमा करुन घेतले जात असताना धार्मिक नावाने छापलेल्या पावत्यांचे पुस्तकही आढळून आले, त्यावरुन संगमनेरच्या तलाठी कार्यालयाशी कोणताही संबंध नसलेला मन्सूरभाई नावाचा हा झीरो तलाठी गेली अनेक दशके नागरिकांकडून सक्तीने वसुली करुन तो पैसा एका विशिष्ट धर्माच्या कामासाठी वापरत असल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे, त्यातून हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून संबंधितावर फौजदारी कारवाई होवून सखोल चौकशीची मागणी होत आहे.


बुधवारी (ता.15) आमदार अमोल खताळ दैनंदिन कामात व्यस्त असताना एका महिलेने सोशल माध्यमाद्वारा संदेश पाठवून अनेकदा हेलपाटे मारुनही संगमनेरच्या तलाठी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याची तक्रार केली. त्याचे निरसन करण्यासाठी आमदार महोदयांनी थेट संगमनेरची चावडी गाठली. त्यावेळी समोरील दृष्य पाहुन त्यांनाही मोठा धक्का बसला. तलाठ्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयातील अन्य कामकाज नियमितपणे सुरु असतानाच दाखल्यांच्या संदर्भात सर्वकाही कार्यालयाच्या बाह्य बाजूच्या ओसरीत टेबल लावून बसलेला टोपीवाला इसम दिसला. त्याच्याकडे त्यांनी अधिकची चौकशी केली असता त्याचा आणि तलाठी कार्यालयाचा कोणताही संबंध नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.


हा संपूर्ण प्रकार डोक्याला झींग आणणारा असल्याने आमदार खताळ यांनी तत्काळ प्रांताधिकार्‍यांशी संपर्क साधून या घटनेबद्दल आश्‍चर्य व्यक्त करीत कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. तहसीलदारांनीही कारवाईत ‘तेजी’ दाखवत तलाठ्यांमार्फत त्याला त्याच्या जावयासह कार्यालयातून हुसकावून लावले. यावेळी संबंधित व्यक्ति मन्सूरभाई नावाने ओळखली जात असल्याचे व गेल्या अनेक दशकांपासून या कार्यालयात ‘झीरो’ तलाठी म्हणून आप्पांची मदत करीत असल्याचेही निदर्शनास आले. प्रत्यक्ष शासकीय सेवेत नसतानाही तलाठ्यांच्या अनुपस्थितीत त्यांची सगळी कामं हेच महाशय करायचे. कोणत्याही कारणांसाठी आवश्यक असलेले उत्पन्नाचे दाखले, जमिनींचे फेरफार, शेतसारा वसुली, नजराणे, उतार्‍यावरील नोंदी अशी कितीतरी कामे जणू याच्याच अखत्यारित.


संताप आणणारा हा प्रकार ऐकल्यानंतर आमदार खताळ यांनी प्रचलित कायद्यान्वये कारवाईच्या सूचना दिलेल्या असतानाही त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत ‘मन्सूरभाई’ नावाच्या या झीरो तलाठ्याने आज सकाळी नऊ वाजताच चावडी गाठली आणि मुख्य कार्याल्याशी संलग्न असलेल्या पॅकबंद ओसरीवर ताबा घेतला. त्याला जागेवरुन हलवण्यासाठी कोणी आंत येवू नये यासाठी त्याने चक्क आतुन टाळे लावून स्वतःला कोंडून घेतले व जाळीदार प्रवेशद्वारातूनच दाखले घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी ‘व्यवहार’ही सुरु केला. हा सगळा प्रकार धक्कादायक वाटल्याने परिसरातील काहींनी त्याला विरोध करायला सुरुवात केली, मात्र स्वतःला कोंउून सुरक्षित समजणार्‍या ‘मन्सूरभाई’ने त्याला दाद दिली नाही.


सकाळी अकराच्या सुमारास त्याने आपल्या या कृत्याचा काय परिणाम झाला असेल याचा कानोसा घेण्यासाठी टाळे खोलून बाजूला चहाच्या टपरीवर हजेरी लावली. यावेळी फूशारकीच्या गप्पा हाणतांना अनेकवेळा त्याची जीभही घसरली, मात्र सुरुवातीला तेथे चहाच्या झुरक्या घेणार्‍यांनी कानाडोळा केला. त्यातून हिंमत वाढल्याने त्याने थेट आमदार खताळ यांच्यावरच शेलकी भाषेत बोलायला सुरुवात केली. त्यामुळे एव्हाना केवळ चर्चा म्हणून ऐकणार्‍यांसह तेथे जमलेल्या बहुतेकांचा पारा चढला आणि त्यातून चहाच्या टपरीवरच शाब्दीक ठिणगी पेटली. हा सगळा प्रकार आमदारांच्या कार्यालयालाही समजला, मात्र तत्पूर्वीच तेथे जमलेल्यांनी तलाठी कार्यालयाच्या ओसरीत जावून या झीरो तलाठ्याची झाडाझडती घेत त्याच्या ताब्यातून शासकीय कागदपत्रे, तलाठ्याच्या नावाच्या मोहरा व अन्य साहीत्य काढून घेतले.


यावेळी त्याने ओसरीत असलेल्या ‘दर्ग्या’चा विषय पुढे करुन या प्रकरणाला ‘धार्मिक’ रंग देण्याचाही प्रयत्न केला. मात्र सदरच्या दर्ग्यावर हिंदू समाजातील नागरिकांचीच अधिक श्रद्धा असल्याने आणि सदरची जागा शासकीय मालकीची असल्याने तेथे जमलेल्या लोकांसह तलाठ्यांनी त्याला तत्काळ तेथून निघून जाण्यास सांगितले. यावेळी त्याच्या दप्तरात मन्सूर दौलत पटेल, हजरत आमीना फौंडेशन ट्रस्ट या नावाचे व्हिजिटींग कार्ड्स आणि चक्क मस्जिदे आमीना या नावाच्या 20 रुपयांच्या छापिल पावत्यांचे पुस्तकही आढळून आले. काहींनी त्याला त्याच्या कृत्याची जाणीव करुन देत हिसकवण्याचा प्रकारही यावेळी घडला. एकंदरीत आमदार खताळ यांच्या धडक कारवाईनंतरही त्याला न जुमानता आज सकाळी तलाठी कार्यालयात पोहोचून त्याचा ताबा घेणार्‍या मन्सूरभाई नावाच्या झीरो तलाठ्याला नागरिकांनीच तेथून पिटाळून लावले आणि पुन्हा न येण्याची तंबीही दिली.


संगमनेरच्या चावडीवर कालपासून सुरु असलेले हे ‘झीरोनाट्य’ अधिक जवळून पाहिले असता इतिहासात अशाप्रकारच्या काहींनी याच कार्यालयाच्या आधाराने लाखोंची माया कमावल्याचे दाखले मिळण्यासह मन्सूर पटेल नावाचा हा खोटा आप्पा गेल्या अनेक दशकांपासून या कार्यालयात विळखा घालून बसल्याचे समोर आले. जमिनींचा मोठा अभ्यास असल्याने संगमनेरचा संपूर्ण भूगोल डोक्यात उतरवणार्‍या या वल्लीने या जोरावरच तलाठी कार्यालयावर वर्चस्व मिळवल्याचे व त्यातून आजवर कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचे समोर आले आहे. रोजच्या कमाईतील ठराविक वाटा तो धार्मिक कार्यासाठी खर्च करीत असतं. आज सकाळी त्याच्या टेबलच्या झाडाझडतीत सापडलेल्या पावती पुस्तकावरुनही ते सिद्ध झाले आहे. आमदार खताळ यांच्या ‘नायक’ स्टाईलमध्ये झालेल्या या कारवाईतून मोठा गंभीर प्रकार उघड होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने त्याकडे तितक्या गांभीर्याने पाहून फौजदारी कारवाई केल्यास सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार व व्यापार्‍यांना छोट्या-छोट्या कायदेशीर कामांसाठी, दाखल्यांसाठी नागवणार्‍या आणि त्यातून आजवर कोट्यवधीची माया जमवणार्‍या मन्सूरभाईने ‘धार्मिक’ नावावर जमा केलेला पैसा नेमका कोणत्या धर्मकार्यासाठी वापरला यावर प्रकाश पडू शकेल.


खरेतर संगमनेरच्या चावडीवरील तलाठी कार्यालयाला अशा प्रकारच्या ‘झीरो’ तलाठ्यांचा मोठा इतिहास लाभला आहे. या कार्यालयाने अनेक मंडलाधिकारी, तलाठी, कर्मचारी, एजंट आणि मन्सूरभाईसारख्या झीरो तलाठ्यांना मोठेही केले आणि त्यातील काहींना धुळीलाही मिळवले. मात्र या प्रकरणाच्या झाडाझडतीत ‘मस्जिदे आमीना’ या नावाने धार्मिकसंस्था म्हणून अधिकृत नोंद असलेल्या संस्थेच्या नावाने छापिल पावत्यांचे पुस्तकही सापडल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. एखाद्या शासकीय कार्यालयात बसून, कायदेशीर शासकीय कामांच्या बदल्यात नागरिकांकडून सक्तीने पैसे घेतले जावेत आणि ते देखील एखाद्या विशिष्ट धर्माच्या कार्यासाठी ही गोष्ट अतिशय धक्कादायक असून संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून फौजदारी कारवाईद्वारे संपूर्ण वास्तव समोर आणण्याची गरज आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या अनेक दशकांपासून अजगराप्रमाणे विळखा घालून बसलेल्या या बहाद्दराने आपल्या जावयासाठीही आसन तयार करण्यास सुरुवात केली होती, त्यापूर्वीच धक्कातंत्र राबवले गेल्याने त्याचा हा वारसाहक्क विस्कळीत झाला आहे.

Visits: 5 Today: 5 Total: 1713017

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *