उत्स्फूर्त रक्तदान करणारी माणसे ही समाजाची खरी ‘श्रीमंती’ ः गिरीश मालपाणी मालपाणी उद्योग समूहातील रक्तदान शिबिरात एकशे तेरा रक्तपिशव्यांचे संकलन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
रक्तदान करण्यासाठी उत्स्फूर्तपणे पुढे येणारी माणसे ही समाजाची खरी श्रीमंती आहे. जगा आणि जगवा हे तत्त्व आपल्या आचरणातून दाखवून देणारे रक्तदाते सर्वांच्या समोर आदर्श निर्माण करतात असे प्रतिपादन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी यांनी केले आहे. मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय दामोदर मालपाणी यांच्या 46 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उद्योग समूहातील वरीष्ठ अधिकारी रमेश घोलप, देवदत्त सोमवंशी यांच्यासह अर्पण रक्तपेढीचे सतीश बिल्लाडे, प्रमिला कडलग आदी उपस्थित होते. मालपाणी उद्योग समूहातील कर्मचार्‍यांनी यावेळी उत्स्फूर्तपणे केलेल्या रक्तदानातून 113 रक्त पिशव्यांचे संकलन झाले. या शिबिरप्रसंगी कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत सदरचे शिबिर घेण्यात आले.


यावेळी पुढे बोलताना मालपाणी म्हणाले की, रक्तदान हे एकमेव असे दान आहे की ते गरीब व श्रीमंत असे सर्वजण करु शकतात. या दानामध्ये जीवदान देण्याचे सामर्थ्य व जादू असल्याने संपूर्ण जगात रक्तदानाला खूप महत्व आहे. रक्त ही अशी गोष्ट आहे जी कृत्रिमरीत्या तयार करता आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक माणूस हाच रक्ताचा स्रोत आणि पुरवठादार आहे. या दानाचे फायदे दात्यालाही होतात आणि रुग्णालाही नवसंजीवनी मिळते. अशी दुहेरी किमया करणारे हे दान करण्याबाबत मालपाणी उद्योग समूहातील कर्मचारी नेहमीच पुढे असतात ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकात रमेश घोलप म्हणाले की, संपूर्ण जीवन माणुसकीचा संदेश जपणार्‍या स्वर्गीय दामोदर मालपाणी यांचे पुण्यस्मरण रक्तदानासारख्या उपक्रमाने करण्याची मालपाणी उद्योग समूहाची परंपरा राहिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या या उपक्रमात उद्योग समूहातील अधिकारी, कर्मचारी व कामगार उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. या शिबिरात सहभागी होणार्‍या प्रत्येकाच्या मनात आपल्या दानातून कोणाचा तरी जीव वाचणार आहे ही भावना असते, त्यातून समाजाच्या प्रतिची बांधिलकीही दिसून येते. दरवर्षीच्या या शिबिराला मिळणारा प्रतिसाद रक्तदानाबाबत समाज जागृत होत असल्याचे द्योतक असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.


यावेळी मोजक्या उपस्थितीत स्वर्गीय दामोदर मालपाणी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून या शिबिराला सुरुवात झाली. रक्तदान करु इच्छिणार्‍या दात्यांची आधीच नोंदणी करण्यात आली होती. क्रमवारपणे विभागवार त्यांना शिबिरस्थळी बोलावले जात होते. सकाळी 10 पासून सुरु झालेल्या या शिबिरात दिवसभरात 113 रक्त पिशव्यांचे संकलन झाले. यावेळी सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू तर अर्पण रक्तपेढीच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात आले.

Visits: 141 Today: 1 Total: 1412310

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *