बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव गावांतर्गत असलेल्या कान्होरे मळा येथील मुरलीधर भिमाजी कान्होरे या शेतकर्याच्या तीन शेळ्या बिबट्याने ठार केल्याची घटना शुक्रवारी (ता.18) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. यामध्ये शेतकर्याचे सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, घारगाव परिसरातील कान्होरे मळा येथील शेतकरी मुरलीधर कान्होरे यांनी घरापासून जवळच असलेल्या गोठ्यात तीन शेळ्या बांधल्या होत्या. शुक्रवारी पहाटे गोठ्याच्या मागील बाजूने बिबट्याने आत प्रवेश करीत तिन्ही शेळ्या ठार केल्या आहेत. सकाळी शेतकरी कान्होरे हे गोठ्याकडे गेले असता त्यांना शेळ्या मृतावस्थेत दिसून आल्या. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती वन विभागाचे वनरक्षक दिलीप बहिरट यांना दिली. माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत शेळ्यांचा पंचनामा केला आहे. दरम्यान, बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने येथे पिंजरा लावावा अशी मागणी मुरलीधर कान्होरे, मंगेश कान्होरे, आनंथा औटी, राजेंद्र कान्होरे, बाळासाहेब गाडेकर आदी शेतकर्यांनी केली आहे.