घोडेगावात भरतोय जनावरांचा ऑनलाईन बाजार! व्हाट्सअॅप ग्रुपवरुन होतोय सौदा; पैसेही ऑनलाईन
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा बाजार कोरोना प्रादुर्भावामुळे बंद आहे. मात्र व्यापार्यांनी गाय, म्हशी विक्रीचा नवा फंडा शोधून काढला असून जनावरांची माहिती, छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून ऑनलाईन बोली लावली जात आहे. गेले अनेक वर्षे गुपचूप होत असलेला हा व्यवहार आता उघड सुरू झाला आहे.
नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव (ता. नेवासा) येथील उपबाजारातील जनावरांचा बाजार कोरोना प्रादुर्भावामुळे अद्यापही बंद आहे. येथे एक हजारांहून अधिक म्हशींची विक्री होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. या बाजारात परराज्यांतून व्यापारी व शेतकरी येत होते. जनावरांची बोली कापडाखाली बोटांच्या खाणाखुणा करुन केली जायची. मात्र आता हाच झाकून होत असलेला व्यवहार कोरोनामुळे उघड सुरू झाला आहे. दीड वर्षापासून निर्माण झालेल्या स्थितीमुळे हजारोंची रोजीरोटी थांबली आहे.
घोडेगावसह चांदे, सोनई, लोहगाव, शनिशिंगणापूर, झापवाडी, शिंगवे तुकाई, वांजोळी येथील व्यापारी, दलाल व काही शेतकर्यांनी व्हाट्सअॅप ग्रुप तयार करुन त्यावर गायी-म्हशींची छायाचित्रे, व्हिडिओ व त्यांची माहिती टाकत विक्री सुरू केली आहे. अगोदर जनावराचे छायाचित्र पाठविले जाते. एखाद्याने जनावर घेण्याची इच्छा व्यक्त केली की त्याला व्हिडिओ कॉल करून जनावर दाखविले जाते. सौदा ठरल्यावर ऑनलाईन पैशांचीही देवाण-घेवाण केली जात आहे. त्यामुळे ऑफलाईन बंद असलेला बाजार ऑनलाईन भरवला जात आहे.
घरी बसल्या बसल्या मोबाईलवर म्हशींचा सौदा होत आहे. अतिशय पारदर्शी पद्धतीने व्यवहार होत आहे. बाजारात थंगारी व दलालाच्या घुसखोरीने शेतकर्यांचे नुकसान होत होते. या नव्या संकल्पनेत दोन ग्राहक व विक्रेत्यांचा प्रत्यक्ष व्यवहार होत असल्याने मध्यस्थ बाजूला पडले आहेत.
– संतोष सोनवणे (व्यापारी, घोडेगाव)
बाजार बंद असल्याने शेतकर्यांना मोठा फटका बसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या जनावरांची विक्री होत आहे. सध्या सर्वत्र कोरोना स्थिती गंभीर असल्याने मागील वर्षाच्या तुलनेत व्यवहार कमी होत आहेत.
– अनिल शेटे, शनिशिंगणापूर