राहाता तालुक्यातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या! पेरणीयोग्य पावसाची शेतकर्यांना प्रतीक्षा; कृषी केंद्र चालकही हवालदिल
नायक वृत्तसेवा, राहाता
प्रवरा व मुळा पाणलोटात दडी मारुन बसलेल्या पावसाने बुधवारी (ता.16) जोरदार पुनरागमन केले. याचबरोबर राहात्यातही दुपारच्या वेळेस पावसाने हजेरी लावली. मात्र ग्रामीण भागात अद्यापही पेरणी योग्य पाऊस नसल्याने खरीपाच्या पेरणीला वेग आलेला नाही. मशागत करुन रान तयार असले तरी अद्याप शेतकर्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा आहे.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात मान्सूनने चांगलीच बरसात केली आहे. परंतु, अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनची चाहूल लागली असली तरी पावसाची अवकृपा दूर होत नसल्याने शेतकर्यांमध्ये चिंतेचे ढग पसरले आहेत. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. समाधानकारक पाऊस पडेल या आशेने अनेक शेतकर्यांनी बी-बियाणे व खत खरेदी केले आहे. मात्र 15 जून ओलांडून गेला तरी राहाता तालुक्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. सध्या कृषी सेवा केंद्रावर दिसणारी शेतकर्यांची लगबगही कमी झाली आहे. कृषी सेवा केंद्र चालकांनी आगाऊ पैसे भरून शेतीपुरक बी-बियाणे व औषधांची खरेदी केली. परंतु विक्रीच होत नसल्याने तेही हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात लागवडी योग्य क्षेत्र हे 57 हजार 47 हेक्टर एवढे असून 39 हजार 885 हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन आहे. यात सोयाबीन 16 हजार 500 हेक्टर, मका 18 हजार 560, बाजरी 3 हजार 552 हेक्टर, कपाशी 1 हजार 511 हेक्टर, चारापिके 8 हजार 500 हेक्टर यांचा समावेश आहे. कृषी विभागाने खतांचा तुटवडा भासू नये म्हणून 11 हजार 899 मेट्रीक टन खतांची मागणी केलेली आहे. दरम्यान, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असून या आठवड्यात तरी समाधानकारक पाऊस पडेल आणि पेरणी करता येईल अशी आशा बाळगून आहेत. बाजारपेठेतही तेजी हवी असेल तर वरुणराजाची कृपा लवकरात लवकर होणे गरजेची आहे.