संगमनेर बसस्थानकातील चोर्यांना अखेर पोलिसांकडून पायबंद! दैनिक नायकच्या वृत्ताचा परिणाम; कायमस्वरुपी तिघा कर्मचार्यांची निगरानी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील देखण्या इमारतींमध्ये गणल्या जाणार्या आणि महानगरांच्या त्रिकोणीय श्रृंखलेत असल्याने सतत हजारों प्रवाशांची वर्दळ असलेल्या संगमनेर बसस्थानकाला ‘अखेर’ कायमस्वरुपी बंदोबस्त मिळाला आहे. बसमध्ये चढण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना हेरुन त्यांच्या अंगावरील व पिशव्यांमधील दागिने व पैशांची पाकिटे ओरबाडण्याच्या वाढत्या घटनांनी संगमनेरचे वैभवशाली बसस्थानक काळवंडले होते. दैनिक नायकने याबाबत सातत्याने आवाज उठवतांना पोलीस प्रशासनाला जागवण्याचे काम केले. त्याची दखल घेत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दोघा पोलीस कर्मचार्यांसह एका होमगार्डची नियुक्ती करीत दर तासाला साध्या वेशातील पोलिसांची गस्तही सुरु केल्याने गेल्या पंधरवड्यापासून बसस्थानकातील चोर्यांची सलग श्रृंखला खंडीत होवून अशा घटनांना पूर्णतः पायबंद बसला आहे.

अतिशय विस्तीर्ण परिसरात पसरलेल्या संगमनेर बस आगारात राज्यभरातील विविध ठिकाणांहून येणार्या बसेस आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. जेथे गर्दी, तेथे अपप्रवृत्ती हे सूत्र सर्वत्र असतांनाही संगमनेर बसस्थानक मात्र त्याला अपवाद ठरले होते. त्याचे कारण स्थानकाची निर्मिती करतांना प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करुन उभारण्यात आलेल्या पोलीस कक्षात पोलीस कर्मचारीच थांबत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले होते. त्याचा परिणाम गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी बसस्थानकात अक्षरशः उच्छाद घातला होता. महिला प्रवाशांच्या गळ्यातील व काहींनी सुरक्षा म्हणून आपल्याजवळील पिशवीमध्ये ठेवलेल्या दागिन्यांसह पुरुषांच्या खिशातील पैशांची पाकिटे लांबविण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते.

चालू महिन्यात तर रविवार (ता.7) व सोमवार (ता.8) अशा सलग दोन दिवस संगमनेरातील मेहेरमळा येथील बद्रीनारायण लोहे यांची दोन तोळे वजनाची सोनसाखळी, शांताबाई काशिनाथ सावंत (वय 65, रा.पिंपळगाव माथा) यांच्या जवळील सोन्याचे हातकडे व नथ असे पाच तोळे वजनाचे दागिने आणि पंढरीनाथ लगड (वय 71, रा.कल्याण) यांच्याकडील पाच तोळ्यांचे गंठण आणि दोन तोळ्यांची पोत असा 14 तोळ्यांचा मुद्देमाल रविवारी एकाच दिवशी तर त्याच्या दुसर्याच दिवशी सोमवारी (ता.8) रजनी सहाणे या निवृत्त मुख्याध्यापिकेच्या पिशवीतील तब्बल साडेदहा तोळे सोन्याचे दागिने भरलेला डबा चोरट्यांनी लांबविला होता. सलग दोन दिवसांत संगमनेर बसस्थानकातून 15 लाख रुपये मूल्याच्या 25 तोळे सोन्याची चोरी झाल्याने इमारतीच्या सौंदर्याने आणि प्रवाशी वर्दळीच्या कारणाने वैभवशाली ठरलेले संगमनेर बसस्थानक प्रवाशांना भितीदायक ठरु लागले होते.

यासर्व घटनांबाबत आपली सामाजिक बांधिलकी ओळखून दैनिक नायकने परखड शब्दात आवाज उठविल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे यांनी त्याची दखल घेतली आहे. गेल्या पंधरवड्यापासून बसस्थानकात महिला पोलीस कॉन्स्टेबल सोमेश्वरी शिंदे व पोलीस शिपाई अजित कुर्हे यांच्यासह महिला होमगार्ड सुनिता जंत्रे यांची बसस्थानकात कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय दिवसभरात दरतासाला साध्या वेशातील पोलिसांची गस्तही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत संगमनेर बसस्थानकातून एकाही प्रवाशाचे दागिने अथवा पैशांची चोरी झाल्याचे वृत्त नाही.

महिला पोलीस कर्मचारी सोमेश्वरी शिंदे व अजित कुर्हे हे दोघेही फलाटावर बस येताच बसच्या दारासमोर जावून उभे राहतात व प्रत्येक प्रवाशावर अतिशय बारकाईने नजर ठेवून असतात. तर महिला होमगार्ड सुनिता जंत्रे या दरम्यान बसस्थानकातील अन्य हालचालींवर नजर ठेवून असतात. स्थानकात येणार्या व जाणार्या बस नसतांना या कर्मचार्यांकडून संशयीत व्यक्तींच्या हालचालींवरही करडी नजर असती. एखाद्यावर संशय येताच त्याच्याकडे ओळखीचा पुरावा आणि बसस्थानकात येण्याचे कारण विचारले जाते. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्याची कसून चौकशीही होते. येथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचार्यांच्या समर्पित कर्तव्य दक्षतेने गेल्या पंधरा दिवसांत चोरीची एकही घटना घडली नसल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

संगमनेर बसस्थानक जिल्ह्यातील वर्दळीचे ठिकाण आहे. येथील प्रवासी व बसेसची संख्या यामुळे गेल्याकाही दिवसांत चोरीच्या घटनाही समोर येत होत्या. त्याच्यावर पायबंद घालण्यासाठी आम्ही बसस्थानकात तिघा पोलीस कर्मचार्यांची नेमणूक केली असून त्यांना कोणत्याही स्थितीत जागा न सोडण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय साध्या वेशातील पोलिसांची नियमित गस्तही सुरु करण्यात आली असून संशय असलेल्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही आवश्यक त्या गोष्टींची अंमलबजावणी करीत आहोत.
भगवान मथुरे
पोलीस निरीक्षक – संगमनेर शहर

