खबरदार; दत्तक विधानांबाबतच्या जाहिरात करणार्‍यांवर होणार गुन्हे दाखल! कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांबाबतच्या ‘त्या’ जाहिरातींची सरकारकडून गंभीर दखल

नायक वृत्तसेवा, नगर
कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांच्या मदतीसाठी सरकार आणि काही स्वयंसेवी संस्था पुढे येत असताना काही घटक याचा गैरफायदा उठवत आहेत. अशा मुलांना दत्तक देण्यासंबंधी जाहिराती दिल्या जात असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने बेकायदेशीर दत्तक विधान आणि त्याची जाहिरात करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्यातील अनेक मुलांनी आपले पालक गमावले आहेत. त्यातून मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. अशा मुलांसाठी केंद्र आणि राज्य सरकारनेही योजना आखल्या आहेत. तर काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेत त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. असे असले तरी काही ठिकाणी अशा मुलांना बेकायदेशीरपणे दत्तक देण्याचे प्रकार सुरू झाले आहे. सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमांतून यासंबंधीच्या जाहिरात दिसून आल्यावर सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे.

यासंबंधी महिला व बालअपराध प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सर्व पोलीस अधीक्षकांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ‘कोरोनामुळे आई-वडील मृत पावलेल्या बालकांच्या दत्तक देण्याच्या बाबत अवैधरित्या, बेकायदेशीरपणे जाहिराती समाज माध्यमे आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्या जात आहेत. अशा जाहिराती प्रसारित करणे अथवा समाजमाध्यमांद्वारे त्याची प्रसिद्धी करणे बाल हक्क संरक्षण कायदा 2015 च्या विरोधी आहे. अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे जाहिराती देणार्‍या आणि अशी अवैध कामे करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात यावेत. कोविड केंद्रामध्ये असलेल्या महिलांचे संरक्षण, तसेच कोरोनाने आई वडिलांचे निधन झाले आहे. अशा बालकांच्या हक्कांचे संरक्षण, अशा बालकांना बेकायदेशीर प्रकारे दत्तक देण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यवाहीच्या दृष्टीने हे आवाहन करण्यात आले आहे.’

दरम्यान, अनेक घटनांमध्ये संबंधित मुलांच्या जवळचे नातेवाईक किंवा त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी येऊन पडलेल्या मंडळीकडून असे प्रकार केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा दिशाभूल करणारांची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागास कळवावी, असे आवाहन अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 114842

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *