संगमनेरच्या नेतृत्वाचे पोखरी हवेली रस्त्याकडे वीस वर्षांपासून दुर्लक्ष! भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे हैदर शेख यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली टीका


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नगर-मनमाड महामार्गाची काळजी करणार्‍या माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी वर्षानुवर्षे सर्व सत्तास्थाने हातात असतानाही वीस वर्षांपासून रखडलेल्या कुप्रसिद्ध संगमनेर-कुरण-पोखरी हवेली रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे सरचिटणीस हाफीज हैदर शेख यांनी उपस्थित केला आहे.

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हाफीज हैदर शेख यांनी म्हटले आहे की, संगमनेर-पोखरी हवेली हा रस्ता अतिशय दयनीय झाला आहे. परंतु विकासाच्या गप्पा मारणार्‍यांना बाहेरच्या रस्त्यांची काळजी करुन, बोलायला वेळ आहे. मात्र, संगमनेर शहरानजीक असणार्‍या रस्त्यावर बोलायला सवड सापडत नाही याचे आश्चर्य वाटते. संगमनेर शहराच्या बाजारपेठेत कुरण, देवकौठे, पारेगाव खुर्द, बुद्रूक, आशा पीरबाबा, तळेगाव, नान्नज, पोखरी हवेली ही गावे कुरण रस्त्याला जोडली गेलेली आहेत, त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.

शेतकर्‍यांसह शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी या सर्व गावांमधून शहरामध्ये येत असतात. मात्र वर्षानुवर्षे रखडलेल्या या रस्त्याच्या कामाकडे पाहायला तालुक्याच्या नेतृत्वाला वेळ नाही. या रस्त्याच्या कामाची निविदा आपल्या बगलबच्च्यांना किंवा नातेवाईकांना मिळाली नाही म्हणून रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे का? असा उपरोधिक सवाल करुन, हाफीज हैदर शेख यांनी म्हटले आहे की, या सर्व गावांमधील जनता दुष्काळाने अधिक होरपळलेली आहे. त्यांना पाणीही मिळालेले नाही, कमीत कमी चांगला रस्ता तरी देण्याची व्यवस्था सुसंस्कृत नेतृत्वाने करावी.

नेहमीच विकासाच्या गप्पा करणार्‍यांनी हा तालुका संपूर्णपणे ठेकेदारांच्या ताब्यात दिला आहे. त्यामुळे दुसर्‍याच्या गावात जावून रस्त्यांची काळजी करण्यापेक्षा आपल्या तालुक्यातील रस्त्यांच्या कामाची काळजी केली तर बरे होईल. आपले ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे पाहायचे वाकून ही वृत्ती योग्य नव्हे हे संगमनेर तालुक्याच्या नेतृत्वाने आता सोडले पाहिजे असा टोला देखील लगावला आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 23137

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *