कणगरमध्ये नवरदेव, करवलीसह बावीस वर्‍हाड्यांना कोरोनाची बाधा देवळाली प्रवरा येथील सहारा कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
कोरोनाची दुसरी लाट ओसरली, लॉकडाऊन संपले, निर्बंध कमी झाले तसा कोरोना विषाणू हद्दपार झाल्याचा भास नागरिकांना झाला आहे. निर्बंध विसरून ते धुमधडाक्यात विवाह समारंभ पार पडत आहेत. परिणामी, कोरोनाचा कहर पुन्हा वाढू लागला आहे. विवाह समारंभ कोरोना प्रसार केंद्रे ठरू लागली आहेत.

राहुरी तालुक्यातील कणगर येथे एका विवाह समारंभ झाला. त्यात नवरदेव व एक करवली कोरोनाबाधित आढळले. उपचारासाठी नुकतेच ते देवळाली प्रवरा येथे शासनाच्या सहारा कोविड सेंटरमध्ये दाखल झाले. यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नलिनी विखे यांनी लग्नस्थळी कोरोना चाचणी शिबिर घेतले. 63 जणांच्या रॅपिड अँटिजेन चाचण्या केल्या. त्यात 22 वर्‍हाडी कोरोनाबाधित आढळले.

देवळाली प्रवरा येथील शासनाचे सहारा कोविड सेंटर येत्या मंगळवारपासून (ता.15) बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने तालुका प्रशासनाने घेतला होता; परंतु विवाह समारंभातील वर्‍हाडी कोरोनाबाधित आढळल्याने जून महिना अखेरपर्यंत कोविड सेंटर सुरू ठेवण्याचा निर्णय तालुका प्रशासनाला घ्यावा लागला, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दीपाली गायकवाड यांनी सांगितले.

Visits: 88 Today: 1 Total: 1101444

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *