22 ऑक्टोबरपासून जय मल्हार सेनेचे राज्यव्यापी अर्ध जलसमाधी आंदोलन

22 ऑक्टोबरपासून जय मल्हार सेनेचे राज्यव्यापी अर्ध जलसमाधी आंदोलन
भारतीय राज्यघटनेतील तरतुदींनुसार महाराष्ट्र शासनाने आरक्षण देण्याची मागणी
नायक वृत्तसेवा, नगर
भारतीय राज्यघटनेतील तरतुदींनुसार महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे. या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्यावतीने गुरुवार दि.22 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी अर्ध जलसमाधी आंदोलन करणार असल्याची माहिती जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


या पत्रकार परिषदेस जय मल्हार सेनेचे जिल्हाप्रमुख प्रदीपराज भोंडे, राज्य समिती सदस्य काशिनाथ अरगडे, जिल्हा संघटक सोपान कांदळकर, संगमनेर तालुका प्रमुख गंगाधर साळवे, बाळासाहेब घोडे, संतोष कांदळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना लहुजी शेवाळे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीत 36 व्या क्रमांकावर असलेले धनगर हीच महाराष्ट्रातील धनगर जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्तऐवजातून सिद्ध झाले आहे. ते सर्व राज्यकर्त्यांनी मान्य देखील केलेले आहे. परंतु केवळ राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या 25 वर्षांपासून धनगर समाज आरक्षणपासून वंचित आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या 25 वर्षांपासून धनगर समाजाच्या विविध संघटना लोकशाही मार्गाने आंदोलने करून राज्य शासनाचे लक्ष वेधत आहेत. परंतु महाराष्ट्र शासन धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे जाणीवूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ही दीड कोटी धनगर समाजाची फसवणूक आहे. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आता गप्प बसणार नसून गुरुवार दि.22 ऑक्टोबरपासून राज्यभर जय मल्हार सेनेच्यावतीने अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी व पाथर्डी तालुक्यातील 35 गावांमध्ये त्या-त्या गावाजवळील नदी, बंधारे व तलाव याठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे व समन्वयक विठ्ठल रबदडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीपराज भोंडे, रेवणनाथ शिंदे, संजय राऊत, बाळासाहेब घोडे आदी पदाधिकारी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

Visits: 3 Today: 1 Total: 30595

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *