अकोलेतील तरुणांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण ए. एस. के. फाउंडेशनसह बायफच्या पुढाकारातून आयोजन


नायक वृत्तसेवा, अकोले
अकोले तालुका हा पर्यटन पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. दूरवरून पर्यटक भंडारदरा धरण, रंधा धबधबा, कळसूबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग, कुलंग, मलंग, विश्रामगड अशा नानाविध स्थळांना भेटी देतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रतील सर्वात उंच कळसूबाई शिखर याच तालुक्यात असल्याने पर्यटकांची नेहमी मांदियाळी असते. यातून आदिवासी तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र, पर्यटनाला चालना देण्यासाठी व पर्यटकांना सुविधा मिळण्याबरोबरच नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना, अपघात यातून पर्यटकांना वाचविण्यासाठी ए. एस. के. फाउंडेशन मुंबई पुरस्कृत व बायफ संचलित समृध्द किसान प्रकल्पांतर्गत नुकतेच आपत्कालीन व्यवस्थापन व मदतकार्य विषयाचे तांत्रिक प्रशिक्षण तरुणांना देण्यात आले.

कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी, जहागिरदारवाडी, पेंडशेत, पांजरे या गावांतील पर्यटन व्यवसाय करणार्‍या 55 तरुणांना हे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात शिवदुर्ग प्रेमी लोणावळा या संस्थेचे तज्ज्ञ प्रशिक्षक सुनील गायकवाड, महेश मसने, आदित्य पिलाने, रतन सिंग, सूरज वारे या चमूने अपघातग्रस्त ठिकाणी मदतकार्य कसे करायचे, अडचणीतील पर्यटकांना कसे वाचवायचे, अपघातात मृत्यू झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास मृतदेह कसा घेऊन जायचा, उंच डोंगरदर्‍यातून अपघात झालेल्या लोकांना कसे वाचवायचे, दोराच्या साहाय्याने धोक्यात असलेले जीव कसे वाचवायचे आदी विषयांवर प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण तीन दिवस चालले. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण खोल डोंगरदर्‍यात जाऊन प्रत्यक्ष कृतीतून व प्रात्यक्षिके करून करण्यात आले.


यामध्ये तरुणांचा उत्साह आणि प्रशिक्षणातील सहभाग वाखाणण्याजोगा होता. प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी ए. एस. के. फाउंडेशनचे सी. एस. आर. व्यवस्थापक सिद्धार्थ अय्यर, प्रकल्प समन्वयक शिवाजी आदमाने यांनी विशेष मार्गदर्शन केले. पर्यटकांना अपघात प्रसंगी व आपत्कालीन परिस्थितीत वाचवण्यासाठी तालुक्यात प्रथमच अशा पद्धतीने प्रात्यक्षिक व प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती बायफचे अतिरिक्त राज्य समन्वयक जितीन साठे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. या भागात कुठे अपघात झाल्यास, पर्यटक तोल जाऊन दरीत पडल्यास, पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर, अचानक तब्येत खराब झाल्यानंतर जीव वाचविण्यासाठी प्रशिक्षित तरुणांचा उपयोग होणार आहे अशी माहिती विभाग प्रमुख जलतज्ज्ञ रामनाथ नवले यांनी दिली. प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी बायफ संस्थेच्यावतीने प्रकल्प समन्वयक विष्णू चोखंडे, किरण आव्हाड, गोरख देशमुख, वर्षा भागडे, मच्छिंद्र मुंढे, सुनील बिन्नर, पर्यटन तज्ज्ञ पंढरीनाथ खाडे, हिरामण खाडे, बाळू घोडे यांनी विशेष योगदान दिले.

Visits: 22 Today: 1 Total: 118141

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *