आनंदवार्ता! संगमनेर शहरातील कोविड बाधितांची संख्या अवघी ‘दोन’! तब्बल नव्वद दिवसांनंतर समोर आली निचांकी रुग्णसंख्या; ग्रामीणभागातही अवघे दहा रुग्ण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यासह आता संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणाने माघार घेण्यास सुरुवात केली असून मागील चार दिवसांपासून दैनिक रुग्णवाढीला मोठा ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातही आज सलग दुसर्या दिवशी एकूण रुग्णसंख्या पाचशेच्या आंत असून जिल्ह्यातील कोविड संक्रमणाची दुसरी लाट जवळपास ओसरत असल्याचे अत्यंत दिलासादायक चित्र दिसू लागले आहे. आज संगमनेर शहरातील अवघ्या दोघांसह एकूण 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात सिन्नर तालुक्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 22 हजार 459 झाली आहे. जिल्ह्यातील संक्रमण आटोक्यात येवूनही तालुक्यातील रुग्णगती कायम होती, मात्र आजच्या नव्वद दिवसांतील सर्वात निचांकी रुग्णसंख्येने संगमनेरकरांनाही सुखद धक्का दिला असून तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चालू महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून संगमनेर वगळता जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यातील कोविडचे संक्रमण आश्चर्यकारकरित्या मंदावले. विशेष म्हणजे जिल्ह्यात दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून पहिल्या क्रमांकाची रुग्णवाढ होणार्या अहमदनगर महापालिका क्षेत्रासह राहाता तालुक्यातील संक्रमणाचा वेग अचानक थांबल्याने अनेकांची बोटं तोंडात गेली होती. जिल्ह्यात एकीकडे कोविडचे संक्रमण आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र उभे राहत असताना दुसरीकडे संगमनेर तालुक्यात मात्र जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळू लागल्याने काहीशा चिंता निर्माण झाल्या होत्या. मात्र गेल्या चार दिवसांपासून तालुक्यातील संक्रमणही उतराला लागले असून आजतर 18 मार्चनंतर पहिल्यांदाच तालुक्याची रुग्णसंख्या सर्वात निचांकी पातळीवर आली आहे.
आज शासकीय प्रयोगशाळा व खासगी प्रयोगशाळेचे प्रत्येकी तीन आणि रॅपिड अँटीजेन चाचणीच्या निष्कर्षातून अवघे सात अशा एकूण तेरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर असा उल्लेख असलेल्या शहरातील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 29 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तर ग्रामीणभागातील आठ गावे आणि वाड्या-वस्त्या मिळून दहा रुग्ण आढळले असून त्यात वेल्हाळे येथील 56 वर्षीय महिला, कौठे धांदरफळ येथील 30 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 42 वर्षीय तरुण व 18 वर्षीय तरुणी, चणेगाव येथील 70 वर्षीय महिला, ओझर खुर्द येथील 41 वर्षीय तरुण व 40 वर्षीय महिला, चिकणी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घारगाव येथील 55 वर्षीय इसम व खंदरमाळ येथील 34 वर्षीय तरुण तर सिन्नर तालुक्यातील वावी येथील 76 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 22 हजार 459 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
आज सलग दुसर्या दिवशी जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या पाचशेच्या आंत राहिली आहे. त्यातच गेल्या मोठ्या कालावधीपासून रुग्णसंख्येच्या बाबतीत पहिल्या पाचमध्ये समावीष्ट असलेला संगमनेर तालुका आज थेट चौदाव्या क्रमांकावर गेला आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे 29, खासगी प्रयोगशाळेचे 161 तर रॅपिड अँटीजेनचे 247 अशा एकूण जिल्ह्यातील 437 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात सर्वाधिक 61 रुग्ण राहुरीतून, पाथर्डी 42, श्रीगोंदा 37, पारनेर 35, कर्जत व राहाता प्रत्येकी 34, श्रीरामपूर 33, कोपरगाव 25, अकोले 23, शेवगाव 22, जामखेड व नेवासा प्रत्येकी 19, इतर जिल्ह्यातील 16, संगमनेर 13, अहमदनगर महापालिका क्षेत्र 12, नगर ग्रामीण 11 व लष्करी रुग्णालयातील अवघ्या एकाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 73 हजार 442 झाली आहे.
मार्चपासून जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाच्या दुसर्या लाटेने वेग धरला होता. एप्रिल व मे या दोन महिन्यात तालुक्यातून उच्चांकी रुग्ण समोर आल्याने व या कालावधीत वैद्यकीय सुविधांची भरमार असूनही रुग्णांना ऑक्सिजनच्या खाटा मिळवण्यात मोठा संघर्ष करावा लागल्याने तालुक्याची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली होती. चालू महिन्यात जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील संक्रमणाचा वेग मोठ्या प्रमाणात खालावला, मात्र संगमनेर तालुक्यातील रुग्णगती टिकून असल्याने तालुक्यातील चिंता कायम होत्या. मात्र मागील चार दिवसांपासून तालुक्यातील संक्रमणालाही आहोटी लागून आज 90 दिवसांतील निचांकी रुग्णसंख्या समोर आल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.