बाळासाहेब थोरातांकडून ‘ईव्हीएम’ पडताळणीचा अर्ज मागे जिल्ह्यातील तिघांची माघार; खंडपीठातील याचिका मात्र कायम..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मतदान प्रक्रियेवर शंका घेत राज्यभरातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांसह जिल्ह्यातील दहाजणांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राच्या पडताळणीसाठी अर्ज केले होते. मात्र गेल्या आठवड्यात शरद पवारगटाच्या प्राजक्त तनपुरे यांनी अनपेक्षितपणे आपला अर्ज मागे घेतल्यानंतर मंगळवारी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह अहिल्यानगरच्या अभिषेक कळमकर यांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश ‘जनमत’ नसल्याचा आरोप करीत आघाडीच्या जिल्ह्यातील दहा पराभूत उमेदवारांमधील तिघांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता सातजणांचे अर्ज शिल्लक असून त्यांनी 74 मशिनच्या पडताळणीसाठी आवश्यक रक्कमही भरली आहे. थोरात यांनी यंत्रावरील आक्षेप मागे घेतला असला तरीही त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या निवडीला दिलेले आव्हान मात्र कायम आहे.


नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीने राज्यात ऐतिहासिक यश मिळवले. तत्पूर्वी प्रचारादरम्यान महाविकास आघाडीच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी राज्यात सत्तांतर घडून आघाडीचे सरकार येणार असल्याचे भाकित वर्तवले होते. प्रत्यक्षात मात्र समोर आलेला निकाल त्या उलट असल्याने आघाडीने मतदान प्रक्रियेवरच आक्षेप घेत ईव्हीएम यंत्रामध्ये छेडछाड झाल्याची शंका उपस्थित केली होती. त्यासाठी निवडणूक निकालानंतर आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील दुसर्‍या व तिसर्‍या क्रमांकाची मतं मिळवणार्‍या आपल्या सर्व उमेदवारांना ईव्हीएम यंत्रावर आक्षेप नोंदवून पुनःपडताळणीचे अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या.


त्यानुसार राज्यभरातील आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी आपापल्या जिल्ह्यातील निवडणूक शाखेकडे पुनःपडताळणीचे अर्ज दाखल करीत त्यासाठी 47 हजार 200 रुपये प्रति ईव्हीएम यंत्र याप्रमाणे आवश्यक शुल्कही भरले होते. या प्रक्रियेत आघाडीच्या जिल्ह्यातील नऊ जणांसह दहा पराभूत उमेदवारांनी एकूण 74 यंत्रांविषयी शंका उपस्थित करीत त्यासाठी 34 लाख 92 हजार 800 रुपयांचे शुल्कही जिल्हा कोषागारात जमा केले होते. महाविकास आघाडीच्या या निर्णयानंतर काही दिवसांत ज्येष्ठनेते शरद पवार यांनी ईव्हीएमबाबतच्या भूमिकेवरुन घुमजाव केल्याने आघाडीतच संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच गेल्या आठवड्यात त्यांच्याच गटाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे (राहुरी) यांनीही आपला अर्ज मागे घेतल्याने जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरु झालेल्या असतानाच आता मंगळवारी (ता.7) काँग्रेसचे ज्येष्ठनेते, माजीमंत्री व यंदा शिवसेनेच्या अमोल खताळ यांच्याकडून पराभूत झालेल्या बाळासाहेब थोरात यांच्यासह अहिल्यानगर शहर मतदारसंघातील शरद पवार गटाच्या अभिषेक कळमकर यांनीही माघार घेतली आहे.


राहुरीच्या प्राजक्त तनपुरे यांनी पाच यंत्राच्या पडताळणीसाठी 2 लाख 36 हजार, बाळासाहेब थोरात यांनी 14 यंत्रासाठी 6 लाख 60 हजार 800 तर, अभिषेक कळमकर यांनी तीन यंत्रांसाठी एक लाख 41 हजार 600 रुपये शुल्क जमा केले होते. या तिघांनीही आता आपले अर्ज मागे घेतल्याने त्यांनी भरलेली रक्कम त्यांना परत केली जाणार आहे. मात्र या तिघांनी जरी आपले यंत्र पडताळणीचे अर्ज माघारी घेतले असले तरीही जिल्ह्यातील प्रभावती घोगरे (शिर्डी, दोन), प्रा.राम शिंदे (कर्जत-जामखेड, 17), शंकरराव गडाख (नेवासा, दहा), राणी लंके (पारनेर, पाच), संदीप वर्पे (कोपरगाव, एक), प्रताप ढाकणे (शेवगाव-पाथर्डी, दोन) व राहुल जगताप (श्रीगोंदा, दोन) अशा एकूण आघाडीच्या सात पराभूत उमेदवारांचे 52 ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्र पडताळणीचे अर्ज आजही कायम आहेत.


तनपुरे, थोरात व कळमकर या तिघांनी यंत्र पडताळणीतून माघार घेतली असली तरीही त्यांच्यासह जिल्ह्यातील आघाडीच्या सात उमेदवारांसह भाजपच्या प्रा.राम शिंदे यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या निवडीला आव्हान देणार्‍या याचिका कायम ठेवल्या आहेत. या याचिकांमधून त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यापासून घेतलेल्या आक्षेपाची आयोगाकडून दखल घेतली गेली नाही, मतदार याद्यांमधून वगळलेली व नव्याने घातलेली नावे, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी, मोजणीदरम्यानचे आक्षेप नोंदवित विजयी उमेदवारांनी भ्रष्टमार्गाचा अवलंब केल्याने त्यांची निवड रद्द करण्याची मागणी या याचिकांद्वारे केली आहे. मंगळवारी (ता.7) निवडणूक याचिका दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.


यावेळच्या निवडणुकीतून सत्तांतर होईल अशी विरोधकांना पूर्ण आशा असताना ऐनवेळी राज्य सरकारने सुरु केलेली लाडकी बहिण योजना आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्यामुळे वातावरण बदलले आणि राज्यात महायुतीने ऐतिहासिक यश मिळवताना 230 जागा पटकावल्या. राज्याच्या इतिहासात महायुतीला इतका मोठा विजय मिळाल्याने त्यावर शंका घेत विरोधकांनी नेहमीप्रमाणे ईव्हीएमवर खापर फोडीत राज्यातील पराभूत उमेदवारांना आयोगाकडे आक्षेप घेण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नऊजणांसह भाजपच्या कर्जत-जामखेड येथील उमेदवाराने आपला आक्षेप नोंदवला होता. त्यासाठी या सर्व पराभूत उमेदवारांनी 74 यंत्रांच्या पडताळणीसाठी 34 लाख 92 हजार 800 रुपयांचे शुल्कही भरले होते. मात्र आता राहुरी पाठोपाठ संगमनेर व अहिल्यानगर शहर मतदारसंघातील पराभूतांनी त्यातून माघार घेतल्याने पडताळणीसाठी सातजणांचे अर्ज शिल्लक राहीले आहेत. शिवाय थोरात यांच्यासह जिल्ह्यातील आठजणांनी निवडणूक याचिकांद्वारे उच्च न्यायालयातही दाद मागितली आहे.

Visits: 81 Today: 2 Total: 253947

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *