विखे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त ‘सिंधूताई आदिवासी निवारा’चे लोकार्पण आईची इच्छा केली पूर्ण; साठ आदिवासी कुटुंबियांना मिळाला हक्काचा निवारा

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात सरकारी जागेवरच आदिवासी व इतर समाजातील कुटुंबं गेली अनेक वर्षांपासून राहात आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय योजनेतील घरकुल या कुटुंबियांना मंजुरही होत होती. परंतु ती जागा त्यांच्या नावे नसल्याने मंजूर झालेली घरकुल अनेकदा रद्द झाली. गावातच राहणार्‍या या लोकांना हक्काची घरे मिळावीत अशी सिंधूताई विखे म्हणजे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या मातोश्रींची इच्छा होती. त्यांच्या हयातीत ती पूर्ण झाली नाही. अलीकडेच विखे पाटील यांनी प्रयत्न करून ही योजना पूर्णत्वास नेली. आज वाढदिवसाच्या निमित्ताने संबंधित कुटुंबियांना घराच्या चाव्या देऊन आईची इच्छा पूर्ण करीत असल्याचे ते म्हणाले. ‘सिंधूताई आदिवासी निवारा,’ असे या गृहप्रकल्पाला नाव देण्यात आले आहे.

‘मागेल त्याला हक्काचे घर’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष कृतीत उतरवून 60 कुटुंबियांना आहे त्याच जागेवर हक्काच्या घराचा आधार मिळवून दिला आहे. विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आदिवसींना त्यांच्या घराचा ताबा देण्यात आला. सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला.

यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले, मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या शासकीय पडीक जमिनी घरकुल उभारणीसाठी उपयोगात आणल्या तर वंचित कुटुंबियांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. सरकारने धोरण घेण्याची गरज आहे. अतिशय संघर्षमय परीस्थीतीत ही सर्व कुटंब या जागेत राहत होती. यांना घर मिळावीत मातोश्री सिंधूताईची खूप इच्छा होती. आज हे स्वप्न पूर्ण होतय याचे मोठे समाधान आहे. या घरकुलांच्या बाबतीत असा निर्णय भाजप सरकारच्या काळात घेण्यात आला. राज्यातील हा पहिला निर्णय ठरल्याने आहे त्याच जागेवर घर रहिवाशांना घर देण्याचा गृह प्रकल्प यशस्वी होवू शकला,’ असेही विखे पाटील म्हणाले.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक डॉ.परीक्षित यादव, जिल्हा परिषद समितीच्या सभापती नंदा तांबे, उपसभापती ओमेश जपे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे उपस्थित होते. प्रातिनिधीक स्वरुपात रहिवाशांना घराची चावी उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

Visits: 104 Today: 1 Total: 1111747

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *