अपुर्या सुविधा असूनही ‘काजवा महोत्सवा’ला पर्यटकांची गर्दी! दररोज हजारो पर्यटकांच्या नजरा न्याहळताहेत चमचमणारी मायावी दुनिया..
नायक वृत्तसेवा, अकोले
जूनचा महिना म्हणजे भंडारदरा धरणाच्या परिसरात भटकंतीचा काळ समजला जातो. घनदाट नभांनी भरलेलं आकाश, अधुनमधून कोसळणार्या जलधारा, सोबतीला बोचरा वारा आणि संध्याकाळी कळसूबाई-हरिश्चंद्रगडाच्या घनदाट अभयारण्यातील धरणीवर अवतरणारे तारांगण अर्थात काजव्यांचा संचार अनुभवणं म्हणजे स्वर्गीय सुखाची अनुभूती घेण्यासारखेच आहे. सध्या लांबलेल्या मान्सूनने राज्यभरातील पर्यटकांना मोहीनी घालणार्या काजवा महोत्सवाचा कालावधीही वाढला आहे. त्यामुळे दररोज हजारो पर्यटकांची पावलं या परिसराकडे वळत आहेत. निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार न्याहाळण्यासाठी होत असलेली गर्दी कोरोनाच्या संकटात अडचणीत आलेल्या येथील हॉटेल व्यावसायिकांना ‘बुस्टर’ देणारी ठरत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर. सह्याद्रीच्या कणखर रांगेत सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभा राहिलेला भंडारदर्याचा विस्तीर्ण जलाशय, रतनगड, हरिश्चंद्रगड, अलंग-कुलंग-मलंग, शिखरस्वामीनी कळसूबाई, पाचपट्टा अशा कितीतरी छोट्या-मोठ्या दुर्गांनी सजलेला हा तालुका पावसाळ्यात आपले रुपडेच पालटतो. या संपूर्ण परिसराला विपूल प्रमाणात वृक्षसंपदा लाभली आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारन्याचा परिसर तर निसर्ग भटक्यांसाठी सदैव आकर्षणाचा केंद्रच राहीले आहे. पावसाळ्यातील चार महिने आणि त्यानंतर काही काळ या परिसरात पर्यटकांचा मोठा राबता असतो. त्यावरच येथील अर्थकारणाला गती मिळते. अर्थात भंडारदरा धरणाच्या परिसराला निसर्गाने भरभरुन सौंदर्य दिले असले तरीही शासन पातळीवरुन या परिसराचा फारसा विकास झालेला नाही, अथवा पर्यटकांच्या सोयी-सुविधांचाही कोठे विचार केला गेलेला नाही. मात्र खासगी हॉटेल व्यावसायिकांनी मात्र येथे दाटी केल्याने भंडारदर्यात येणार्या पर्यटकांना खाण्या-पिण्याच्या गोष्टींसाठी फारसा संघर्ष करावा लागत नाही.
ग्रीष्म ऋतू संपण्याचा कालावधी म्हणजे भंडारदर्याच्या परिसरात निसर्गाचा चमत्कार अनुभवण्याचा काळ. भंडारदरा, रतनवाडी, घाटघर आणि कळसूबाई शिखराच्या परिसरातील हजारो झाडांवर आणि वृक्षवेलींवर चमचमणारी काजव्यांची मायावी दुनिया पाहून आपण एखाद्या जादुगाराच्या दुनियेत तर आलो नाहीत ना अशी शंका सहज मनात यावी असाच हा देखावा असतो. भंडारदरा धरणाच्या विस्तीर्ण जलसाठ्याच्या परिसरातील घाटघर, पांजरे, उडदावणे, कोलटेंभे, कळसूबाईच्या पायथ्याला बारी व रंधा धबधब्याच्या परिसरातील हिरडा, बेहडा, सादडा, अर्जुन, जांभूळ, आंबा आणि उंबर अशा ठराविक जातीच्या झाडांवर लक्ष्यावधी काजव्यांचा लखाकणारा संचार म्हणजेच भंडारदर्याचा काजवा महोत्सव.
दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मान्सूनची संततधार सुरु होईस्तोवर हा काजवा महोत्सव सुरू असतो. विशिष्ट जातीच्या झाडांवर एकाचवेळी लक्ष्यावधी काजव्यांची लुकलुक एखाद्या ख्रिसमस ट्री सारखीच दिसावी अशीच असते. ज्या झाडांवर हे अल्पजीवी वस्ती करतात त्या झाडाच्या खोडावर, पानावर, फुल आणि फळावरही त्यांची चमचम सुरु असते. हे दृष्य डोळ्यात साठवण्यासाठी राज्यभरातून हजारो पर्यटक दरवर्षी या परिसरात हजेरी लावतात आणि काजव्यांची मायावी दुनिया पाहून अक्षरशः हरकून जातात. गेल्या वर्षी कोविडच्या प्रादुर्भावामूळे देशभरात टाळेबंदी लागू असल्याने काजवा महोत्सव झाला नव्हता. मात्र यावर्षी संक्रमणाची दुसरी लाट काजवा महोत्सवाच्या कालावधीतच कमी झाल्याने जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणचे निर्बंध शिथील झाले. त्यामुळे सध्या या परिसरात पर्यटकांची मोठी गजबज पहायला मिळत आहे.
भंडारदरा धरणाचा परिसर निसर्ग संपदेने नटलेला असल्याने देशभरातील पर्यंटकांना या परिसरात येण्याचा मोह होत असतो. त्यामुळे वर्षातील सहा महिने या परिसरात पर्यटकांचा मोठा राबता असतो. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येवूनही या परिसराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. सरकारने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी घाटघर परिसरात इको सीटीही उभारली आहे. मात्र या सुविधा फारच तोडक्या ठरतात. भंडारदरा धरणाच्या भिंतीलगत असलेल्या शेंडी येथे शाकाहरी व मांसाहारी जेवनासाठी खासगी हॉटेल्स आहेत. मात्र शुद्ध शाकाहारी असलेल्या पर्यटकांसाठी अपवाद वगळता फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. वन विभागाकडून घाटघर व रतनवाडी येथील रस्त्यांवर तपासणी नाके उभारले गेले आहेत.
या परिसरात प्रवेश करण्यापूर्वी पूर्व परवानगी घेवून काही शुल्कही भरावे लागतात, मात्र त्याबदल्यात वन विभागाकडून कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. रतनवाडी अथवा घाटघरच्या शेंडीतील तपासणी नाक्यापासून पूर्ण परिक्रमेचे अंतर साधारणतः पन्नास किलोमीटरचे आहे. मात्र नेमके काजवे कोठे पहावेत हेच पर्यटकांना माहिती नसल्याने या संपूर्ण परिसरात वाहनांची प्रचंड वर्दळ असते आणि त्यातील पर्यटकांच्या नजरा आसपासच्या झाडांवर सारख्या फिरत असतात, काहींना काजव्यांची मायावी दुनिया दृष्टीस पडते, तर काही उगाच समाधान मानूनही माघारी फिरतात. ज्या भागात काजव्यांचे प्रमाण अधिक आहे, अशा ठिकाणी पर्यटकांना ते सुलभतेने पाहता यावे यासाठीही कोठे व्यवस्था नाही किंवा माहिती देणारे फलकही नाहीत. यासर्व गोष्टी पुरविल्या गेल्यात तर या भागात येणार्या पर्यटकांची संख्या वाढून आसपासच्या आदिवासी बांधवांसाठी उपजीविकेचे साधन निर्माण होवू शकते. मात्र तसा कोणताही विचार आजवर झाला नसल्याचे या परिसरात पर्यटनासाठी आल्यानंतर लक्षात येते.