छत्रपतींचे स्मारक अद्यापही खासगी परवानगीच्या कचाट्यातच! महिन्याच्या नोटीसला सहा महिने लोटले; बसस्थानक चौकातच अश्वारुढ प्रतिमेची मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या चार दशकांपासून गावठाणाच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे सुशोभिकरण व्हावे यासाठी सुरु झालेली जनचळवळ आता काहीशी थंडावली आहे. संबंधित जागा मालकाने बांधकाम सुरु करताच स्मारकाच्या सुशोभिकरणाचा विषय समोर आला होता. पालिकेनेही जनभावना लक्षात घेत जागामालकाशी चर्चेतून मार्ग काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यातून तोडगा न निघाल्याने संबंधिताला महिन्याभरात अतिरीक्त बांधकाम हटविण्याची नोटीस बजावण्यात आली, मात्र या नोटीशीला सहा महिन्यांचा काळ लोटूनही परिस्थितीत कोणताही बदल नसल्याने स्वराज्य संस्थापकांचे स्मारक खासगी परवानगीच्या कचाट्यात अडकल्याचे दिसत आहे. त्यातूनच आता छत्रपतींचे भव्य-दिव्य स्मारकच व्हावे यासाठी सध्याच्या छोटेखानी स्मारकाऐवजी बसस्थानक चौकातच महाराजांची अश्वारुढ प्रतिमा स्थापन करण्याची मागणी समोर येवू लागली आहे. संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी जनभावनेचा आदर करुन याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणीही या निमित्ताने समोर आली आहे.


सन 1980 सालच्या सुमारास संगमनेर नगरपरिषदेने अरगडे गल्लीतील सध्याच्या ठिकाणी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची अर्धाकृती प्रतिमा बसविली होती. गेल्या चार दशकांत संगमनेर शहराच्या जडणघडणीत मोठा बदल झाला, मात्र या कालावधीत येथील छत्रपतींच्या स्मारकाचा मात्र सगळ्यांनाच सोयीस्कर विसर पडला. सहा महिन्यांपूर्वी या स्मारकाच्या मागील बाजूस असलेल्या नॉव्हेल्टी लॉजची इमारत जागा मालकाने पाडली व त्याजागी नव्याने बांधकाम करण्याची योजनाही आखली. ते निमित्त पुढे करुन संगमनेरातील शिवप्रेमी नागरिकांनी एकत्र येत सध्याच्या शिवस्मारकाचे विस्तारीकरण करुन सदरच्या स्मारकाचे सुशोभिकरण करण्याची मागणी पुढे रेटली.

सदरचा विषय प्रत्येकाच्या भावनेशी निगडीत असल्याने पालिकेनेही त्यादृष्टीने सुरुवातीला सकारात्मक पावले उचलली. युवकनेते सत्यजीत तांबे यांनी जागामालक असलेल्या योगेश गाडे यांच्याशी चर्चा करुन स्मारकासाठी 15 फुट जागा सोडण्याची विनंती केली. मात्र संबंधित जागा मालकाने पाच फूटापेक्षा अधिक जागा सोडण्यास असमर्थता दर्शविल्याने या विषयाला वादाचे स्वरुप प्राप्त झाले. छत्रपतींचे स्मारक हा प्रत्येकाच्या अस्मितेचा विषय असल्याने पालिकेने जनभावनेच्या विरोधात न जाता संबंधित जागा मालकाला नियमानुसार बांधकाम नसल्याचे सांगत महिन्याभरात अतिरीक्त बांधकाम काढून घेण्याची नोटीस बजावली. महामार्ग विभागाकडूनही पुणे-नाशिक रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित असल्याने त्यांच्याकडूनही या बांधकामाविषयी नकारघंटा आल्याने पालिकेच्या महिन्याच्या नोटीसवर गेल्या सहा महिन्यापासून सदरचे बांधकाम आणि त्यातूनच छत्रपतींच्या स्मारकाचे सुशोभिकरणही अडकले आहे.

सध्या असलेल्या स्मारकाची किती जागा खासगी आणि किती शासकीय आहे याबाबत संगमनेरात वेगवेगळी मतांतरे आहेत. काहींच्या मते सदरची जागा पालिकेच्या मालकीची असल्याचेही पुढे आले आहे. याबाबत दिवंगत नेते राधावल्लभ कासट यांनीही सूचक वक्तव्य केले होते. मात्र पालिकेच्या दप्तरी या जागेबाबत काणेतीही कागदपत्रे अढळ होत नसल्याने सध्यातरी या जागेचा मालकी हक्क खासगी असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे सध्याच्या जागीच स्मारक उभारायचे ठरल्यास त्याला अनेक मर्यादा असतील हे निश्चित आहे. त्यामुळे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या व छत्रपतींच्या अखेरीच्या दिवसांत त्यांचा पदस्पर्श अनुभवलेल्या संगमनेर शहरातील त्यांचे स्मारकच खासगी जागामालकाच्या प्रतीक्षेअभावी रखडले आहे. पालिकेनेही केवळ जनभावना लक्षात घेवून नोटीस बजावण्याशिवाय कोणतीही कृती केलेली नाही.

या सर्व अडचणी आणि उपलब्ध जागा विचारात घेता सध्याच्या ठिकाणी शिवप्रेमींच्या मनातील शिवस्मारक निर्माण होण्याची शक्यता खुप कमी असल्याने नवा विचार समोर आला आहे. संगमनेर बसस्थानकाच्या निर्मितीतून बसस्थानक चौक अधिक मोठा आणि भव्य दिसू लागला आहे. या चौकातच स्वराज्य संस्थापकांचे दिव्य स्मारक निर्माण झाल्यास संगमनेर शहराच्या वैभवात मोठी भर पडेल असा मतप्रवाह आता रुंद होवू लागला आहे. त्यासाठी संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त होत असून संगमनेरात छत्रपती शिवाजी महारांच्या अश्वारुढ प्रतिमेचे भव्य-दिव्य स्मारक व्हावे ही संगमनेरातील शिवप्रेमींची मागणीही त्यातून पुढे आली आहे. या नव्या विचाराचा संगमनेरच्या राजकीय धुरिणांनी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.

संगमनेर शहर अगदी प्रागैतिहापासून चळवळींचे केंद्र राहीले आहे. शिवकाळातही शहराचे महत्त्व अबाधित असल्याचे दाखले इतिहासाच्या पानांत सापडतात. सन 1679 साली जालना लुटीनंतर रायगडाकडे परततांना शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने संगमनेरचा परिसर पावन झाला आहे. याच परिसरात छत्रपतींचा मुघल सैन्याशी मुकाबला झाल्याचे काही इतिहासकार मानतात. या दरम्यान महाराजांची प्रकृती बिघडल्याने बर्हिजी नाईक यांनी त्यांना येथून पट्टेकिल्ल्यावर नेल्याचेही दाखले इतिहासात सापडतात. शिवजन्मापूर्वी महाराजा शहाजीराजे व राष्ट्रमाता जिजाऊसाहेबांचाही या परिसराला पदस्पर्श लाभला आहे. अशा वेगवेगळ्या घटना आणि घडामोडींनी भरलेल्या संगमनेर शहरात खुद्द स्वराज्याच्या छत्रपतींनाच आपल्या भव्य-दिव्य स्मारकाची प्रतीक्षा आहे.


संगमनेर शहराचे प्राचिनत्त्व आणि इतिहासकाळातील शहराचे महत्त्व लक्षात घेता या शहरातील ऐतिहासिक खुणा जोपासण्याची गरज आहे. मात्र गेल्या काही वर्षात या गोष्टी मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी शहराच्या चारही रस्त्यांवर पुरातन वेशी होत्या. मात्र कालौघात त्या समूळ नष्ट झाल्या. आजच्या स्थितीत शनी मंदिराजवळ एकमेव वेस शिल्लक असून काही वर्षांपूर्वी ती देखील नष्ट होण्याच्या स्थितीत होती. दैनिक नायकने त्याचा पाठपुरावा केल्यानंतर पालिकेने त्याचे संरक्षण व संवर्धन केले. आता चार दशकांपूर्वी शहरात उभ्या राहीलेल्या आणि आज शहराची ओळख असलेल्या शिवस्मारकाचा विषय चव्हाट्यावर आला असून तो सोडवण्यासाठी दिसणारी राजकीय अनास्था शिवप्रेमींना अस्वस्थ करणारी ठरत आहे.

Visits: 109 Today: 1 Total: 1417193

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *