कोपरगावमध्ये काळे-कोल्हे गटामध्ये जोरदार राडा पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करुन कार्यकर्त्यांना पांगविले

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील काळे आणि कोल्हे यांच्यातील पूर्वापार राजकीय संघर्ष आता पुन्हा एकदा जोर पकडू लागला आहे. याचीच परिणीती मंगळवारी (ता.१५) जिल्हा नियोजन समितीने (डीपीडीसी) मंजूर केलेल्या कामांच्या आरंभ श्रेयवादातून होत, दोन्ही गट नेत्यांच्या उपस्थितीत एकमेकांना भिडले. यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार आशुतोष काळे विरुद्ध भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनीही कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत चिथावल्याचे दिसून आले. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवावे लागले.

कोपरगाव येथे नगरपालिका हद्दवाढ भागातील डांबरीकरणच्या कामाचा भूमिपूजन आरंभ करण्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. डीपीडीसीमधून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या कामांना मंजुरी आणली असून आणि जिल्हाधिकार्यांच्या परवानगी शिवाय डीपीडीसीच्या कामांचा आरंभ न करण्याचा आदेश असताना आमदार काळे यांच्या हस्ते आणि कोपरगाव नगरपालिका प्रशासनाच्या सहमतीने कार्यक्रम घेण्यास विवेक कोल्हे यांनी विरोध केला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी दोन्ही गटाचे फलक लागले होते. तर समर्थक-कार्यकर्ते परस्परांना शिवीगाळ करत अंगावर धावून जात होते. त्यात आमदार काळे आणि विवेक कोल्हे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर बसवत नाचवले. यावेळी नेत्यांनीही एकमेकांना आव्हानात्मक इशारा केल्याने मोठा गोंधळ झाला. पोलिसांना दोन्ही गटांना आवरणे अगदी कठीण झाले होते. विवेक कोल्हे यांनी पालिकेच्या मुख्याधिकार्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याने यावेळी पोलिसांना बळाचा सौम्य वापर करावा लागला. नंतर पालिकेच्यावतीने दोन्ही गटाने लावलेले फलक काढून घेण्यात आले. दोन्ही गटाच्या नेत्यांनी थेट समोरासमोर येत आव्हानात्मक भाषा वापरल्याने महायुतीत एकत्र आलेल्या राज्यातील भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांत स्थानिक पातळीवर मात्र मोठा संघर्ष होणार असल्याची नांदी कोपरगावमधल्या काळे-कोल्हे यांच्या संघर्षातून दिसून आली आहे.
