स्वकर्तृत्वावर गाठलं जीवनात ठरविलेलं ध्येय! संगमनेरचा अभिजीत खेडलेकर हसत-खेळत झाला आर्किटेक्ट

श्याम तिवारी, संगमनेर
पालकांची प्रतिभा आणि कौटुंबिक वातावरण मुलांच्या जडणघडणीत प्रमुख भूमिका बजावतात असं म्हटलं जातं, ते संगमनेरच्या अभिजीत संतोष खेडलेकर या तरुणाने अगदी तंतोतंत खरं करुन दाखवलं आहे. आपल्या वडिलांनी जगभरातून जमविलेली पुस्तकं चाळताचाळता बालपणीच त्याची दृष्टी व्यापक बनली. या दरम्यान अनेक महानुभावांचा सहवास लाभल्याने त्याला दृष्टीकोनही लाभला. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर काहीतरी नवीन करण्याच्या इर्षेने त्याने आपल्यातील उपजत गुणांनाही नेहमीच महत्त्व दिले. त्यामुळे पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीचा प्रवास करीत असतांनाच त्याने आपल्या मनातील छंदही जोपासले. एक उत्तम छायाचित्रकार होण्यासह त्याने पशु-पक्ष्यांच्या संरक्षणासाठी मोठी भूमिकाही बजावली. यासर्व गोष्टी करतांना त्याने निश्चित केलेल्या ध्येयावरचे ‘लक्ष्य’ही विचलीत होवू दिले नाही, परिणाम आज तो स्थापत्य विशारद म्हणून उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या उत्तुंग यशात त्याची जिद्द आणि आई-वडिलांच्या उत्तम संस्कारांची झलकही पहायला मिळते.

संतोष खेडलेकर म्हणजे पत्रकारितेतून आपली प्रतिभा वठवणारे व्यक्तिमत्त्व. पुढे संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून त्यांनी संगमनेरच्या इतिहासाची विखुरलेली पानं एकत्रित करुन त्यांचा संच करण्याची आपली आवड जोपासली. पत्रकारिता करतांना समाजातील उपेक्षित घटकांत गणल्या जाणार्या तमाशा क्षेत्राशी त्यांची ओळख झाली आणि राज्यातील पहिल्या क्रमांकाचे तमाशा मंडळ असलेल्या रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर या तमाशा फडाच्या मालक (स्वर्गीय) कांताबाई सातारकर यांचा मानसपुत्र होण्याइतपत त्यांनी तमाशाला आपलंस केलं. त्यांनी लिहिलेल्या सातारकरांच्या जीवनावरील पुस्तकातून तमाशा कलावंताचे जीवनही त्यांनी वाचकांसमोर आणले. खेडलेकरांचा कलही लहानपणापासून लेखणीशी जोडला गेल्याने जीवनप्रवासात त्यांना अनेक महानुभावांचा सहवास लाभला. त्यातील अनेकांना खेडलेकरांच्या रसाळवाणीची आणि प्रगल्भ लेखणीची भूरळ पडली आणि ते कायमचेच त्यांचे स्नेही झाले.

आता ज्याचे वडीलच उत्तम वाचक, लेखक, पत्रकार असतील त्याच्या घरात ग्रंथसंपदेला काय तोटा? त्यामुळे साहजिकच अभिजीतला अगदी लहानवयातच पुस्तके चाळण्याची हौस जडली. खेडलेकरही आपल्या मुलासाठी बालसाहित्य आणून देऊन त्याला दिशा देत. या दरम्यान त्यांच्याकडे गीतकार प्रवीण दवणे, जांभूळ आख्यान फेम लोकशाहीर (स्वर्गीय) विठ्ठल उमप, सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांसारख्या दिग्गजांच्या भेटी होत असल्याने छोट्या अभिजीतचा त्यांनाही लळा लागला. शाहीर उमप तर लहानग्या अभिजीतला नातवासमान प्रेम करायचे. प्रवीण दवणे संगमनेरला येत तेव्हा त्याच्यासाठी पुस्तके, तर सोलापूरकर आठवणीने खाऊ घेवून येतात. त्यांच्या सहवासातून त्याला व्यापक दृष्टीकोन मिळाला. या सर्व गोष्टींमुळे अगदी लहान वयातच त्याने शब्दांवर प्रभुत्त्व मिळविले. शालेय जीवनात असतांना शाळेत तो आवर्जुन भाषण करायचा. लोकमान्य टिळकांच्या संगमनेर भेटीवरील विस्तृत माहिती आणि टिळकांच्या ‘स्वराज’ या संकल्पनेवरील त्याचं बालवयातील भाषणं त्याच्या शिक्षकांनाही भावलं होतं.

अवघ्या सहा वर्षांचा असतांना तो पहिल्यांदा आकाशवाणीवर पोहोचला. त्यानंतरही त्याचे कार्यक्रम प्रसारित झाले. वडील पत्रकारितेत असल्याने त्यालाही मुलाखती घ्यायला आवडायचं. नेमक्या प्रश्नातून त्यांना बोलकं करणे याची आवडही त्याच्यात निर्माण झाली आणि एकेदिवशी ‘माझा आवडता नेता’ या विषयावरील शालेय निबंध लिहीण्यासाठी तो थेट माजीमंत्री (स्वर्गीय) बी.जे.खताळ पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचला. यावेळी त्याने दादांना विविध प्रश्न विचारून त्यांच्याकडून हवी ती माहिती मिळविली. दादांनीही नातू प्रश्न विचारतोय म्हणून कौतुकाने त्याच्या बालसुलभ प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर संतोष खेडलेकर जेव्हा पाटलांना भेटले तेव्हा पाटलांचे वाक्य होते, ‘तुम्ही खरोखर पत्रकार असाल, पण माझा हा नातू तुमच्यापेक्षाही सरस पत्रकार आहे…’ अर्थात यात खताळ पाटलांचा नातवाबद्दलच्या कौतुकाचा भाव होता. यावरुन एखादी गोष्ट आत्मसात करण्यासाठी आणि त्यात निपूण होण्यासाठीची त्याची धडपडही अगदी स्पष्टपणे दिसून आली. संगमनेरात अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन झाले तेव्हा छोट्या अभिजीतने इतर काही सहकार्यांसह त्याचा आवडता बालगायक रोहित राऊत याची प्रकट मुलाखतही घेतली होती.

इयत्ता अकरावीत असतांना त्याने ‘स्थापत्य शास्त्रात’ भविष्य घडवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या पालकांनीही त्याच्या निर्णयाचा सन्मान करतांना लागलीच त्याला आवश्यक असलेल्या गोष्टींची पूर्तता केली. पुढील शिक्षणासाठी जेव्हा तो नाशिकला गेला तेव्हा त्याला जंगल सफारी, गडकोट भ्रमंती, पक्षी निरीक्षण आणि छायाचित्र काढण्याचा छंद जडला, मात्र त्यासाठी त्याने अभ्यासाकडे कसूभरही दुर्लक्ष होवू दिले नाही. त्यातून एक उत्तम छायाचित्रकार निर्माण झाला आणि सोबतच एक संवेदनशील निसर्गप्रेमीही जन्माला आला. नाशिकमध्ये असतांना जंगली पशु-पक्ष्यांच्या संरक्षणासाठी त्याने आपल्या मित्रांसोबत काम सुरु केले. या काळात नाशिक शहरात शिरलेल्या बिबट्यांना पकडणे आणि त्यांना सुरक्षितपणे पुन्हा जंगलात सोडण्याच्या मोहिमेतही त्याने वन विभागासोबत काम केले. या कालावधीत नायलॉन मांजामुळे संकटात सापडलेल्या शेकडो पक्ष्यांना जीवदान देण्याचे महद् कार्यही त्याने लिलया पूर्ण केले. त्याची दखल नाशिकमधील अनेक वृत्तपत्रांनी अगदी ठळकपणे घेतली.

जे करायचे ते उत्तम हा आपल्या वडिलांचा गुण घेवून त्याने केवळ गुणांसाठी अभ्यास केला नाही, तर त्या विषयातले प्रत्येक बारकावे आत्मसात करण्याचा सतत प्रयत्न केला. आर्किटेक्चरच्या इंटर्नशीपसाठी अनेकजण आपल्या भोवतीची अथवा पुणे, मुंबई, नाशिक किंवा हैद्राबाद सारखी शहरं निवडतात. अभिजीतने मात्र यापेक्षा वेगळं करुन थेट केरळची निवड केली. तेथील हवा, पाणी, अन्न आणि भाषा या सर्वच गोष्टी त्याच्यासाठी प्रतिकूल होत्या, मात्र आपल्या ध्येयाच्या वाटेत त्यांना त्याने अडथळा होवू दिले नाही. या काळात तो स्वतःच स्वयंपाक करुन तेथे राहीला आणि आज अष्टकोनी यश संपादीत करीत ‘स्थापत्य विशारद्’ ही पदवी त्याने प्राप्त केली. घरातील वातावरण, आई-वडिलांचे संस्कार आणि निश्चित ध्येयाच्या दिशेने शाश्वत प्रवास केला की यशाचे द्वार आपोआप उघडले जाते याचा वस्तुनिष्ठ आदर्शच अभिजीत संतोष खेडलेकर या ध्येयवेड्या तरुणाने आजच्या पिढीसमोर ठेवला आहे. आपले बालहट्ट पूर्ण करीत, मनाप्रमाणे जीवनाचा आनंद घेत, त्याने हसतखेळत मिळविलेलं हे यश आजच्या तरुणांना निश्चितच दिशादर्शक ठरेल. जीवनातलं ध्येय एकदा निश्चित केलं, आणि ते पूर्ण करण्याचं स्वप्न उघड्या डोळ्यांनी पाहिलं की आपोआप एक एक पायरी होते. अभिजीतचा शिक्षण प्रवास हेच सांगतोय.

