संगमनेर तालुका पोलिसांची ‘दमदार’ कारवाई! साठ लाख रुपयांच्या दरोड्याचा अवघ्या चोवीस तासांतच तपास; सर्व आरोपी अटकेत..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दितील कासारे शिवारात मालट्रकवर दरोडा टाकून सुमारे 62 लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याच्या प्रकरणात तालुका पोलिसांनी ‘दमदार’ कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासांतच या प्रकरणाची उकल करीत कोपरगाव तालुक्यातील एकासह तिघांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून चोरुन नेलेला बहुतेक मालही हस्तगत करण्यात आला असून रस्तालुटीची ही आंतरराज्य टोळी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांनी या दरोड्यातील बारकावे शोधून संशयिताचा माग काढला. त्यातून या संपूर्ण प्रकरणाची उकल होवू लागली आहे. अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गेल्या बुधवारी (ता.11) बिहार येथील अजितकुमार सूर्यदेव यादव हा आपल्या ताब्यातील मालट्रक (क्र. सी.जी.04, एल.पी.5601) मधून 40 लाख 51 हजार 901 रुपये किंमतीच्या अॅल्युमिनिअम इग्नोट्स घेवून संगमनेर तालुक्यातील लोणी ते नांदूर शिंगोटे या रस्त्याने प्रवास करीत होता. या दरम्यान तो लोहारे शिवारातून जात असतांना दोन मोटार सायकलवरुन आलेल्या अंदाजे 25 ते 30 वयोगटातील पाच जणांनी त्याचे वाहन अडवून चालकाला दमदाटी करीत वाहनाचा ताबा घेतला. तेथून जबरदस्तीने तो मालट्रक दापूर (ता.सिन्नर, जि.नाशिक) येथे नेवून रस्त्याच्या वाहनचालक व त्याच्या सहाय्यकाला एका बाभळीच्या झाडाला बांधून त्यांनी मालट्रक पळवून नेला.
त्यानंतर या दोघांनीही आराडाओरड करुन आपली सुटका करवून घेत स्थानिकांच्या मदतीने वावी पोलिसांना घटनेची माहिती कळविली. वावी पोलिसांनी प्रकरणाची खातरजमा करुन याबाबत संगमनेर तालुका पोलिसांना खबर दिली. दरोडेखोरांनी जातांना चालकाचा पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल, आधारकार्ड आणि तीन हजारांची रोकडही काढून घेतली होती. याबाबत चालक अजितकुमार यादव याने शुक्रवारी (ता.13) रात्री संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करुन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार व उपनिरीक्षक विजय खंडीझोड यांनी तपास आपल्या हाती घेतला आणि अवघ्या काही वेळातच यातील पहिला आरोपी लपून बसलेल्या जागेचे ‘लोकेशन’ मिळाले.
या प्रकरणाचे तपासी अंमलदार पो. नि. पवार यांनी स्वतः आरोपीचा माग काढीत थेट कोपरगाव गाठले. कोपरगाव पोलिसांच्या मदतीने त्यांनी करंजी येथील समाधान देवीदास राठोड (वय 21) याच्या मुसक्या आवळल्या. त्याला ताब्यात घेवून कोपरगाव पोलीस ठाण्यात आणल्यानंतर या दरोड्यात परिसरातील आणखी कोणाचा सहभाग असल्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दादू, राजू या दोघांसह बद्रीआलम व सलिम अली (दोघेही रा.मुंब्रा) यांची नावे सांगीतली. तालुका पोलिसांनी त्यानंतर वेगाने सूत्रे फिरवित या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य तिघांनाही ताब्यात घेतले असून पोलीस एकाचा मागावर आहेत, लवकरच त्याच्याही मुस्कया आवळल्या जातील असा विश्वास तालुका पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात तालुका पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यापासूनच प्रकरणातील बारकावे शोधून प्रत्येक शक्यता तपासून पाहण्यास सुरुवात केली. तालुक्यात यापूर्वी घडलेले असे प्रकार व त्यातील आरोपींची सद्यस्थिती, दरोडेखोरांनी वाहन घेवून पसार होताना चालकाला मोबाईलही सोबत नेल्याने पोलिसांना तपासात त्याचाही फायदा झाला. यातून कोपरगाव तालुक्यातील करंजीत लपून बसलेला समाधान राठोड हाती लागला आणि अवघ्या 24 तासांतच मालट्रकसह 61 लाख 59 हजार 901 रुपयांच्या भीषण दरोडे प्रकरणाची तालुका पोलिसांनी उकल केली. श्रीरामपूर उपविभागाच्या पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे संगमनेरात येत असून या प्रकरणाच्या तपासाबाबत त्या माध्यमांना माहिती देणार आहेत.
पोलिसांमध्येही ‘श्रेयवाद’!
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दित घडलेल्या या प्रकरातील संशयित आरोपी कोपरगाव तालुक्यातील करंजीत लपून बसल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक तथा तपासी अंमलदार पांडुरंग पवार यांना मिळाली. त्यांनी याबाबत कोपरगाव पोलिसांचे सहकार्य घेतले. तपासादरम्यान आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून अशा गोष्टी नेहमी घडत असतात. कोपरगावमध्ये सापडलेला हा एकमेव आरोपी. उर्वरीत चार आरोपी अन्य ठिकाणचे. त्यातही कोपरगावात पकडलेल्या आरोपीबाबत सर्व माहिती संगमनेर तालुका पोलिसांनी दिलेली असतानाही संगमनेरातील दरोडे प्रकरणाची आपण उकल केल्याचे संपूर्ण श्रेय घेण्यासाठी कोपरागव पोलिसांनी घाईघाईत तोंड झाकलेल्या एकमेव आरोपीसह माध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती पोहोचवली.