सरकारी कामात अडथळा आणीत महिला तलाठी कर्मचार्याचा विनयभंग! संगमनेर खुर्दच्या उपसरपंचाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारस नोंदीच्या शुल्लक कारणावरुन महिला तलाठ्यास भर रस्त्यात थांबवून, त्यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ व दमदाटी करीत अश्लिल हावभाव करणार्या संगमनेर खुर्दच्या उपसरपंचाविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आज दुपारी तीन वाजण्याचा सुमारास सदरचा प्रकार संगमनेर खुर्दमधील मारुती मंदिरासमोर घडला. या प्रकरणी संबंधित महिला कर्मचार्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश साहेबराव शिंदे याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणण्यासह विनयभंगाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतून खादीच्या आड दडलेल्या पशूचे दर्शन झाले असून भररस्त्यात महिला कर्मचार्याशी अश्लिल आणि असभ्य वर्तन करणार्या या कथीत ‘नेत्यावर’ पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकातून समोर येत आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षांपासून संगमनेर खुर्दच्या तलाठी कार्यालयाचे कामकाज करणारी एक महिला कर्मचारी नेहमीप्रमाणे आजही आपल्या संगमनेर खुर्द येथील तलाठी कार्यालयात कार्यरत होत्या. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वरीष्ठ कार्यालयास कामकाजाचा अहवाल सादर करण्यासाठी त्या आपल्या खासगी मोपेडवरुन निघाल्या. त्यांची दुचाकी संगमनेर खुर्द येथील मारुती मंदिराजवळ पोहोची असता संगमनेर खुर्दचा उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे याने पाठीमागून आवाज देत त्यांना थांबवले.
जवळ येताच त्याने ‘माझ्या वारस नोंदीच्या कामाचे काय झाले?’ असे दरडावणीच्या स्वरात म्हणत ‘त्या’ महिला कर्मचार्याशी भर रस्त्यात हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यावर ‘माझ्या पातळीवर तुमचे काम पूर्ण होवून तुमचा ठराव पुढच्या टेबवर गेला आहे, तो मंजूर होवून आला की लगेच मी फेरला नोंद ओढून देते’ असे विनम्रपणे सांगत त्या निघाल्या असता या बहाद्दराने चक्क त्यांच्या मोपेडची चावी काढून घेत त्यांच्या अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन हावभाव करायला सुरु वात केली. हा सगळा प्रकार आसपास जमलेले अनेक ‘बघे’ अगदी मूकपणे बघत होते, पण नेताजीच मैदानात आहेत म्हटल्यावर त्यांच्यातला एकही माणूस जिवंत झाला नाही
त्यातून मनोबल वाढलेल्या या महाशयांच्या तावडीतून सुटका करुन घेण्यासाठी त्या महिला कर्मचार्याने वरीष्ठ कार्यालयात जाण्याची गरज सांगून आपल्या जवळील अहवालाच्या प्रती त्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला असता नेताजींनी त्यांच्या हातातील सरकारी कागदपत्रे हिसकावून घेत हवेत भिरकावून दिली. तरीही बघ्यांपैकी कोणीच पुढे सरसावले नाही. य प्रकाराने संतप्त झालेल्या त्या महिला कर्मचार्याने आपली मोपेड उभी करुन इतरत्र विखुरलेली सर्व कागदपत्रे गोळा केली व उपसरपंचाच्या हातातील चावी ओढून घेत आपली मोपेड गाठली. यावेळी त्या नेत्याने त्या महिला कर्मचार्याचा हात पकडून त्यांच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केले. ‘माझे कोणीच वाकडे करु शकत नाही; जे करायचे ते करं. तुम्ही ऑफीसात भाड्याचे तट्टू ठेवले आहेत. एकदा तुमच्या तोंडावरचे मास्क काढा, मग तुमचे व्हिडिओ काढून व्हायरल करतो’ असे म्हणत अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करीत राहीला.
हा प्रकार अत्यंत संतापजनक असून पोलिसांनी संगमनेर खुर्दचा उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी कलम 353, विनयभंग केल्याप्रकरणी 354 सह धमकावणे व शिवीगाळ केल्याचे कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार अत्यंत संतापजनक असून नेत्यांच्या वेशात दडलेल्या अशा प्रवृत्तींवर वेळीच कायद्याचा आवर बसणं आवश्यक आहे. समाजाचे प्रतिनिधीत्त्व करतांना सभ्यता ठायी असायला हवी. तालुक्याच्या नेतृत्त्वाचीही तीच शिकवण असताना संगमनेर खुर्दच्या उपसरपंचाने केलेला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. शहरातूनही या घटनेबाबत संताप व्यक्त होत असून संबंधितावर कठोर कारवाई व्हावी अशा मागणी होवू लागली आहे.
संगमनेर खुर्दचा आवाका मोठा आहे. यातील बहुतेक भाग प्रवरा नदीपात्रालगत असल्याने तलाठी व मंडलाधिकार्यांना थेट वाळु तस्करांचा सामना करावा लागतो. अशावेळी महिला कर्मचार्यांची खरी परीक्षा असते. मात्र जेव्हा असे प्रसंग उद्भवतात तेव्हा वरीष्ठांनी आपल्या कर्मचार्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज असते. तीनबत्ती प्रकरणात कारवाईच्या बाबतीत पोलिसांची कचखाऊ भूमिका हेच सांगून गेली. आता महसूलच्या बाबतीतही काहीसा वेगळा मात्र तसाच प्रसंग समोर आल्याने आत्तापर्यंतच्या ‘कोविड व्यवस्थापनात’ डॉक्टर ठरलेले संगमनेरचे उपविभागीय अधिकारी त्याला कशाप्रकारे हाताळून ‘त्या’ उपसरपंचाचा गजापर्यंतचा मार्ग अधिक प्रशस्त करतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे..