व्यापारी गौतम हिरण हत्या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल 25 साक्षीदार तपासले; सुमारे पाचशे पानांचे दोषारोपपत्र

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राज्यभर गाजलेल्या व्यापारी गौतम हिरण हत्या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध गुरुवारी (ता.10) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुमारे साडेपाचशे पानांचे हे दोषारोपपत्र असून आरोपींनी पैशासाठी अपहरण व खून केल्याचे त्यात म्हटले आहे.

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या तसेच पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरलेल्या या हत्या प्रकरण प्रथमतः श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर 7 मार्च, 2021 रोजी हिरण यांचा मृतदेह सापडल्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य विधीमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून याचा तपास श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.

त्यानंतर यातील पाच मुख्य आरोपींना अटक झाली. आरोपींनी गुन्हा करण्यापूर्वी व गुन्हा केल्यानंतर त्यांच्या विविध ठिकाणच्या हालचालींचे सीसीटीव्ही फुटेज तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली कार, मोटरसायकल, हत्यारे तपासात जप्त करण्यात आली होती. तपासादरम्यान सुमारे 25 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर सुमारे पाचशे पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अजय राजू चव्हाण (वय 26 ), नवनाथ धोंडू निकम (वय 23), आकाश प्रकाश खाडे (वय 22), संदीप मुरलीधर हांडे (26), जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (वय 25) यांच्याविरुद्ध उपाधीक्षक संदीप मिटके यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.


असा रचला हत्येचा कट…
27 फेब्रुवारी, 2021 रोजी ढग्याचा डोंगर (ता.सिन्नर) येथे या गुन्ह्यातील आरोपी एकत्र आले होते. तेथे गौतम झुंबरलाल हिरण यांचे अपहरण करून त्यांना ठार मारून त्यांच्या जवळील रोख रक्कम चोरण्याचा कट रचला गेला. त्यानुसार आरोपींनी योजनाबद्धरीत्या हा गुन्हा केला. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर आरोपी पकडले गेले.

Visits: 179 Today: 1 Total: 2059363

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *