पुण्याच्या नृत्य संघांनी पटकाविला संगमनेर फेस्टिव्हलचा किताब! शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गाजवला फेस्टिव्हलचा चौथा दिवस

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर फेस्टिव्हलच्या चौथ्या दिवशी झालेल्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समूह नृत्य स्पर्धांनी फेस्टिव्हलचा रंगमंच गाजवला. महाविद्यालयीन गटात पुण्याच्या एंजल नृत्य सूमहाने शिवतांडव तर शालेय गटात डीडब्ल्यूएम नृत्य सूमहाने पाश्चात्य शैलीतील नृत्य सादर करीत संगमनेर फेस्टिव्हलचा किताब पटकाविला. मोठ्या गटात भिवंडीच्या सचिन नूत्य अकादमी व मालेगावच्या डझलर नृत्य अकादमीला आणि छोट्या गटात ध्रुव स्टार ग्रुपसह भिवंडीच्या द लिटील फूट क्रू संघाला विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला. तर जळगावच्या एम.जे.कॉलेज समूहाने बहारदार लोकनृत्य व संगमनेरच्या जी स्कॉड गर्ल्स ग्रुपने फ्री स्टाईल नृत्य सादर करीत विशेष पारितोषिक पटकाविले.

2008 साली सुरु झालेल्या संगमनेर फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धांचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षांत येथील समूह नृत्य स्पर्धा राज्यात गाजल्याने राज्यातील विविध ठिकाणच्या शाळा व महाविद्यालयांचे संघ या स्पर्धेत सहभागी होत असतात. दोन वर्षांच्या कोविड खंडानंतर यावर्षीच्या फेस्टिव्हलमध्ये चौथ्या दिवशी पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. छोट्या गटात पुण्याच्या डीडब्ल्यूएम नृत्य सूमहाने फ्री स्टाईल तर मोठ्या गटातही पुण्याच्याच एंजल नृत्य समूहाने अफलातून शिवतांडव नृत्याचे सादरीकरण करताना प्रत्येकी 11 हजार रुपयांसह संगमनेर फेस्टिव्हलचा किताब पटकाविला. या शिवाय छोट्या गटात संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या महाभारतावर आधारीत ओडिसी व भिवंडीच्या द लिटील फूट क्रू या संघांने सादर केलेल्या हिपहॉप शैलीतील नृत्यांना प्रत्येकी सात हजार रुपयांचे पहिले पारितोषिक विभागून देण्यात आले. तळेगाव दाभाडे येथील रॉ-बिट समूहाला पाच हजारांचे दुसरे, पुण्याच्या एंजल नृत्य अकादमीच्या स्मॉल गॅलेक्सी क्रू समूहाला तीन हजारांचे तृतीय तर संगमनेर नृत्य अकादमीच्या एसडीएस समूहासह अमृतवाहिनी नीडो समूह व स्ट्रॉबेरी इंग्लिश स्कूलच्या नृत्य समूहाला उत्तेजनार्थ पारितोषिक देवून गौरविण्यात आले. संगमनेरच्या जी स्कॉड नृत्य समूहातील लहान मुलींनी केलेल्या देखण्या नृत्याला विशेष बक्षिस देण्यात आले.

मोठ्या गटात झालेल्या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत भिवंडीच्या सचिन नृत्य अकादमीसह मालेगावच्या डझलर समूहाच्या नृत्याला पहिले बक्षिस विभागून देण्यात आले. नाशिकच्या ट्रायडंट समूहाने दुसरे, नारायणगावच्या द रि यूनियन समूहाला तिसरे, तर तळेगाव दाभाडेच्या एमडीए क्रू व मालेगावच्या एस. के. बंटीज् समूह यांना उत्तेजनार्थ आणि जळगावच्या एम. जे. कॉलेजच्या लोकनृत्याला विशेष पारितोषिक देण्यात आले. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना प्रोत्साहनपर पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले. डान्स इंडिया डान्स फेम दीपक हुलसुरे, रचना मालपाणी व मिलिंद पलोड यांनी परीक्षकाची जबाबदारी सांभाळली. कुलदीप कागडे यांचे सहकार्य लाभले.
