… तर पुढच्या वर्षी 25 लाखांचा निधी देणार ः डॉ. लहामटे सावरगाव घुले येथील रामायण कथेची उत्साहात सांगता
नायक वृत्तसेवा, घारगाव
महिला आणि गोरगरिबांची लग्न या गडावर होणार असतील तर पुढच्या आर्थिक वर्षी 25 लक्ष निधी मी देतो असे आश्वासन अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिले.
संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र सावरगाव घुले येथे चंपाषष्ठी निमित्ताने जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराचा जिर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्यावेळी आमदार लहामटे बोलत होते. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अजय फटांगरे, गौरव डोंगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सात दिवस चाललेल्या रामायण कथेतून रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी आपल्या रसाळ वाणीतून पठारभागातील भाविकांना मंत्रमुग्ध केल. गावातील महिलांनी आणि युवकांनी खंडेरायाच्या मूर्तीची गावातून मिरवणूक काढली होती. ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा भव्य दिव्य कार्यक्रम पूर्णत्वाला गेला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सीताराम घुले, सचिव गोरक्षनाथ मदने, विश्वस्त चंद्रकांत घुले, संतोष बन्सी घुले, आर. टी. घुले, नामदेव घुले, बाळासाहेब कडू, गुलाब घुले, विश्वनाथ घुले, भानुदास बोर्हाडे, बाळासाहेब घुले, भाऊसाहेब रामचंद्र घुले, सरपंच राजू खरात, ग्रामपंचायत सदस्य राजेन्द्र शत्रुघ्न घुले, अशोक गायकवाड, गणेश घुले, किरण घुले, मधुकर घुले, देवचंद घुले, अमोल फापाळे, ऋषीकेश घुले, पत्रकार बाबासाहेब कडू आदिंसह गावातील तरुण मित्रमंडळ आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
माणुसकी हाच मोठा धर्म आहे त्यापेक्षा मोठा धर्म असू शकत नाही, असे सांगत माजी मंत्री बाळासाहेब थोरातांचे साधूसंतांवर नेहमीच प्रेम राहिल्याची भावना रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी व्यक्त केली. कथेच्या शेवटच्या दिवशी दीपोत्सव साजरा करण्यात आला. हा दीपोत्सव डोळ्यांची पारणे फेडणारा ठरला. संपूर्ण भाविकांच्या हातामध्ये मेणबत्ती देऊन रामायण कथेची सागता करण्यात आली. गावातील दानशूर व्यक्तीने याठिकाणी मोफत पाण्याची व्यवस्था केली होती. खंडोबा मंदिराच्या सभा मंडपासाठी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी यापूर्वी वीस लाख रुपयांचा निधी दिला आहे. दरम्यान, महिलांनी गावोगावी दान मागून मोठी लोकवर्गणी गोळा केली होती त्या महिलांचा यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला. गावातील तरुण मित्रमंडळाने या सप्ताह कालावधीमध्ये विशेष परिश्रम घेतले. गावकर्यांच्या सहकार्यातून हा भव्य दिव्य सप्ताह पूर्णत्वाला गेला याचा विशेष आनंद झाल्याची भावना देवस्थान ट्रस्टने व्यक्त केली.