महाराष्ट्रात कोरोना मृत्यूचे आकडे का लपविले? ः विखे पत्रकारांशी बोलताना साधला विविध मुद्द्यांवर निशाणा

नायक वृत्तसेवा, राहाता
कोविड संकटातील मृत्यूची खरी आकडेवारी बाहेर येवू देऊ नका, अशा सूचना राज्यात सर्व जिल्ह्यांमधील प्रशासनाला असाव्यात, अशी शंका ज्येष्ठ भाजप नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केली. मृत्यूची आकडेवारी लपवून अपयश झाकण्याचा प्रयत्न सरकारने केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, मृत्यूची आकडेवारी लपविण्याच्या प्रकार हा फक्त मुंबईतच नाही तर तो राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये झाला असावा, अशी शंका आता उपस्थित होते. वस्तुस्थिती समोर येवू द्यायची नाही अशा सूचनाच प्रशासनाला दिल्या असाव्यात. यातून सरकार आपले अपयश झाकत असले तरी सत्य उघड झाल्याशिवाय राहात नाही. मृत्यूच्या आकडेवारीत दिसून आलेली तफावत गंभीर आहे.

आकडेवारी लपविण्यात वेळ घालवण्यापेक्षा मंत्री आणि अधिकार्‍यांनी जनतेला सेवा देण्याचा प्रयत्न केला असता तर नागरिकांना दिलासा मिळाला असता. परंतु, मंत्री फक्त बैठकांमधून आढावा घेत बसले. उपाययोजना कोणत्याही झाल्या नाहीत. सरकारकडून रेमडेसिविर अथवा ऑक्सिजनबाबत कोणतेही व्यवस्थापन होवू शकले नाही. महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आपले अपयश झाकण्यासाठी फक्त केंद्राकडे बोट दाखवित बसले, अशी टीकाही विखे यांनी केली.

आता तरी अधिकचे मृत्यू प्रामाणिकपणे दाखवा : फडणवीस
कोरोना संसर्गाचे कमी-अधिक मृत्यू हा प्रतिष्ठा किंवा अप्रतिष्ठेचा प्रश्न नाही, तर कोरोनाविरोधी लढ्यातील तो महत्त्वाचा दुवा वा संदर्भ आहे. त्यामुळेच त्यातील पारदर्शिता अधिक महत्त्वाची ठरते. महाराष्ट्रातील मृत्यू लपवू नका, म्हणून सातत्याने पत्रव्यवहार केला, अनेकदा आवाज उठविला. पण, सरकार आवाज उठविणार्‍यांना महाराष्ट्रद्रोही, महाराष्ट्राची बदनामी करणारे ठरविण्यात मग्न होते. असो, आता तरी अधिकचे झालेले मृत्यू प्रामाणिकपणे दाखवा आणि माझी आणखी एक विनंती आहे की, आता माध्यमांना महाराष्ट्रद्रोही ठरवू नका, असे ट्वीट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला होता.

Visits: 19 Today: 1 Total: 116413

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *