दिलासादायक! निम्मा संगमनेर तालुका झाला ‘कोविड मुक्त’! तीन महिन्यांच्या दुसर्‍या लाटेनंतर संगमनेरकरांना पहिलाच मोठा दिलासा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या 15 महिन्यांपासून कोविड संक्रमणाची पहिली आणि दुसरी लाट सोसणार्‍या संगमनेर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला असून तालुक्यातील संक्रमित झालेल्या 174 गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील 82 गावांतील रुग्णसंख्या शून्य झाली असून 49 गावांतील रुग्णांची संख्या दोनपेक्षा कमी आहे. सध्या तालुक्यात अवघ्या 392 रुग्णांवर उपचार सुरु असून त्यातील 93 रुग्ण संगमनेर शहर व साकूर परिसरातील आहेत. गेल्या पंधरा महिन्याच्या कालावधीत शहरातील 24 जणांसह तालुक्यातील एकूण 101 जणांचा कोविडने बळी घेतला असून 21 हजार 721 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील रुग्ण बरे होण्याची सरासरी गती 97.78 टक्क्यांवर पोहोचली आहे.

मागील वर्षी एप्रिलमध्ये संगमनेर शहरातील सात जणांसह आश्वी येथील एकाच्या माध्यमातून कोविड संक्रमणाने तालुक्यात पाय ठेवले होते. त्यानंतरच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने तालुक्यातील गावांमध्ये संक्रमण वाढून जवळपास संपूर्ण तालुक्यालाच कोविडचा विळखा बसला. जवळपास पन्नास किलो मीटरच्या परिघात वसलेल्या संगमनेर तालुक्यात 172 गावे आणि 263 वाड्या-वस्त्या आहेत. एप्रिल ते डिसेंबर या गेल्या वर्षभराच्या कालावधीत यातील 164 गावांमध्ये कोविडच्या पहिल्या संक्रमणाची धग पोहोचली, तर चालू वर्षी फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेत राहीलेल्या सर्व गावांनाही कोविडचा विळखा बसल्याने संपूर्ण तालुकाच कोविडमय झाला होता. संक्रमणाची अधिक धग दाट लोकवस्तीच्या गावांना अधिक बसल्याचेही निरीक्षण गेल्या पंधरा महिन्यातील बाधितांच्या आकडेवारीतून समोर आले.

संक्रमणाच्या या दोन्ही लाटेत संगमनेर शहरातील विविध भागातून 5 हजार 19 रुग्ण समोर आले, त्यातील 4 हजार 925 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. तर दुर्दैवाने शहरातील 24 जणांचा कोविडने मृत्यू झाला, सध्या शहरातील 70 जणांवर उपचार सुरु आहेत. संगमनेरपाठोपाठ तालुक्यात संक्रमणाची सर्वाधिक झळ शहरालगतच्या घुलेवाडी आणि गुंजाळवाडी या मोठ्या लोकसंख्येच्या गावांनाही मोठ्या प्रमाणात बसल्याचे समोर आले आहे. या कालावधीत एकट्या घुलेवाडीतील 1 हजार 607 नागरिकांना कोविडचे संक्रमण झाले, त्यातील 1 हजार 584 जणांवर उपचार करण्यात आले, 15 जणांवर उपचार सुरु आहेत. तर आठ जणांनी आपला जीव गमावला आहे. तर शहराच्या पश्चिम भागालगत पसरलेल्या आणि शहरी जीवनाचाच भाग बनलेल्या गुंजाळवाडी शिवारातील एकूण 899 जणांना कोविडचे संक्रमण झाले, त्यातील 883 जणांवर उपचार करण्यात आले. सध्या गुंजाळवाडीतील अवघ्या बारा जणांवर उपचार सुरु असून तेथील चार जणांचा कोविडने जीव घेतला आहे.

जिल्ह्यात परतलेल्या कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेत मृत्यूचा वेग अधिक होता. गेल्या वर्षभराच्या कालावधीत संक्रमित होवून मृत्यू पावलेल्यांची संख्येपेक्षा गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या संक्रमणात बळी गेलेल्यांची संख्या अधिक आहे, त्यावरुन कोविडचे दुसरे संक्रमण अधिक वेगवान आणि जीवघेणे ठरल्याचेही समोर आले. मात्र आता तालुक्यातील संक्रमण जवळपास आटोक्यात आले असून दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठी घट झाली आहे. आजच्या स्थितीत तालुक्यातील 24 गावांमध्ये प्रत्येकी एक तर 25 गावांमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. येत्या दोन दिवसांत या सर्वांना घरी सोडण्यात येणार असल्याने कोविड मुक्त होणार्‍या गावांमध्ये आणखी पन्नास गावे आणि वाड्या-वस्त्यांची भर पडणार आहे.

तालुक्यातील उर्वरीत गावांमधील 15 गावांमध्ये प्रत्येकी तीन, अवघ्या चार गावांमध्ये प्रत्येकी चार तर तीन गावांमध्ये प्रत्येकी पाच याप्रमाणे 154 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर संगमनेर शहरातील 70, पठारावरील साकूर येथील 23, घुलेवाडीतील 15 आणि गुंजाळवाडीतील बारा अशा अशा एकूण 120 जणांसह तालुक्यातील 392 जणांवर उपचार सुरु आहेत. गेल्या पंधरा महिन्यांच्या कालावधीत शहरीभागातील 5 हजार 19 तर ग्रामीण भागातील 17 हजार 195 अशा एकूण 22 हजार 275 जणांना कोविडची लागण झाली. त्यातील 21 हजार 721 जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले, तर 392 जणांवर उपचार सुरु आहेत. या दरम्यान शासकीय नोंदीनुसार 101 जणांनी आपला जीवही गमावला आहे. मात्र आता कोविडची दुसरी लाट ओसरली असून दररोजच्या रुग्णसंख्येतही मोठी घट होवून तालुक्यातील गावे व वाड्या-वस्त्यांची वाटचाल कोविड मुक्तीच्या दिशेने सुरु झाली आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर संगमनेरकरांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

Visits: 247 Today: 1 Total: 1414140

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *