श्रीमंतीपेक्षा दातृत्वाचा ठेवा महत्त्वपूर्ण असतो ः फटांगरे रामवाडीतील विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल शिक्षण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्रीमंतीपेक्षा दातृत्वाचा ठेवा सर्वाधिक महत्त्वाचा असून या दातृत्वाने कडलग परिवाराने नावलौकिक प्राप्त केला आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी केले.

इनरव्हील क्लबच्या संकल्पनेतून सुनील कडलग व वृषाली कडलग यांनी आपल्या मातोश्री स्व. शकुंतला किसन कडलग यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी शाळेला दिलेल्या डिजिटल सॉफ्टवेअरमुळे रामवाडीच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार आहेत असे मत गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी व्यक्त केले. रामवाडीसारख्या दुर्गम शाळेतील विद्यार्थी डिजिटल सॉफ्टवेअरमुळे आपल्या अभ्यासात नक्कीच प्रगती करतील, कडलग परिवार व इनरव्हील क्लब या विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या पाठिशी नेहमी भक्कमपणे उभा राहील असे मत इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वृषाली कडलग यांनी व्यक्त केले.

केंद्रप्रमुख अशोक गोसावी यांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. इनरव्हील क्लब व कडलग परिवाराने औदार्य दाखवत रामवाडीच्या जिल्हा परिषद शाळेला दिलेले सॉफ्टवेअर येथील विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल तसेच इनरव्हील क्लब व कडलग परिवाराचे आभार मानत शाळेत चालू असणार्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकातून मुख्याध्यापक केशव घुगे यांनी सांगितली. याप्रसंगी ग्रामस्थांमार्फत व्यवस्थापन समिती सदस्य संजय खरात व भास्कर गोसावी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उपाध्यापिका सुरेखा आंधळे यांनी केले तर आभार व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविना खरात यांनी मानले.

यानिमित्ताने विद्यार्थ्यांना चित्रकला वही, रंगपेटी व गोष्टींची पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संतोष खरात यांनी सर्व विद्यार्थी व उपस्थित पालकांना गुळलापशी, भात व कढी असे सुंदर मिष्टान्न भोजन दिल्याबद्दल त्यांच्या सौभाग्यवती मोहिनी खरात यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लबच्या सदस्या सुनीता गाडे, सरपंच सुवर्णा घुगे, उपसरपंच दत्तू खरात, ग्रामसेविका रुपाली कहाणे, संदीप खरात, सोमनाथ खरात, भागवत नागरे, योगिता खरात, प्रकाश खरात, अनिल खरात, संतु खरात, सुखदेव खरात, आनंदा खरात, मधुकर खरात, अंगणवाडी सेविका संगीता मुंतोडे, स्वप्नाली भालेराव, सुरेश भालेराव, सतीश गिरी, मदतनीस खरात, विशेष शिक्षक महेश काळे आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
