आंबीखालसा फाट्यावर टेम्पोला धडक देत जीप दुभाजकावर आदळली सहा जखमी तर जीपचे मोठे नुकसान; परिसरातील तरूणांकडून अपघातग्रस्तांना मदत

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथे जीपने टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याने थेट दुभाजकावर आदळली. यामध्ये जीपमधील सहा जण जखमी झाले असून, जीपचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी (ता.23) सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास घडला आहे.

याबाबत डोळसणे महामार्ग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जीपवरील (क्रमांक एमएच.16, एजी.6892) चालक अभिजीत चंद्रसेन आहेर, मयूर विजय बागुल, तेजस कैलास आहेर, एकनाथ भाऊसाहेब आहेर, प्रीतम बाळासाहेब आहेर, भाऊसाहेब रामनाथ आहेर (सर्व रा.लोणी, ता.राहाता) येथील असून काही कामानिमित्त संगमनेर मार्गे पुणेच्या दिशेने जात होते. शनिवारी सकाळी ही जीप महामार्गावरील आंबीखालसा फाटा गतिरोधकावर आली असता पुढे चालणार्‍या टेम्पोला (क्रमांक एमएच.12, एनएक्स.1258) पाठीमागून जोराची धडक दिल्याने जीप थेट महामार्गाच्या दुभाजकावर आदळली. जोराचा आवाज झाल्यावर झाल्याने आजूबाजूच्या तरूणांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.

जीपमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी तरूणांना प्रयत्नांशी शिकस्त करावी लागली. त्यानंतर सर्व जखमींना खासगी रुग्णवाहिकेतून उपचारार्थ संगमनेरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण ढोकरे, अरविंद गिरी, सुनील साळवे, पंढरीनाथ पुजारी, भरत गांजवे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. टोलनाक्यावरील क्रेन बोलावून अपघातग्रसत जीप महामार्गावरुन बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

अपघातांची संख्या कमी करण्यासाठी शासनाकडून ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ राबविला जात आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस व राज्य परिवहन विभागाकडून विविध उपक्रमांद्वारे वाहतुकीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तरी देखील वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन सुरक्षितरित्या वाहन चालवणे गरजेचे आहे. अन्यथा रस्ता सुरक्षा सप्ताह आणि जनजागृतीचे कोणतेही उद्दिष्ट साध्य होणार नाही.

Visits: 50 Today: 1 Total: 438541

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *