रेखा जरे यांची हत्या प्रेमप्रकरणातूनच झाल्याचे तपासातून निष्पन्न! पत्रकार बाळ बोठेसह सात जणांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल
नायक वृत्तसेवा, अहमदनगर
अवघ्या राज्यात खळबळ उडवणार्या अहमदनगरच्या सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या प्रेमप्रकरणातूनच झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पत्रकार बाळ बोठे व जरे यांच्यात प्रेमसंबंध होते, त्याच्यातून दोघांमध्ये वाद सुरु होते. त्याला वैतागून बोठे याने 12 लाख रुपयांची सुपारी देवून त्यांची हत्या घडवून आणली होती. मंगळवारी (ता.8) पारनेर पोलिसांनी या हत्याकांडाचा सूत्रधार पत्रकार बाळ बोठेसह सात जणांविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले, त्यात त्याला फरार होण्यास मदत करणार्या नगरच्या एकासह हैद्राबादच्या सहा जणांचा समावेश आहे. या प्रकरणात पारनेर पोलिसांनी मुख्य आरोपपत्रासह एकूण 1 हजार 150 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
गेल्या वर्षी 30 नोव्हेंबर रोजी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांची पारनेरजवळील जातेगाव घाटात गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी जरे यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. जरे या पुण्याहून नगरकडे येत असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांची कार अडवून त्यांच्याशी वादावादी केली व त्याचवेळी एका हल्लेखोराने धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरुन त्यांची हत्या केली. यावेळी जरे यांच्यासोबत त्यांची आई, मुलगा व त्यांची एक मैत्रिणही होती. हत्येनंतर जरे यांच्या मुलाने आपल्या मोबाईलमध्ये दोघांतील एका हल्लेखाराचे छायाचित्र काढले होते, त्यावरुनच पोलिसांनी हत्येच्या दुसर्याच दिवशी श्रीरामपूर व राहुरीतून अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीतून आणखी तिघांची नावे समोर आल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली पत्रकार बाळ बोठे या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असून सागर भिंगारदिवे याच्या मार्फत त्याने जरे यांच्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले.
मंगळवारी (ता.8) या प्रकरणाचे तपासी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी पारनेर न्यायालयात एकूण सात जणांविरोधात आरोपपत्र सादर केले. त्यात पत्रकार बाळ बोठेसह महेश वसंत तनपुरे (नगर), जनार्दन अंकुला चंद्रप्पा, राजशेखर अजय चाकली, पी.अनंतलक्ष्मी व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली व अब्दुल रहेमान अब्दुल आरिफ (सर्व रा.हैद्राबाद) यांचा त्यात समावेश आहे. बोठे याच्या विरोधात प्रेमप्रकरणातील वादातून कट रचून व हत्येची सुपारी देवून रेखा जरे यांचा खून करणे, तर अन्य सहा आरोपीं विरोधात बोठेला फरार होण्यास मदत करणे, आश्रय देणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हा बु.), सागर भिंगारदिवे व ऋषीकेश पवार (दोघेही नगर) या पाच आरोपींविरोधात यापूर्वीच 26 फेब्रुवारीरोजी आरोपपत्र ठेवण्यात आले होते. नंतर पोलिसांच्या हाती लागलेल्या बोठेसह त्याला साथ देणार्या अन्य सहा आरोपींविरोधात मंगळवारी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे जरे हत्याकांडाच्या सुनावणीला आता खर्याअर्थी सुरुवात होणार असून राजकीय क्षेत्रासह पत्रकार क्षेत्राचे लक्ष्यही या खटल्याकडे लागले आहे.
नगर शहरात गाजलेल्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाची वृत्तमालिका प्रसिद्ध केल्याच्या रागातून आपणास या प्रकरणात गोवल्याचा कांगावा पत्रकार बोठे याने कोठडीतील तपासादरम्यान केला होता. मात्र पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर अतिशय बारकाईने तांत्रिक तपास करुन हत्येचे मूळ गाठले. जरे यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणातून दररोज होणार्या वादावादीला वैतागून बोठेनेच त्यांची हत्या घडवून आणल्याचे पोलिसांनी आपल्या तपासातून समोर आणले. या हत्याकांडाच्या आरोपाखाली पारनेर पोलिसांनी यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी पाच आणि मंगळवारी (ता.8) सात अशा एकूण 12 जणांविरोधात 1 हजार 150 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येसाठी पत्रकार बाळ बोठे याने नगरच्या सागर भिंगारदिवे याला 12 लाख रुपयांची सुपारी दिली होती. पारनेरनजीकच्या जातेगाव घाटात जरे यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या अर्ध्यातासात बोठे याने पत्रकार चौकात सदरची रक्कम भिंगारदिवेला दिली. त्याने त्यातील साडेतीन लाखांची रक्कम आदित्य चोळकेला देवून त्याच दिवशी भिंगारदिवे कोल्हापूरकडे रवाना झाला. चोळके याने त्यातील प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची रक्कम प्रत्यक्ष खून करणार्या ज्ञानेश्वर उर्फ गुड्डू शिंदे व फिरोज शेख या दोघांना दिल्याचे आरोपपत्रात म्हंटले आहे.